माहिम किल्ल्याचे संवर्धन आणि परिसर विकसित करणार : मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

    09-Oct-2025   
Total Views |

मुंबई : माहिम येथील ऐतिहासिक किल्ल्याचे जतन, संवर्धन, सुशोभिकरण करण्यात येणार असून सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात याबाबत मंत्रालयात बैठकही घेण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी गुरुवार, ९ ऑक्टोबर रोजी दिली.

मंत्री आशिष शेलार यांनी माहिम किल्ला परिसरात भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पुरातत्व विभागाचे अधिकारी, पीडब्ल्यूडी विभागाचे अधिकारी, मुंबई महानगरपालिका हेरिटेज विभागातील कन्सल्टंट, त्यातले अधिकारी, मुंबई पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "माहिमचा किल्ला ही मुंबईतील अतिशय पुराण वास्तू असून तेराव्या शतकामध्ये राजा बिंबाराजाने बांधलेले मूळचे स्ट्रक्चर हा किल्ला आहे. चौदाव्या शतकात गुजरातच्या सुलतानाने त्यावर हल्ला केला आणि मग सोळाव्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी या ठिकाणी हा किल्ला उभा केला, तो आजचा हा माहिमचा किल्ला म्हणून ओळखला जातो. इथून जवळच बांद्राचा किल्ला आहे आणि वरळीचा किल्ला सुद्धा बाजूलाच आहे. या वास्तूमध्ये वर्षानुवर्षे खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत होते. मुंबई महापालिकेने या ऐतिहासिक वास्तूला अतिक्रमणापासून मुक्त करण्याचे काम केले. त्यामुळे माहिमचा किल्ला आज मोकळा श्वास घेतो आहे."

"आता यापुढे किल्ल्याचे जतन, संवर्धन आणि सुशोभिकरण करण्यात येणार असून मुंबई महापालिका आणि त्यांचे कन्सल्टंट, पुरातत्व खात्यातर्फे हे काम करण्यात येणार आहे. जवळजवळ एक एकरमध्ये असलेला हा पूर्ण किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेली दोन एकरची मोकळी आणि अन्य जागा, असा तीन एकर समुद्रकिनारा असलेला हा परिसर आहे. पोर्तुगीजांनी त्यावेळी बांधलेले आणि मूळ स्ट्रक्चरमध्ये सापडलेले अवशेष जे राजा बिंबाच्या काळापासूनचे आहेत तेसुद्धा याच भागामध्ये अजूनही अस्तित्वात आहेत. या सगळ्यांचा एकत्रित विकासाचा कार्यक्रम, धोरण आणि योजना मुंबई महानगरपालिकेच्या नेतृत्वात पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे," असे त्यांनी सांगितले. तसेच येत्या आठवड्यात मंत्रालयात याविषयी बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....