'जैश-ए-मोहम्मद'ची नवी महिला संघटना 'जमात-उल-मुमिनात'; मसूदची बहीण सादिया अझहरकडून संघटनेची घोषणा

    09-Oct-2025   
Total Views |

मुंबई : पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आता ‘जमात उल-मुमिनात’ या नावाखाली महिलांची गुप्तचर संघटना सुरू करण्याच्या प्रक्रियेत असल्याचे उघडकीस आले आहे. कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या नेतृत्वाखालील या संघटनेने, जी पारंपरिकरित्या महिलांना सशस्त्र किंवा लढाऊ भूमिकांपासून दूर ठेवत होती, ती नुकतीच जमात-उल-मुमिनात नावाच्या या नव्या शाखेची घोषणा केली. शाखेची भरती प्रक्रिया बहावलपूरमधील मरकज उस्मान-ओ-अली येथे सुरू झाल्याची माहिती आहे.

ही नवीन महिला संघटना जैश-ए-मोहम्मदच्या मानसिक युद्ध आणि स्थानिक स्तरावरील भरती या बदलत्या धोरणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले जाते. विशेषतः महिलांची ही गुप्त शाखा जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि दक्षिण भारतातील शिक्षित, शहरी मुस्लिम महिलांना लक्ष्य करतेय. अशी माहिती आहे की, ही संघटना स्वतःला 'इस्लामी सुधार चळवळ' म्हणून सादर करते. जैश-ए-मोहम्मदने प्रसिद्ध केलेल्या एका परिपत्रकात मक्का आणि मदिनाच्या प्रतिमा तसेच कुरआनमधील आयते दाखवून त्याला “दैवी वैधतेचा आवेश” दिला आहे. हा सूक्ष्म प्रचार नैतिक शुद्धीकरण आणि भक्तीभावाच्या भाषेत गुंडाळलेला असून, आध्यात्मिक समाधान शोधणाऱ्या शिक्षित मुस्लिम महिलांना आकर्षित करण्यासाठी खास रचला गेला आहे.

परिपत्रकात पाहिल्यास “जमात अल-मुमिनात” या नावाचा वारंवार उल्लेख आढळल्यामुळे, असे दिसून येते की, जैशच्या विद्यमान संरचनेप्रमाणे ही संघटना सेल-आधारित गुप्त रचना वापरते. या महिलांच्या गटांना भरती, संदेश पोहोचविणे आणि निधी गोळा करणे यासाठी तयार केले जात असल्याची माहिती आहे. त्या पुरुष दहशतवाद्यांना अप्रत्यक्ष लॉजिस्टिक सहाय्य देतात आणि लक्षात न येण्यासारख्या मार्गांनी कार्य करतात. जमात- उल-मुमिनातचे साहित्य, डिझाइन आणि धार्मिक भाषाशैली या सर्व गोष्टी पाकिस्तानमधील अल-मुहाजिरात आणि बहावलपूरमधील मरकज उस्मान-ओ-अली यांच्या प्रकाशनांशी साधर्म्य राखतात.

संघटनेचा उद्देश आणि कार्यपद्धती :

या संघटनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना धार्मिक आणि विचारसरणीच्या आडून उग्र बनवणे आणि त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करणे.

ती ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स, धार्मिक वर्ग, आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जिहादी विचार पसरवते.

या संघटनेतून काही महिलांना लॉजिस्टिक, माहिती संकलन, प्रचार, आणि निधी उभारणी यांसाठी वापरले जाते.

त्यांना 'इस्लामच्या रक्षणासाठी' आपले कर्तव्य पार पाडण्याची शिकवण देऊन मानसिकदृष्ट्या तयार केले जाते.

या नव्या शाखेचे नेतृत्व सादिया अझहर, म्हणजेच मसूद अझहर याची बहीण, करणार आहे. तिचा पती युसुफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतीय वायुदलाने मरकज सुब्हानअल्लाह येथील जैश मुख्यालयावर केलेल्या हल्ल्यात ठार झाला होता. जमात-उल-मुमिनातची स्थापना ही ऑपरेशन सिंदूर नंतरची मोठी घटना मानली जातेय. या कारवाईदरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सुमारे १०० किलोमीटर आत असलेल्या जैशच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील दहा सदस्य आणि त्याचे चार निकटवर्ती सहकारी ठार झाले. यात त्याची मोठी बहीण, तिचा पती, एक भाचा आणि त्याची पत्नी, एक भाची, तसेच पाच इतर नातेवाईकांचा समावेश होता.


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक