भारत आणि ब्रिटन नैसर्गिक भागीदार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

    09-Oct-2025   
Total Views |

मुंबई :
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे मुंबईत स्वागत केले. यावेळी ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत पत्रकार परिषदेतील संयुक्त निवेदनादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांसमोर निवेदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "पंतप्रधान स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि ब्रिटनमधील संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली आहे. या वर्षी जुलैमध्ये माझ्या ब्रिटन दौऱ्यादरम्यान, आम्ही ऐतिहासिक सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारावर (सीईटीए) सहमती केली. या करारामुळे दोन्ही देशांच्या आयात खर्चात कपात होऊन युवा वर्गासाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, व्यापार वाढेल, आणि आपल्या उद्योग क्षेत्र तसेच ग्राहक, या दोघांनाही याचा लाभ मिळेल. हा करार झाल्यानंतर काही महिन्यांतच आपला हा भारत दौरा हे भारत आणि ब्रिटनमधील भागीदारीत आलेली नवी ऊर्जा आणि व्यापक दृष्टी यांचे प्रतीक आहे."

"भारत आणि ब्रिटन नैसर्गिक भागीदार आहेत. आमच्या संबंधांच्या पायाअंतर्गत लोकशाही, स्वातंत्र्य, आणि कायद्याचे राज्य यांसारख्या मूल्यांवरचा परस्पर सामायिक विश्वास आहे. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात, भारत आणि ब्रिटन दरम्यानची ही वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा एक महत्त्वाचा आधार ठरली आहे. भारत प्रशांत क्षेत्रात सागरी सुरक्षा विषयक सहकार्य वाढवण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. भारत आणि ब्रिटन दरम्यान तंत्रज्ञान विषयक भागीदारीत अमर्याद क्षमता आहे. आम्ही ब्रिटनची औद्योगिक तज्ञता, संशोधन आणि विकास याला भारताची प्रतिभा आणि व्याप्तीशी जोडण्यावर काम करत आहोत," असे ते म्हणाले.

भारत-ब्रिटन तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमाचा प्रारंभ

"गेल्या वर्षी आम्ही भारत-ब्रिटन तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमाचा प्रारंभ केला. या अंतर्गत आम्ही अत्यावश्यक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये संयुक्त संशोधन आणि नवोन्मेषासाठी एक मजबूत मंच तयार केला आहे. दोन्ही देशांतील युवा पिढीला नवोन्मेषाच्या दुव्यासोबत जोडण्यासाठी आम्ही, संपर्क जोडणी आणि नवोन्मेष केंद्र, संयुक्त कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन केंद्र यांसारखी अनेक पाऊले उचलली आहेत. आम्ही हवामान विषयक तंत्रज्ञान स्टार्टअप निधीची स्थापना केली असून यातून हवामान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम तंत्रज्ञान या संदर्भात काम करणारे दोन्ही देशांचे नवोन्मेषकर्ते आणि उद्योजक अधिक सक्षम होतील," असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

"संरक्षण आणि सुरक्षिततेपासून शिक्षण आणि नवोन्मेषापर्यंत प्रत्येक बाबतीत भारत आणि युके यांच्या दरम्यानच्या संबंधांमध्ये नवे पैलू जोडले जात आहेत. पंतप्रधान स्टार्मर यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि प्रभावी प्रतिनिधीमंडळ आपल्याकडे आले आहे. युकेमधील नऊ विद्यापीठे भारतात त्यांच्या शिक्षणसंस्था सुरु करत आहेत ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आमच्यातील संरक्षण विषयक सहकार्यातदेखील वाढ झाली आहे. दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांना एकमेकांशी जोडत आहोत. आम्ही लष्करी प्रशिक्षणासंदर्भात सहयोगाबाबत सामंजस्य करार केला आहे. याअंतर्गत, भारतीय वायुसेनेचे उड्डाण मार्गदर्शक युकेच्या रॉयल एअर फोर्समध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतील. एकीकडे देशाच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबईत ही बैठक होत आहे आणि दुसरीकडे आमच्या नौदलांची जहाजे 'कोंकण २०२५' हा संयुक्त सराव करत आहेत हा एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण योगायोग आहे," असेही ते म्हणाले.

१.८ दशलक्ष भारतीय भागीदारीचा जिवंत दुवा

"युकेमध्ये स्थायिक झालेले १.८ दशलक्ष भारतीय आमच्या भागीदारीचा जिवंत दुवा आहेत. त्यांनी ब्रिटीश समाज आणि अर्थव्यवस्थेत स्वतःचे मौलिक योगदान देऊन दोन्ही देशांदरम्यान मैत्री, सहयोग आणि विकासाच्या सेतूला बळकटी दिली आहे. भारताची गतिशीलता आणि युकेची तज्ञता मिळून एक अनोखा सुसंवाद निर्माण होतो. आमची भागीदारी विश्वसनीय आहे, प्रतिभा आणि तंत्रज्ञानाच्या प्रेरक शक्तीने युक्त आहे. आम्ही एकत्रित येऊन, दोन्ही देशांच्या लोकांसाठी एका उज्ज्वल भविष्याची निर्मिती करु," असा निश्चय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....