'जबाबदारीचे एकनिष्ठेने पालन' ज्यांचा स्वभाव असे देवदुर्लभ कार्यकर्ते

    09-Oct-2025   
Total Views |

जी जबाबदारी आपल्याकडे येईल, तिचे एकनिष्ठेने पालन करणे हा ज्यांचा संघस्वभाव होता असे देवदुर्लभ कार्यकर्त्यांत मोडणारे कै. मोहन श्रीपाद ढवळीकर यांच्याविषायी...

संघ संस्थापक डॉ. हेडगेवार कुळातून संघभूतबाधा झालेले हजारो कार्यकर्ते उभे राहिले. कै. मोहन ढवळीकर हे त्यापैकीच एक. मुळ गोव्याचे असले तरी त्यांचा जन्म बेळगावचा. त्यांचे शालेय शिक्षण बेळगावातच पूर्ण झाले. त्यांचा संघाशी संपर्क आला तो त्यांच्या वडिलांमुळे. त्यांचे वडील श्रीपाद ढवळीकर नियमितपणे संघाच्या शाखेत जायचे. वयाच्या १६ व्या वर्षी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहनराव मुंबईला आले. ते वाशी येथे वास्तव्यास होते. आरसीएफ येथे नोकरी करून मग संध्याकाळी त्यांचा संघप्रवास सुरु होई. सुरुवातीला त्यांच्याकडे चेंबूर भागातील संघकामाची जबाबदारी होती. चेंबूर येथे त्यांनी दीर्घकाळ काम केले. चेंबूरमधील रमेशजी ओवळेकर आणि ढवळीकर यांचे सोबतचे संघकार्य दीर्घकालीन चालले.

पुढे ठाणे जिल्हा कार्यवाह, ठाणे विभाग कार्यकारिणी सदस्य, विश्व संवाद केंद्र, चेंबूर हायस्कूल कार्याध्यक्ष, विवेकानंद संकुल, सानपाडा शालेय समिती सदस्य, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश सह संघटन मंत्री आणि कोकण प्रांत संघटन मंत्री म्हणून दायित्व त्यांच्याकडे होते. त्यांना कोणी आपल्या नावापुढे 'जी' लावलेले रुचायचे नाही, कारण एक हाडाचा संघ स्वयंसेवक म्हणून कुणाकडून खास आदरेखून संबोधून-वागवून घेणे, हे त्यांच्या संघनिष्ठ रक्तातच नव्हते.

मोहनराव यांना जनसंपर्काची प्रचंड आवड असल्याने त्यांचा लोकसंग्रह अफाट होता. साहित्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. तरुण भारत, साप्ताहिक विवेक, तसेच साप्ताहिक विरवाणी (बेळगाव), इ. त्यांचा मोठा ऋणानुबंध होता. अजातशत्रू भास्करराम मुंडले यांच्या आठवणींच्या पुस्तकाचे काम हे त्यांचे अखेरचे संघकार्य होते. कायम पडद्यामागे राहून काम करणारे, निस्वार्थी, निरलस आणि तत्वनिष्ठ आयुष्य ते एक सामान्य संघ स्वयंसेवक म्हणून जगले. साहित्यकलांची उत्तम जाण, ग्रंथवाचनाची आवड आणि संघ स्वयंसेवक म्हणून सर्वांशी सदैव स्नेहशीलपणे वागणे-बोलणे, यामुळे आधी ठाणे मग नवी मुंबई - जिथे जिथे ते राहायला गेले, तिथे ते माणसंच जोडत गेले. अनेकानेक जबाबदार्‍या सांभाळत त्यांनी आयुष्यभर अगणित तरुण ज्येष्ठ कार्यकर्त्यांनाही संघाशी मेळवतच राहिले. त्यांचे बोलणे इतके आर्जवी असायचे की, कुणीही त्यांना ‘नाही’ म्हणूच शकत नसे!

‘समरसता अध्ययन केंद्रा’चे कार्यवाह म्हणून मोहनराव ढवळीकरांचे योगदान ऐतिहासिक ठरले आहे. ‘समरसता अध्ययन केंद्रा’ला कार्यकर्ते जोडून देण्याचे काम त्यांनी केले. जी जबाबदारी आपल्याकडे येईल, तिचे एकनिष्ठेने पालन करणे हा त्यांचा संघ स्वभाव होता. बाळासाहेब देवरसांच्या शब्दात सांगायचे, तर ते देवदुर्लभ कार्यकर्त्यांत मोडणारे होते. २०१२चे १४वे समरसता साहित्य संमेलन यशस्वी करण्यात मोहन ढवळीकरांनी खूप परिश्रम घेतले होते. नेहमी सर्वांना प्रोत्साहन देणाऱ्या मोहनराव ढवळीकर यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली, आई आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे. मोहनराव यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक