मुंबई : ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक, टॅक्सी साठी ॲग्रिगेटर धोरण नियमावली येत्या २ दिवसात जाहीर होत असुन त्यामध्ये प्रवासी आणि चालकांच्या अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा पुरविणाऱ्या संस्थांनी व्यवसाय करताना 'प्रवासी व चालकांना' केंद्रस्थानी ठेवावे, भरमसाठ नफा कमविण्याच्या प्रयत्नात त्यांची आर्थिक लुबाडणूक करून व्यवसाय वृद्धी करु नये, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
ते मंत्रालयात इंडियन फेडरेशन ऑफ ॲप -बेस ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनच्या (IFAT) बैठकीत बोलत होते. या बैठकीला परिवहन राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सह सचिव (परिवहन) किरण होळकर यांच्या सह आयएफएटीचे अध्यक्ष प्रशांत सावर्डेकर व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या संस्थांच्या संदर्भात अनेक तक्रारी प्रवासी व चालकांच्या कडून आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. यापैकी काही संस्था नफेखोरीच्या नादात प्रवासी व चालकांची आर्थिक लुबाडणूक करत असल्याचे वेळोवेळी निष्पन्न झाले आहे. त्यासाठी निश्चित नियमावली तयार करून वाजवी भाडे आकारणे तसेच चालकांना मिळणार उत्पन्नातील ८० टक्के परतावा देणे अशा महत्त्वाच्या सुधारणांचा समावेश असलेले ॲग्रीगेटेड धोरण येत्या दोन दिवसात जाहीर होत आहे. या धोरणामुळे ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सी चालवणाऱ्या संस्थांच्या वर शासनाचा अंकुश राहील. त्यामुळे प्रवाशांना आणि या संस्थेकडे काम करणाऱ्या चालकांना न्याय मिळेल.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.