मुंबई : भारताच्या राजकीय इतिहासात आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिअल हिरोच्या रुपात दिसतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) साठी 'महाराष्ट्र अँड मूव्हीज शेपिंग द फ्यूचर ऑफ इंडियाज क्रिएटिव्ह इकॉनॉमी' या विषयावर एक विशेष मुलाखत दिली. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने ही मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान, अक्षय कुमारने मुख्यमंत्र्यांना राजकीय क्षेत्रातील रिअल हिरो कोण? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भारताच्या राजकीय इतिहासात आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिअल हिरोच्या रुपात दिसतात. मोदीजींनी १० वर्षात २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचे काम केले. आपण जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो असून लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. प्रत्येक क्षेत्रात भारत जगाशी स्पर्धा करत आहोत. २०४७ च्या विकसित भारताचे चित्र आपल्या समोर असून हे चित्र उभे करणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत."
महाराष्ट्र मनोरंजनाचे कॅपिटल
अभिनेता अनिल कपूर यांची भूमिका असलेल्या नायक चित्रपटाने मला खूप प्रभावित केले. या चित्रपटाने एक बेंचमार्क स्थापन करण्याचे काम केले, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात चित्रपटांचा मोठा वारसा आहे. दादासाहेब फाळके यांच्यापासून तर आजच्या कंटेट क्रिएटरपर्यंत आपण आपली वरची जागा कधी सोडली नाही. महाराष्ट्र हा मनोरंजन आणि कंटेंटचे कॅपिटल आहे. त्यामुळे ज्यांना महाराष्ट्रात यावेसे वाटते त्यांनी यायलाच हवे. इथे चित्रपट जगणाऱ्या पिढ्या आहेत, असेही ते म्हणाले. फिल्मसिटीला आंतरराष्ट्रीय फिल्म इकोसिस्टीममध्ये परिवर्तित करण्याची माझी ईच्छा होती. त्याचे नियोजनही केले. परंतू, काही कारणांमुळे आम्ही ते पूर्ण करू शकलो नाही. त्यामुळे फिल्मसिटीला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपट परिसंस्थेत परिवर्तित करण्याचे मी निश्चित केले आहे.
झेन जी ला मराठी सिनेमाकडे आकर्षित करणार
मराठी नाट्यगृहांमुळे मराठी चित्रपट ताकदवान ठेवले आहे. आजही मराठी नाटक हाऊसफुल्ल होतात. हीच सर्जनशीलता मराठी चित्रपटांमध्येही पाहायला मिळते. नटरंग, दशावतार सारखा सिनेमा झेन जी ला आवडत आहे. आम्ही सरकार म्हणून मराठी सिनेमासृष्टीला मदत करणार आहोत. यासाठी आम्ही सरकारच्या वतीने काही योजनाही राबवत आहोत. परंतू, झेन जी ला मराठी सिनेमाकडे आकर्षित करण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गुन्हेगारी सिनेमाच्या पुढे
आता गुन्हेगारी सिनेमाच्या पुढे गेली आहे. रस्त्यांवरील गुन्ह्यांमध्ये लोक सिनेमांचे अनुकरण करायचे. परंतू, आता सायबर क्राईमचा जमाना असून सायबर गुन्हेगार मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान हस्तगत करतात. त्यामुळे त्यांनी आमच्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पण त्याचे उत्तरही तंत्रज्ञानातच आहे. आम्ही त्यावर काम करत आहोत. त्यामुळे सायबर गुन्हेगारी थांबवणारे हिरो आम्हाला हवे आहेत. सायबर क्राईमवर चित्रपट बनला पाहिजे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....