मुंबईत सर्व प्रवासासाठी आता एकच तिकीट !

Total Views |

मुंबई : महानगरातील प्रवाशांसाठी मोठी सुविधा म्हणून “मुंबई वन” हे एकत्रित मोबिलिटी अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. या अ‍ॅपद्वारे ११ सार्वजनिक वाहतूक संस्थांना (Public Transport Operators - PTOs) एका डिजिटल व्यासपीठावर एकत्र आणण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना मेट्रो, मोनोरेल, उपनगरी रेल्वे आणि बससेवा यांमधील प्रवास आता अधिक सोपा, वेगवान आणि अखंडित होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे ऍप लॉन्च करण्यात येणार आहे.

या अ‍ॅपमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वाहतूक संस्थांमध्ये मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 7, मुंबई मेट्रो लाईन ३, मुंबई मेट्रो लाईन 1, मुंबई मोनोरेल, नवी मुंबई मेट्रो, मुंबई उपनगरी रेल्वे, बेस्ट (BEST), ठाणे महानगर परिवहन (TMT), मीरा-भाईंदर महानगर परिवहन (MBMT), कल्याण-डोंबिवली महानगर परिवहन (KDMT) आणि नवी मुंबई महानगर परिवहन (NMMT) यांचा समावेश आहे.

या उपक्रमामुळे प्रवाशांना एकाच अ‍ॅपवरून प्रवास नियोजन, तिकीट खरेदी आणि थेट वेळापत्रक माहिती मिळू शकते. विविध वाहतूक साधनांमधील जोडणी सुधारून “मुंबई वन” अ‍ॅप मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीला डिजिटल आणि आधुनिक बनविण्याकडे एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

मुंबईतील प्रवाशांसाठी “मुंबई वन” अ‍ॅप अनेक सुविधा आणि सोयी उपलब्ध करून देत आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांना अनेक सार्वजनिक वाहतूक संस्थांमध्ये एकत्रित मोबाइल तिकीट खरेदी, डिजिटल व्यवहाराद्वारे लाइनमध्ये उभे राहण्याची गरज नाहीशी करणे आणि एकाच गतिशील तिकिटाद्वारे विविध वाहतूक माध्यमांमध्ये प्रवासाची अखंडित सुविधा मिळते. हे अ‍ॅप प्रवाशांना प्रवासातील विलंब, पर्यायी मार्ग, अंदाजे आगमन वेळ यासह थेट माहिती पुरवते. तसेच नकाशावर जवळची स्टेशन, पर्यटनस्थळे आणि महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती मिळवता येते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अ‍ॅपमध्ये SOS सुविधा देखील आहे. या सर्व सुविधांमुळे प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सुरक्षित बनतो, आणि मुंबईतील सार्वजनिक वाहतूक अनुभवाला नविन रूप मिळते.


गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.