पुण्याच्या सिंहगड भागातील आमचे धायरी गाव आज जरी पुण्याचे एक गजबजलेले उपनगर बनले असले, तरी १९९० च्या दशकाच्या आधी ते पुण्यापासून दूर भासणारे 'रिमोट खेडे' म्हणावे तसे ते खेडे होते. आज 'धायरी नगर- सक्षम नगर' अशी टॅग लाईन मिरवणाऱ्या धायरीत त्यावेळी 'संघ ', 'शाखा', हे शब्दही कुणाला माहीत नव्हते. अशा ह्या गावात १९९१-९२ नंतर एक उंचेपुरे, गोरेपान, पांढरी टोपी, झब्बा, धोतर असा पोशाख परिधान करणारे, तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे, गृहस्थ दिसू लागले. खांद्यावर शबनम पिशवी लावून, त्यात साप्ताहिक विवेकचे अंक घेऊन, निरनिराळ्या घरी जाताना दिसू लागले. विवेकचे वर्गणीदार बनवण्याच्या निमित्ताने, गावात राहायला आलेल्या, स्वयंसेवक बंधूंचा शोध घेऊ लागले आणि थोड्याच दिवसात धायरीत त्यांनी प्रभात शाखा उभी करून या सक्षम नगराची मुहूर्तमेढ रोवली. आम्ही सगळेजण त्यांना प्रभाकर धाक्रस तथा प्रभुजी या नावाने ओळखत होतो. त्यांच्या जोडीला होते अरविंदराव मराठे.
जरी प्रभुजींना गृहस्थ म्हटले असले तरी त्यांनी लौकिक अर्थाने संसार मांडलाच नव्हता. तीन वर्षे प्रचारक म्हणून काम केल्यावर थांबले आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात काही वर्षे नोकरी केली म्हणून त्यांना गृहस्थ म्हणायचे, इतकेच. कारण नोकरीत फार काळ मन न रमल्यामुळे, ती लवकरच सोडून देऊन, त्यांनी आजन्म संघकार्यच केले. प्रभुजींचा जन्म १० ऑगस्ट १९३४ चा, मलकापूर (जि. बुलढाणा) येथील. परंतु वडिलांचा रेल्वे अपघातात आकस्मिक मृत्यू झाल्याने, त्यांचे सर्व कुटुंब कोकणातील दापोली या आपल्या मूळ गावी राहायला आले. प्रभुजींचे सर्व शिक्षण दापोली येथेच झाले आणि तेथेच बालवयात त्यांचा संघाशी संबंध आला. त्यामुळे शिक्षण संपल्यावर ते लगेचच प्रचारक म्हणून बाहेर पडले. प्रचारक कालखंड आणि नोकरीचा कालखंड संपल्यावर ते पुण्यात राहण्यासाठी आले आणि १९९० पर्यंत त्यांनी जनकल्याण समितीचे काम केले. त्यानंतर ते सिंहगड भागात विवेकचे प्रतिनिधी म्हणून काम करू लागले आणि ते काम करता करता, धायरी नगराला सध्याच्या स्थितीत आणण्याच्या कामाची सुरुवात केली.
प्रभुजींचे बोलणे मृदू आणि दर्शन प्रसन्न होते. मात्र संघाची शिस्त पाळण्याच्या बाबतीत ते अत्यंत काटेकोर होते. इतरांना शिस्त पाळण्याच्या बाबतीत ते कधीच धारेवर धरत नसत, पण त्यांचे आदर्श वागणे पाहून इतर स्वयंसेवकांमध्येही ते गुण आपोआप रुजवले जात. व्यवस्थितपणा, टापटीप, वक्तशीरपणा आणि कामातील पारदर्शकता हे गुण त्यांच्याकडून घेण्यासारखे होते. एकटे राहत असले तरी घर स्वच्छ ठेवण्यापासून ते उत्तम स्वयंपाक करण्यापर्यंत सर्व कामे हौसेने करीत. अगदी अलीकडे जनकल्याण समितीचे कार्यवाह विनायकराव डंबीर त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आले होते. नागपंचमीचा दिवस होता. एखाद्या सुगरणीलाच करता येतील, इतके उत्कृष्ट पुरणाचे दिंड बनवून, त्यांनी विनायकरावांना खायला दिले. अशी आठवण विनायकरावांनी प्रभुजींच्या निधनानंतर सांगितली आहे.
शेवटचे सहा महिने सोडले तर प्रभुजी अखेरपर्यंत कार्यरत होते. शेवटच्या काळात शरीर थकल्यामुळे आणि आजारपणामुळे ते ठाणे येथे त्यांच्या भावाकडे जाऊन राहिले. तिथेच वयाच्या ९२ व्या वर्षी दि. ६ जून २०२५ रोजी त्यांचे देहावसान झाले. त्यांनी मृत्यूपश्चात देहदान करण्याचा संकल्प लिहून दिला होता. अशा रीतीने शेवटची समिधा राष्ट्रयज्ञात अर्पण करून प्रभुजी कृतार्थ मनाने निघून गेले. त्यांचे संघप्रवासातील कार्य सदैव स्मरणात राहील.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक