सन २०२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शताब्दी वर्षात केलेला प्रवेश, ही केवळ एखाद्या संघटनेची वर्षगाठ नाही, तर आधुनिक भारताच्या गाथेतील एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे. नागपूरमध्ये १९२५ साली सुरू झालेली ही छोटीशी पहल आज जगातील सर्वाधिक प्रभावशाली सामाजिक-सांस्कृतिक चळवळींपैकी एक बनली आहे. तरीही, संघाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य त्याचा आकार किंवा विस्तार नसून त्याची 'अंतरात्मा' आहे — ती म्हणजे निःशब्द, अनुशासित आणि निःस्वार्थ सेवा, ज्यासाठी लाखो स्वयंसेवक कोणत्याही मान्यता किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता आपले जीवन समर्पित करतात.
आपल्या सार्वजनिक जीवनात मग ती संसद व सरकारमधील जबाबदारी असो किंवा आता शिक्षण क्षेत्रातील कार्य; अनेक प्रसंगी मी संघाचे कार्य जवळून पाहिले आहे. जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती आल्या, तेव्हा सर्वप्रथम स्वयंसेवक मदतीचे साहित्य घेऊन पीडितांपर्यंत पोहोचले. जेव्हा समाजात तणाव वाढला, तेव्हा त्यांनी थेट जनतेत जाऊन संवाद आणि सहकार्याच्या माध्यमातून समाजाला जोडण्याचे कार्य केले. त्यांचा मंत्र कायमच साधा आणि प्रभावी राहिला आहे — “कार्य करा, टाळ्यांसाठी नाही, भारतमातेकरिता.”
संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाला स्थैर्य आणि सामर्थ्य देणारी गोष्ट म्हणजे त्याची शाश्वत मूल्यनिष्ठा आहे. निःस्वार्थ सेवा, अनुशासन, जात-पात व समुदायाच्या पलीकडील एकता, भारतीय संस्कृतीचा अभिमान आणि राष्ट्राला सर्वोच्च मानणे. हीच ती मूल्ये आहेत जी केवळ एखाद्या संघटनेलाच नव्हे तर संपूर्ण देशालाही बल देतात. स्वयंसेवक स्वतःबद्दल नव्हे, तर समाजाबद्दल विचार करतो. नागरिकत्व आणि चारित्र्यनिर्मितीचा हा संस्कारच भारतनिर्मितीत संघाचे सर्वात मोठे योगदान आहे.
आज भारत जेव्हा एक जागतिक शक्ती म्हणून उदयास येण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रासंगिकता अधिकच गहन बनते. आपल्या प्रगतीचे मोजमाप केवळ आर्थिक आकडेवारीने होत नाही, तर आपली मूल्य किती मजबूत आहेत, आपला समाज किती एकजुट आहे आणि आपल्या कुटुंबांचे व समुदायांचे बंध किती सुदृढ आहेत यावर ठरते. संघाची शताब्दी रूपरेखा या सर्वच आव्हानांना समोर ठेवते. ती सामाजिक समरसतेचा संदेश देते आणि आपल्याला स्मरण करून देते की खरी प्रगती तेव्हाच होईल, जेव्हा प्रत्येक भारतीय त्याच्या जन्म, जात किंवा पार्श्वभूमीला न जुमानता सन्मान आणि गौरवाने जगू शकेल.
ही रूपरेखा आधुनिक ताणतणावांच्या काळात दुर्बल होत चाललेल्या कुटुंबसंस्थेच्या महत्त्वावरही भर देते. ती नागरिकजीवनात आचरणपरिवर्तनाचा आग्रह धरते, नियमपालन, सामाजिक जबाबदारी, करुणा आणि अनुशासनाचे मूल्य रुजवते. कारण कोणताही कायदा किंवा धोरण तेव्हाच यशस्वी ठरते, जेव्हा लोक त्याला स्वतःच्या जीवनात उतरवतात.
पर्यावरणमंत्री म्हणून माझ्या कार्यकाळात मला अनुभव आला की निती तेव्हाच प्रभावी ठरतात, जेव्हा समाज स्वतः पुढाकार घेतो. या दृष्टिकोनातूनही संघ सदैव आघाडीवर राहिला आहे. जागतिक स्तरावर हवामान बदलावर चर्चा सुरू होण्याच्या आधीपासूनच स्वयंसेवक वृक्षलागवड, नदी संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा प्रचार करत आले आहेत. शिक्षण क्षेत्रात संघाने मूल्याधारित शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. जे मातृभाषेत रुजलेले असून, त्याच वेळी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानालाही आत्मसात करते. आर्थिक क्षेत्रात ‘स्वदेशी’च्या आग्रहामुळे स्थानिक उद्योग, कारागीर आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. जे आजच्या 'आत्मनिर्भर भारत'च्या संकल्पनेत अधिकच महत्त्वाचे ठरते.
संघाचे कार्य कोणत्याही एका क्षेत्रापुरते मर्यादित नाही. महिलांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देणे, वंचित घटकांच्या उन्नतीसाठी कार्य करणे आणि आपल्या एकतेला कमकुवत करणारे विभाजन दूर करणे, या सर्व क्षेत्रांमध्ये संघाचे योगदान स्पष्टपणे दिसून येते. माझ्या सार्वजनिक जीवनात मला वारंवार अनुभव आलेला आहे की कोणतीही शासकीय योजना तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा तिच्यात समाजाची ऊर्जा सामील होते. धोरणे केवळ आराखडा तयार करू शकतात, परंतु त्या आराखड्याला आत्मा समाजच देतो. संघ आपल्या विशाल स्वयंसेवक परिवाराच्या माध्यमातून तीच आत्मा सतत समाजाला देत आला आहे.
आपण जेव्हा २०४७ मध्ये स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या दिशेने पाहतो, तेव्हा अनेक गंभीर प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. आपण कशा प्रकारचा समाज निर्माण करू इच्छितो? आपली प्रगती केवळ विकासाच्या रचनेने आणि तंत्रज्ञानानेच मोजली जाईल का, की ती करुणा, जबाबदारी आणि एकतेनेही परिभाषित होईल? या प्रश्नाचे उत्तर देण्यात संघाची शताब्दी-दृष्टि मार्गदर्शक ठरते. ती आपल्याला स्मरण करून देते की भारताचे खरे योगदान जगाला केवळ आर्थिक प्रगतीपुरते मर्यादित नसून, 'वसुधैव कुटुंबकम्' या सनातन भावनेत आहे — जिथे संपूर्ण विश्व एकच कुटुंब मानले जाते.
संघाने गेल्या शंभर वर्षांत मौन बाळगून असेच नागरिक तयार केले आहेत. संघाचे स्वयंसेवक समर्पण, विश्वासार्हता आणि सेवाभाव यांची जिवंत उदाहरणे आहेत. म्हणूनच संघाचे शताब्दी वर्ष हे केवळ उत्सवाचे क्षण नाहीत, तर ते सेवा, समरसता आणि स्थैर्य यांच्याप्रती आपल्या सामूहिक बांधिलकीच्या 'नवचेतनेचे आव्हान' देखील आहे. आपण जेव्हा संघाच्या शताब्दी काळात प्रवेश करत आहोत, तेव्हा नागरिक म्हणून आपल्यालाही आपल्या जबाबदाऱ्यांचे पालन नव्या संकल्पाने करावे लागेल. कारण सत्य हे आहे की संघाची कथा आणि भारताची कथा या एकमेकांपासून वेगळ्या नाहीत. दोघांनीही काळानुसार आव्हानांचा सामना केला, स्वतःला बदलले आणि पुढे गेले, कारण त्यांच्या अंतःकरणात धडधडणारी आत्मा ही शाश्वत आहे.
मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळात संघ भारताचा नैतिक दिशादर्शक म्हणून कार्य करत राहील आणि आपल्या सामाजिक बांधणीला अधिक बळकट करेल. आपण सर्वांनीही स्वयंसेवकाची नम्रता, अनुशासन आणि निःस्वार्थ सेवाभाव वृत्ती आपल्या आचरणात उतरवली पाहिजे. असे करून आपण केवळ संघाच्या शंभर वर्षांचा सन्मान करणार नाही, तर त्या भारताच्या त्या यात्रेचे सहयात्री बनू, जी आपल्या देशाला विश्वात त्याच्या गंतव्य स्थानी पोहोचवेल.
- सुरेश प्रभु, माजी केंद्रीय मंत्री