‘ग्लोबल टीचर’ सुनील

    06-Oct-2025   
Total Views |

विद्यार्थ्यांना व युवकांना देशाचे सुजाण, समर्थ व सुसंस्कृत नागरिक बनवणे हे ध्येय उराशी बाळगून, प्रामाणिक प्रयत्न करणार्‍या प्राध्यापक सुनील म्हसकर यांच्याविषयी...

सुनील यांचा जन्म ठाण्यातील आदिवासी व दुर्गम तालुका असलेल्या शहापूरमधील पाली या गावात, आगरी समाजातील एका गरीब कुटुंबात झाला. ते इयत्ता पाचवीत असतानाच त्यांचे पितृछत्र हरपले. सुनील यांच्या संपूर्ण कुटुंबात कोणीही साक्षर नसल्याने, मार्गदर्शनाचा अभाव होता. त्याचबरोबर नाजूक आर्थिक परिस्थितीही अडथळा होत होती. अशा परिस्थितीत त्यांना मामांनी आधार दिला. सुनील यांनी शिक्षणासाठी मामांच्या घराची वाट धरली. त्यांनी कासणे येथील जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण वासिंद मधील सरस्वती विद्यालयात घेतले.

याक़ाळात सुनील यांना अतिशय आडवाटेने अडीच किमी अनवाणी चालत शाळेत जावे लागेे. एकीकडे शिक्षण सुरू होते, तर दुसरीकडे जगण्यासाठीची धडपडही. शिक्षणासोबतच ते आईला शेतीच्या कामातही मदत करत. इयत्ता नववी ते बारावीपर्यंत सुट्टीच्या काळात सुनील यांनी ‘जिंदाल’ कंपनीत बिगारी काम, रात्रीच्या वेळी लोखंडाच्या उष्ण भट्टीत काम, तर कधी रेल्वे गाडीत वा ‘जिंदाल’ कॉलनीत भाजीपाला व फळे विकून, पुढील शिक्षणासाठी अर्थार्जन केले. स्वावलंबन व स्वाभिमान ठेवून त्यांनी उच्च शिक्षणही पूर्ण घेतले. त्यांनी ‘एमए (मराठी)’, ‘एमए(एज्युकेशन)’, ‘एमएड’, ‘बीएड’, ‘डीएड’, ‘डिप्लोमा इन जर्नालिझम’ अशा विविध शैक्षणिक पदव्याही संपादन केल्या आहेत. ते ‘एज्युकेशन’ व ‘मराठी‘ या दोन विषयांत ‘सेट’ परीक्षाही उत्तीर्ण झाले.

सुनील सध्या ‘शिक्षणशास्त्र’ या विषयात उल्हासनगर येथील सेवा सदन शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून डॉ. हिना वाधवानी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पीएच.डी.’ करत आहेत. सुनील यांनी आपल्या तीन भावंडांना वडिलांच्या मायेने सांभाळले. सुनील यांना शिक्षक चांगले लाभल्याने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बारावीनंतर ‘डीएड’ केले. दादरला ‘डीएड’ करत असताना, ते स्वामी विवेकानंद केंद्राच्या संपर्कात आले. त्यानंतर सुनिल यांच्या जीवनाला एक नवीच कलाटणी मिळाली. ‘उठा, जागे व्हा, ध्येयसिद्धी झाल्याखेरीज थांबू नका,’ हा स्वामी विवेकानंद यांचा संदेश आणि ‘ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी संग कार्यसिद्धी’ ही जगद्गुरू संत शिरोमणी तुकोबाराय यांची शिकवण लक्षात घेऊन, समाज व राष्ट्र सेवा करण्यासाठी मित्रांच्या मदतीने १९९७ साली ‘स्वामी विवेकानंद संस्था’ पाली, शहापूर या संस्थेची स्थापना त्यांनी केली. पण, गावात केवळ एका उपर्‍या कुटुंबांतील आणि एका विधवेच्या मुलाने ही संस्था सुरू केली म्हणून काही ग्रामस्थांचा जीवघेणा विरोध झाला. पण, त्याला न जुमानता त्यांनी आजतागायत संस्थेचे कार्य सुरू ठेवले आहे.

सध्या चांगले विचार व चांगली मनोधारणा असणारे अनेक ग्रामस्थ व युवा या संस्थेशी जोडले गेले असून, उत्तम कार्य करत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, सुनील हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून, संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत मागील २८ वर्षांपासून निःस्वार्थ वृत्तीने समाजाच्या विकासासाठी मोलाचे योगदान देत आहेत. भिवंडी तालुक्यातील ‘शेतकरी उन्नती मंडळ’ काल्हेर संचालित सिताराम रामा पाटील विद्यालय, रामदास दुंदा केणो कनिष्ठ महाविद्यालय या नामांकित विद्यालयांत ते उपक्रमशील प्राध्यापक असून, त्यांच्याजवळ एकूण २८ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. विशेष म्हणजे त्यांची ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’नुसार महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद’, पुणे तर्फे तयार करण्यात येत असलेल्या नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रम विकसन तज्ज्ञ समितीवर, भाषा विषयातील तज्ज्ञ शिक्षक म्हणून निवड झाली आहे.

सुनील हे एक उत्तम लेखक, कवी, नाटककार, वाचक, समीक्षक व परीक्षक, सूत्रसंचालक व निवेदक तसेच गायकही आहेत. ते ‘शारदासूत’ या टोपणनावाने साहित्यक्षेत्रात सुपरिचित असून, विविध नामांकित अशा वर्तमानपत्रे व नियतकालिके यात त्यांचे आजतागायत अनेक लेख, कविता, कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ’, पुणे तसेच, ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,’ पुणे यांच्यातर्फे प्रकाशित होणार्‍या ‘शिक्षण संक्रमण’ आणि ‘जीवन शिक्षण’ या शासकीय मुखपत्रात, त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. ‘विश्व मराठी साहित्य परिषदे’चे आजीव सभासद असून ‘अखिल भारतीय साहित्य परिषद’, दिल्ली पुरस्कृत ‘साहित्य भारती’, कोकण प्रांतचे ते पदाधिकारीही आहेत. कल्याणच्या ‘काव्यकिरण मंडळ’ या साहित्यक्षेत्रात काम करणारे संस्थेचेही ते पदाधिकारी आहेत.

साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबाबत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांना ‘ग्लोबल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. निष्काम सेवाव्रती, आदर्श शिक्षक, सुप्रसिद्ध व्याख्याते, प्रज्ञावंत साहित्यिक, संशोधक व समीक्षक, शिक्षणतज्ज्ञ असलेल्या अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!