अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त विशेष ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

    05-Oct-2025   
Total Views |

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या सहकार्याने बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या आवारात ३ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सकाळी ९.३० ते रात्री ९.३० दरम्यान भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर ग्रंथप्रदर्शनाचे उद्धाटन ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता आमदार मनिषाताई चौधरी ह्यांच्या शुभहस्ते पार पडले. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आलेल्या या ग्रंथप्रदर्शनासाठी उपायुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

या ग्रंथ प्रदर्शनात विविध विषयांवरील मराठी भाषेतील हजारो पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या प्रदर्शनात पुस्तकांच्या खरेदीवर वाचकांना १५ टक्क्यांची विशेष सवलत देण्यात येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सुंदर सुलेखनातून साकारलेले पसायदान असलेला आकर्षक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. या सेल्फी पॉईंटसह छायाचित्र घेऊन ते आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करण्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एक्स (ट्विटर), इन्स्टाग्राम वा फेसबुक या सोशल मीडिया हँडलला 'टॅग' करणाऱ्या वाचकांना ५ टक्क्यांची अतिरिक्त सवलत बहाल करण्यात येणार आहे. यामुळे वाचकांना पुस्तकांच्या खरेदीवर तब्बल २० टक्क्यांची सवलत मिळू शकणार आहे.

या ग्रंथ प्रदर्शनाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथ प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी अर्थात ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी भाग्यवान पुस्तक खरेदीदारांची निवड सोडतीच्या अर्थात 'लकी ड्रॉ' च्या आधारे करण्यात येणार आहे. यानुसार निवडण्यात येणाऱ्या पाच भाग्यवान वाचकांना दिवाळी अंकांचा संच ग्रंथाली ह्या संस्थेतर्फे मोफत भेट स्वरूप देण्यात येणार आहे.


मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.