मुंबई : चुकीचे कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी शिष्टमंडळ बैठकीत दिल्याची माहिती महसूलमंत्री तथा ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे ओबीसी शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, इतर मागास व बहुजन कल्याण दुग्धविकास मंत्री अतुल सावे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ओबीसी संघटनांचे सुमारे ४० प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात ओबीसी शिष्टमंडळाच्या मनात जीआरबाबत असलेले संभ्रम आणि त्यांचे म्हणणे आम्ही ऐकून घेतले. महाज्योतीला निधी मिळणे, ओबीसी वसतीगृहे, ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना उद्योगाकरिता सवलती, कमी व्याज दराचे कर्ज या सर्व बाबींवर चर्चा झाली. पात्र लोकांनाच मराठा कुणबी, कुणबी मराठा प्रमाणत्र द्यावे. सरसकट जीआरचा फायदा घेऊन खोटे प्रमाणपत्र देऊ नये, अशी यावेळी मागणी होती. तसेच काही अधिकाऱ्यांनी खोटे प्रमाणपत्र दिल्याचे किंवा खोडतोड केल्याचे दाखले मंत्री छगन भुजबळ यांनी मांडले. त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांनी खोटे प्रमाणपत्र दिले किंवा एखाद्याने खोटे दाखले तयार केले तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होती."
"कुठलेही खोटे प्रमाणपत्र काढले असेल किंवा खोडतोड केली असेल तर संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार ठरवून त्याच्यावर कारवाई होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही आणि ओबीसी आणि मराठा समाजात कुठलाही संघर्ष निर्माण होणार नाही, याची काळजी शासन घेईल. कुणीही चुकीचे प्रमाणपत्र काढले तर त्या अधिकाऱ्यावर आणि खोटे प्रमाणपत्र करणाऱ्यांवर कारवाई होईल," असेही त्यांनी सांगितले.
मोर्चा मागे घ्यावा
"राज्याच्या पूर परिस्थितीचा विचार करून ओबीसी संघटनांनी बोलवलेला मोर्चा मागे घ्यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी विजय वडेट्टीवारांसह सर्व शिष्टमंडळाला केली आहे. सरकारकडे पूर्ण माहिती आल्याशिवाय कुठलीही श्वेतपत्रिका काढता येत नाही. कोणत्या अधिकाऱ्याने कोणते प्रमाणपत्र दिले याबद्दलची माहिती आम्ही मागवणार असून त्यात खोटे प्रमाणपत्र दिले असल्याचे लक्षात आल्यास त्यावर शासन निर्णय घेईल. पण त्याआधी ओबीसी उपसमिती ते तपासून घेईल. शासन निर्णयाचा दुरुपयोग करून आमच्या अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रमाणपत्र दिले असल्यास त्याची तपासणी होईल," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरे केव्हाच हिंदूत्वापासून दूर गेले
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी कडवटपणा घेतला. आम्ही कधीच घेतला नाही. २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या सर्व सूचनांचा मानसन्मान केला. त्यांचा शब्द न् शब्द पाळला गेला. पण देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याच्या वेळी त्यांनी घुमजाव केला. आता तर त्यांच्या खासदारांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे ध्वज फडकत आहेत. त्यामुळे भूमिकेपासून ते दूर गेलेत. काँग्रेस पक्ष वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत असताना राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून ते बसले. ते हिंदूत्वापासून दूर गेले. त्यामुळे विधानसभेच्या निवडणूकीत लोकांनी तुम्हाला जागा दाखवली असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतही ते तुमची जागा दाखवतील. ५१ टक्क्यांची लढाई पुन्हा महायूतीच जिंकेल. उद्धव ठाकरे केव्हाच हिंदूत्वापासून दूर गेले," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.