जगातील सर्वांत उंच पूल

Total Views |

जगातील सर्वांत उंच पुलाचे नुकतेच चीनमध्ये लोकार्पण करण्यात आले. तब्बल 4 हजार, 600 फूट उंचीवर असणारा हा पूल, दोन विभागांतील दोन तासांचे अंतर अवघ्या दोन मिनिटांवर आणणार आहे. हुआजियांग ग्रॅण्ड कॅन्यन ब्रिज दक्षिण चीनच्या गुईझोऊ प्रांतात, नदी आणि दरीपासून सुमारे 2 हजार, 050 फूट उंच आहे. अमेरिकेतील सर्वांत उंच रॉयल गॉर्ज ब्रिजपेक्षा दुप्पट उंचीचा हा पूल आहे, जो कोलोरॅडोमधील अर्कांसस नदीपासून 956 फूट उंच आहे, तर सॅन फ्रान्सिस्कोच्या गोल्डन गेट ब्रिजपेक्षा जवळजवळ नऊपट उंच आहे.

चीनने पायाभुत सोयीसुविधांच्या उभारणीच्या महत्त्वाकांक्षी ध्येयामध्ये आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. गुईझोऊ प्रांतातील हुआजियांग ग्रॅण्ड कॅन्यन ब्रिज हा जगातील सर्वांत उंच पूल, येत्या दि. 28 सप्टेंबर रोजी अधिकृतरित्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा पूल बेइपान नदीच्या खोऱ्यापासून, तब्बल 625 मीटर उंचीवर उभा आहे. यामुळे दोन तासांचा प्रवास आता फक्त दोन मिनिटांच्या आत पार होतो. 2 हजार, 890 मीटर लांबीचा आणि 1 हजार, 420 मीटर मुख्य स्पॅन असलेला हा पूल, लिउपांशुई शहरातील लिऊझी जिल्हा आणि ॲनलोंग काऊंटी यांना जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गाचा महत्त्वाचा भाग ठरतो.

या पुलाचा मुख्य आराखडा 93 स्टील लॅटिस सेगमेंट्सवर आधारित आहे. या संरचनेचे एकूण वजन तब्बल 44 दशलक्ष पाऊंड आहे. गुईझोऊ हायवे ग्रुपचे मुख्य अभियंता झांग शेंगलीन यांनी, या प्रकल्पाला सुपर प्रोजेक्ट अशी उपमा दिली. त्यांच्या मते हा पूल केवळ वाहतुकीसाठीच नाही, तर चीनच्या अधोसंरचना उभारणीतील महत्त्वाकांक्षी ध्येयांचे प्रतीक आहे. हुआजियांग ग्रॅण्ड कॅन्यन ब्रिज एका अशा भागावर बांधण्यात आला आहे, ज्याला स्थानिक भाषेत पृथ्वीची फॉल्ट लाईन असे संबोधले जाते. या भागातील गुंतागुंतीच्या भूगभय परिस्थितीने, अभियंत्यांसमोर प्रचंड आव्हाने निर्माण केली. मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञान, अचूक नियोजन आणि प्रयत्नांतील सातत्यामुळे हे आव्हान यशस्वीरित्या पार करण्यात आले.

गुईझोऊ प्रांत हा चीनमधील सर्वांत डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो. येथे वाहतूक व दळणवळण मोठे आव्हान मानले जाते मात्र, या प्रांताने गेल्या काही दशकांत पूल उभारणीत जगभरात विशेष स्थान मिळवले आहे. आज गुईझोऊला ब्रिज प्रॉव्हिन्स म्हटले जाते. येथे तब्बल 32 हजारांहून अधिक पूल उभारले गेले आहेत किंवा बांधकामाधीन आहेत. हुआजियांग ब्रिज हा केवळ अभियांत्रिकीतील कौशल्याचा नमुना नाही, तर आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. 1.87 अब्ज युआन (अंदाजे 262 दशलक्ष अमेरिकन डॉलर) इतक्या खर्चातून, हा पूल उभारण्यात आला. याची रचना स्टील ट्रस सस्पेन्शन प्रकारातील असून, ट्रसचे एकूण वजन सुमारे 22 हजार टन आहे. हा भार आयफेल टॉवरच्या वजनाच्या दुप्पट आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम जानेवारी 2022 साली सुरू झाले. जवळपास चार वर्षांच्या अखंड प्रयत्नांनंतर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. पर्यटनाच्या दृष्टीनेही या पुलाचे महत्त्व आहे. पुलाच्या माथ्यावर 800 मीटर उंचीवर एक कॅफे तयार करण्यात आले असून, तेथे पोहोचण्यासाठी 207 मीटर उंचीची लिफ्ट बांधली आहे. याशिवाय एक हजार चौ.मी.चे काचांचे निरीक्षण कक्ष पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. येथे बंजी जम्पिंग आणि लो-एल्टिट्यूड स्कायडायव्हिंग सारखे खेळही उपलब्ध करून दिले आहेत.

चीनने गेल्या काही दशकांत आपल्या दुर्गम प्रांतांना देशातील इतर भागांशी जोडण्यासाठी महामार्ग, पूल आणि बोगद्यांचे प्रचंड जाळे उभारले आहे. गुईझोऊ प्रांतातीलच बेइपांजियांग ब्रिज हा जगातील उंच पुलांपैकी एक आहे. या पूलावरून आता चार-लेन वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रांतातील दळणवळण सुलभ झाले असून, प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. यामुळे व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि सामाजिक आदानप्रदान यांना मोठा वेग मिळणार आहे. चीनच्या कनेक्टिव्हिटी ड्राईव्हमधील हा पूल एक प्रतीकात्मक टप्पा मानला जातो. जगातील सर्वांत उंच पूल म्हणून नोंद झालेला हा प्रकल्प अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा चमत्कार तर आहेच पण, भविष्यातील विकासाचे नवे दालन उघडणारा ठरला आहे. डोंगराळ भूभागामुळे वेगळे राहिलेले गुईझोऊ आता राष्ट्रीय महामार्ग व आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे उमटणार, हे निश्चित आहे.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.