केडीएमसीच्या शालेय जिल्हास्तरीय योगा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० विद्यार्थी/विद्यार्थीनींचा सहभाग

    04-Oct-2025   
Total Views |

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने डोंबिवलीच्या प्रगती महाविद्यालयात १४ ते १९ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शालेय जिल्हास्तरीय योगा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत तब्बल ३०० विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धकांना आकर्षक मेडल्स देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

शारीरिक लवचिकता, स्नायूंची ताकद, संतुलनात सुधारणा, हृदय व रक्तवाहिन्यांसंह रक्तदाबात नियंत्रण, उत्तम पचनक्रिया, मानसिक ताणतणावातून दूर, चिंता कमी होते, एकाग्रता वाढते, मनःस्थिती सुधारते आणि एकूणच शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, ही सारी किमया योगासनांमुळे होत असल्याने केडीएमसीने हा धागा पकडून २७ सप्टेंबर रोजी १४, १७ आणि १९ वयोगटातील मुले आणि १ ऑक्टोबर रोजी १४, १७ आणि १९ वयोगटातील मुलींसाठी योगाच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धांमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील मुलांमध्ये एकूण १४० विद्यार्थी, तसेच मुलींमध्ये १६० विद्यार्थीनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त/पदाधिकारी विष्णू म्हात्रे, एकनाथ पाटील, भगवान पाटील, तसेच महाराष्ट्र योगा असोसिएशनचे सेक्रेटरी राजेश पवार आणि प्रगती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय वानखडे यांची उपस्थित होते. यंदा प्रथमच ट्रॅडिशनलसह आर्टिस्टिक आणि रिदमिकचा वापर करण्यात आला होता. स्पर्धकांचा सहभाग पाहून विभागीय स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्याचे नाव हे स्पर्धक तथा विद्यार्थी निश्चितच उज्वल करतील, असा विश्वास महाराष्ट्र योगा असोसिएशनचे सेक्रेटरी राजेश पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. तसेच जगन्नाथ पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नियमित योगा व आपल्या आजूबाजूच्या किमान १० लोकांना योगाचे महत्व पटवून द्यायला हवे, असे मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. धनंजय वानखडे यांनी विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक, योग मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्याचबरोबर अभ्यासामध्ये एकाग्रता महत्त्वाची असते, योगामुळे या विद्यार्थ्यांना निश्चितच योगाचा फायदा होईल असे मत व्यक्त करून पुढील विभागीय स्पर्धांसाठी योग स्पर्धेतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे क्रीडा शिक्षक व पर्यवेक्षक लक्ष्मण इंगळे यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.