जपानी मंत्र्यांकडून बुलेट ट्रेन प्रकल्पाची पाहणी; जपानच्या मंत्र्यांचा वंदे भारतने प्रवास

Total Views |

मुंबई : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि जपानचे जमीन, पायाभूत सुविधा, वाहतूक आणि पर्यटन मंत्री हिरोमासा नाकानो यांनी सुरत आणि मुंबई येथील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ठिकाणांना भेट दिली. शुक्रवार,दि.३ रोजी झालेल्या या भेटीदरम्यान प्रकल्पाचा आढावा घेण्यासोबतच प्रगतीबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान जपानचे महामहिम मंत्री हिरोमासा नकानो सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले, जिथे त्यांचे पारंपारिक गरब्याने स्वागत करण्यात आले. यावेळी सुरतचे खासदार मुकेश दलाल, महापौर दक्षेश मावानी, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, एनएचएसआरसीएल आणि जिल्हा प्रशासन जपानी मंत्र्यांच्या स्वागत समारंभात उपस्थित होते.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महामहिम हिरोमासा नाकानो यांच्यासमवेत सुरत आणि मुंबई हाय-स्पीड रेल बांधकाम स्थळाला भेट दिली. दोन्ही मंत्र्यांनी प्रकल्पाच्या प्रमुख बाबींचा आढावा घेतला, ज्यामध्ये ट्रॅक स्लॅब लेइंग कार आणि ट्रॅक स्लॅब अ‍ॅडजस्टमेंट सुविधा यांचा समावेश होता. त्यांनी व्हायाडक्टवर जे-स्लॅब बॅलास्टलेस ट्रॅक सिस्टमची स्थापना पाहिली. ट्रॅक स्लॅब बसवणे आणि कायमस्वरूपी रेल्वे टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. यानंतर त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले. मुंबईतील बीकेसी एचएसआर स्टेशनला भेट दिली. बीकेसी हे मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरवरील एकमेव भूमिगत स्टेशन आहे.

जपानच्या मंत्र्यांचा वंदे भारतने प्रवास

यावेळी दोघांनीही सुरत ते मुंबई असा वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केला. यानंतर त्यांनी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) बुलेट ट्रेन स्टेशनच्या प्रगतीचा आढावा घेतला. मंत्री नाकानो आणि जपानी टीमने वंदे भारत ट्रेनच्या गुणवत्तेबद्दल आनंद व्यक्त केला. या पाहणीनंतर दोन्ही मंत्र्यांनी कामाच्या गुणवत्तेबद्दल आणि गतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि बांधकामाच्या गतीचे कौतुक केले. ही भेट भारताच्या पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या प्रगतीसाठी भारत आणि जपानमधील मजबूत सहकार्याचे प्रतिबिंब आहे.


गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.