गोरेगाव – मुलुंड अंतर केवळ २५ मिनिटांत पार; उड्डाणपुल मे २०२६ मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार

Total Views |

मुंबई : गोरेगाव - मुलुंड जोडमार्ग प्रकल्‍प अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान उभारण्‍यात येणा-या उड्डाणपुलाचे बांधकाम अंमलबजावणीच्या प्रगत टप्प्यावर आहे. या प्रकल्पातील एकूण ३१ खांबांपैकी २७ खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. उर्वरित अनुषंगिक कामे पूर्ण करून दि.१६ मे २०२६ पर्यंत हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्‍याचे मुंबई महानगरपालिकेचे उद्दिष्‍ट आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर गोरेगाव-मुलुंड हे अंतर केवळ २५ मिनिटांत पार करणे शक्य होईल.

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी महानगरपालिका मुख्यालयात या उड्डाणपुलाच्या प्रगतिचा आढावा घेतला. या बैठकीस प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, कार्यकारी अभियंता नरेश मेघराजानी यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंता उपस्थित होते.

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग हा मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता आहे. विशेषत: उत्तर मुंबईतील वाहतुकीस याचा मोठा फायदा होणार आहे. सुमारे १२.२० किलोमीटरच्‍या या प्रकल्पामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांदरम्यान नवीन जोडरस्ता तयार होईल आणि नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. गोरेगाव ते मुलुंडदरम्यान प्रवासाचा कालावधी ७५ मिनिटांवरून सुमारे २५ मिनिटांपर्यंत कमी होईल. इंधन वापरात बचत होण्यासह मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशांकातही (एक्यूआय) सुधारणा होणार आहे.

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. टप्पा ३ (अ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरी बांधकामाचा समावेश आहे. या प्रकल्प अंतर्गत दिंडोशी-गोरेगाव-दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान सहापदरी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याची लांबी १,२६५ मीटर आहे. उड्डाणपुलासाठी बॉक्स गर्डर व काँक्रिटचा वापर केला जात आहे. तसेच, रस्ता ओलांडण्याकरिता पादचारी पूल, स्वयंचलित सरकता जिन्याची सुविधा उपलब्‍ध करून दिली जाणार आहे. या उड्डाणपुलाची उभारणी दोन टप्प्यांत करण्यात येत असून त्यामध्ये गोरेगाव बाजू आणि मुलुंड बाजू असे दोन भाग आहेत. उड्डाणपुलाच्‍या दुस-या टप्‍प्‍याअंतर्गत मुलुंड बाजूकडे काही बांधकामे बाधित होत आहेत. बाधित बांधकामांची पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करुन ती जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल. जेणेकरुन, या भागातील पुलाच्या कामास गती मिळेल.


गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.