राष्ट्रकुल संसदीय परिषदेसाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांची निवड

    04-Oct-2025   
Total Views |

नांदेड : जागतिक स्तरावरील शांतता , सुरक्षितता आणि वैश्विक विकासाच्या अनुषंगाने काम करणार्‍या आंतरराष्ट्रीय संसद परिषदेचे ६८ वे आंतरराष्ट्रीय संमेलन येत्या ५ ते १५ ऑक्टोबर दरम्यान बारबाडोस येथे पार पडणार असून या जागतिक संमेलनासाठी भारतातून लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या नेतृत्वात राज्यसभा उपसभापती हरिवंश सिंह , यांच्यासोबत खा. डॉ. अजित गोपछडे यांची निवड करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात या जागतिक संमेलनासाठी निवड होणारे ते मराठवाड्यातील पहिले खासदार ठरले आहेत.

राष्ट्रकुल संसदीय परिषद ही राष्ट्रकुल सदस्य देशांमधील संसदीय सदस्यांची एक संघटना आहे. जगभरातील तब्बल ५६ स्वतंत्र राष्ट्रांचा या परिषदेत सहभाग आहे. या परिषदेत लोकशाही, सुशासन आणि मानवी हक्कांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी व अनुभव सामायिक करण्यासाठी एकत्र चर्चा सत्र आयोजित केले जातात.

लोकशाही, मानवी हक्क, सुशासन आणि शांतता यांसारख्या समान तत्त्वांवर आणि मुद्द्यांवर चर्चा करणे, सदस्य देशांमधील संसदीय प्रणाली आणि प्रशासनातील अनुभव एकमेकांना सामायिक करणे. सदस्य देशांमध्ये सहकार्याचे संबंध प्रस्थापित करणे यासोबतच जागतिक शांतता , सुरक्षितता , जागतिक आरोग्य , आंतरराष्ट्रीय दहशतवाद , आतंकवाद निर्मूलन , बदलते पर्यावरण यासारख्या अनेक महत्वपूर्ण विषयांवर या परिषदेत चर्च केली जाणार आहे . जागतिक विकासासाठी प्रभावी ध्येय धोरणे निश्चित करून त्यांची अंमलबजावणीही केली जाते. यावर्षीचे राष्ट्रीय संसद परिषद ( कॉमनवेल्थ पार्लमेंटरी कॉन्फरन्स) दिनांक ५ ते १५ऑक्टोबर दरम्यान ब्रिजटाउन बारबाडोस येथे पार पडणार आहे. या परिषदेसाठी भारतातून लोकसभा सभापती ओम बिर्ला , राज्यसभा उपसभापती हरिवंश सिंह, यांच्या सोबतच राज्यसभा खासदार रेखा शर्मा , खा. पुरंदेश्वरी, खा. विष्णु दत्त शर्मा, खा. डॉ के. सुधाकर, खा. अनुराग शर्मा आणि खा. डॉ. अजित गोपछडे यांची निवड करण्यात आली आहे . वैश्विक स्तरावरील अनेक महत्त्वपूर्ण चर्चांमध्ये सहभागी होण्याची संधी खा. डॉ. अजित गोपछडे यांना प्राप्त झाली आहे.

राष्ट्रकुल संसदीय परिषदेच्या या आंतरराष्ट्रीय संसदीय संमेलनात भारतातून लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या नेतृत्वात राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह यांच्यासह माझी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे मला जागतिक स्तरावरील पर्यावरण ,दहशतवाद , लोकशाही, सुशासन,जागतिक आरोग्य , शांतता , सुरक्षितता आदी महत्त्वपूर्ण विषयावरील चर्चांमध्ये सहभागी होता येणार आहे. या निवडीबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी , गृहमंत्री अमित भाई शहा , उप राष्ट्रपती सी पी राधा कृष्णन जी ,लोकसभेचे सभापती ओम बिर्ला , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो.
- खा. डॉ.अजित गोपछडे


योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.