मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास कदम यांच्या पत्नीच्या मृत्यूवरून सध्या राज्यात घमासान माजले आहे. शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी यावरून दोन्ही शिवसेनेत खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे यांनी दोन दिवस त्यांच्या पार्थिवाचा छळ केला. याबद्दल उद्धव ठाकरे यांची नार्कोटेस्ट करावी. त्यांनी बाळासाहेबांच्या हातांचे ठसे घेतले असून त्याचा उपयोग कशासाठी केला हे जनतेला कळले पाहिजे. त्यावेळी दोन दिवस मातोश्रीमध्ये कुणालाही प्रवेश नव्हता. उद्धव ठाकरे दिसतात तसे नाहीत, असा आरोप रामदास कदम यांनी केला होता.
त्यानंतर उबाठा गटाचे नेते अनिल परब यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत कदम यांच्यावर पलटवार केला. "बाळासाहेब ज्या खोलीत होते तिथे २४ तास डॉक्टरांचे पथक होते. रामदास कदम यांनी खोटे आरोप केल्याबद्दल मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. तसेच १९९३ साली ज्योती रामदास कदम यांनी स्वत:ला जाळून घेतले की, त्यांना जाळले गेले याचीही नार्कोटेस्ट व्हायला हवी. खेडमध्ये कुणाला बंगले बांधून दिले हेसुद्धा पुढे आले पाहिजे. तसेच रामदास कदम यांच्या पुतण्याने का आत्महत्या केली, याचाही शोध घ्यावा," अशी मागणी अनिल परब यांनी केली.
मानहानीचा दावा करणार - कदम
यानंतर रामदास कदम यांनी त्यांची नार्को टेस्टची तयारी असल्याचे सांगितले. पण त्यातून काही सिद्ध झाले नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते सांगा. माझी पत्नी खेडला दोन स्टोव्हवर जेवण बनवत होती. तिच्या साडीला आग लागली आणि आगीचा भडका उडाला. मी तिला वाचवले. त्यावेळी माझे हात भाजले. सहा महिने माझी पत्नी जसलोक रुग्णालयात होती. मीही तिथेच होतो. बाळासाहेब स्वत: माझ्या पत्नीच्या भेटीला आले होते. आजही आम्ही जीवाभावाने संसार करतो. तुम्ही अशी बदनामी केल्यास मी मानहानीचा दावा करेन. माझ्या पत्नीचे नाव काढल्यामुळे मला वेदना झाल्या, असे रामदास कदम म्हणाले. तसेच मला आणि डॉक्टरांना खोटे ठरवत असाल तर मला न्यायालयात जावे लागेल असे म्हणत त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....