शताब्दी वर्षात संघ देशभरात एक लाखांहून अधिक हिंदू संमेलनांचे आयोजन करणार

Total Views |
Rashtriya Swayamsevak Sangh
 
मुंबई : ( Rashtriya Swayamsevak Sangh ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त देशभरात एक लाखाहून अधिक हिंदू संमेलन आयोजित करणार आहे. तसेच स्वयंसेवक घराघरात जाऊन समाजाशी संवाद साधणार आहेत. या माध्यमातून संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत हे स्वतः विविध राज्यांमध्ये भेटी देऊन थेट संवाद साधणार असल्याची माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी माध्यमांना दिली.
 
या अनुषंगाने संघाची अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात येत आहे. या बैठकीत देशातील सामाजिक परिस्थितीवर चिंतन होणार असून, आगामी वर्षांतील कार्यक्रमांची दिशा आणि रूपरेषा निश्चित केली जाणार आहे.
 
आंबेकर यांनी सांगितले की, गृह संपर्क अभियान अंतर्गत समाजातील प्रत्येक घरापर्यंत संघविचार पोहचवण्याचा मानस आहे. त्याचबरोबर गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या हुतात्मा वर्षानिमित्त आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विशेष साहित्य आणि कार्यक्रमांची आखणीही या बैठकीत केली जाणार आहे.
 
 
ते पुढे म्हणाले की, शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हिंदू संमेलने घेतली जाणार आहेत. या माध्यमातून समाजातील सर्व घटकांमध्ये एकात्मता, संवाद आणि सामाजिक समरसतेचा संदेश पोहोचविण्याचा उद्देश आहे. संघाचे हिंदू संमेलन हे अभियान देशभरात सुमारे १ लाखाहून अधिक ठिकाणी व्हावे यासाठी नियोजन केले जाणार आहे. सरसंघचालक मोहनजी भागवत शताब्दी वर्षाच्या निमित्ताने देशभर प्रवास करणार आहेत. या प्रवासात ते विविध सार्वजनिक सभांमध्ये आणि संवाद सत्रांमध्ये सहभागी होतील. दिल्लीतील शताब्दी वर्षाच्या तीन दिवसीय व्याख्यानासारखेच बेंगळुरू, कोलकाता आणि मुंबई याठिकाणी अनुक्रमे ८ आणि ९ नोव्हेंबर, २१ डिसेंबर आणि ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे.
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.