मुंबईत विमानतळावर 'गिबन'ची तस्करी

    30-Oct-2025
Total Views |
exotic animal


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळावरुन गुरुवार दि. ३० आॅक्टोबर रोजी पहाटे मुंबई कस्टम विभागाकडून दोन गिबन प्रजातीच्या परदेशी माकडांची तस्करी उघडकीस आणण्यात आली (exotic animal). मुंबई विमानतळावरुन जुलै ते आॅक्टोबर या काळात परदेशी वन्यजीवांच्या तस्करीचे हे १९ वे प्रकरण असून यामाध्यमातून ६०० हून अधिक परदेशी वन्यजीवांना ताब्यात घेण्यात आले आहे (exotic animal).
 
 
गुरुवारी पहाटे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलॅण्डवरुन आलेल्या एअर इंडिया कंपनीच्या विमानात मुंबई कस्टमच्या अधिकाऱ्यांना काही वन्यजीव सापडले. सामानाची तपासणी केली असता अधिकाऱ्यांना सामानात दोन माकडे आढळून आली. ती सिल्वर गिबन या प्रजातीची माकडे होती. त्यामधील एक माकड हे प्रवासादरम्यान मृत्यू पावले होते. तपासणीअंती या मालाची वाहतूक करणाऱ्या एका मलेशियन रहिवाशाला मुंबई कस्टम अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात आली. जीवंत राहिलेल्या एका माकडाच्या सुरक्षित हाताळणी आणि वैद्यकीय मदतीसाठी 'डब्लूडब्लूए' या संस्थेच्या वन्यजीव बचाव पथकाला पाचारण करण्यात आले.
 
परदेशी प्राणी हे सायटीस (संकटग्रस्त प्रजातींसाठी आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिवेशन) आणि वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२अंतर्गत संरक्षित आहेत. त्यामुळे या अटक केलेल्या परदेशी नागरिकावर सीमाशुल्क कायदा, १९६२ आणि वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाने जारी केलेल्या कायद्यांच्या तरतुदींनुसार जीवंत राहिलेल्या एका माकडला पुन्हा थायलॅण्डला पाठवण्यात आले. मात्र, यानिमित्ताने मुंबई विमानतळवर परदेशी वन्यजीवांच्या तस्करीचे सत्र सुरूच असल्याचे निदर्शनास येत आहे.