तिसर्‍या मुंबईचे विकासचित्र

Total Views |

नवी मुंबई विमानतळाची प्रतिक्षा येत्या काही दिवसात संपणार आहे. येत्या दि. ८ ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण होत असून, त्यानंतर हे विमानतळ देशवासीयांच्या सेवेमध्ये रुजू होईल. नवी मुंबई विमानतळाचे राष्ट्रार्पण हा मुंबईकरांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण! या विमानतळाचा एकूणच प्रवास हा संघर्षमय राहिला आहे. सुरुवातीला भूसंपादनापासून, विमानतळाच्या नामांतरणापर्यंतचा संघर्षही मुंबईकरांनी अनुभवला. या विमानतळामुळे तब्बल ८३ वर्षांनंतर मुंबईकरांना दुसरे विमानतळ प्रवासासाठी खुले होणार आहे. नवी मुंबई विमानतळासह दोन विमानतळ असणारे मुंबई हे पहिलेच शहर ठरणार आहे.

सद्यःस्थितीत मुंबईकरांना सर्व प्रकारच्या विमान प्रवासासाठी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हाच एकमेव पर्याय आहे. मुंबई विमानतळ हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीच्या बाबतीत दिल्लीनंतरचे देशातील दुसरे सर्वांत व्यस्त विमानतळ आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रवासी वाहतुकीच्या बाबतीत आशियातील नववे सर्वांत व्यस्त विमानतळ आणि जगातील २५वे सर्वांत व्यस्त विमानतळही ठरले होते. मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण १९४२ साली अर्थात ८३ वर्षांपूर्वी करण्यात आले. १९९९ साली त्याचे नामकरण पूर्वीच्या ‘सहार विमानतळ’वरून ‘छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे ठेवण्यात आले.

आज मुंबई शहराचे जागतिक पातळीवर वाढते महत्त्व आणि त्यानुषंगाने मुंबईकडे प्रस्थान करणार्‍या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, आगामी काळात मुंबई विमानतळाची क्षमता आणखी वाढविण्याचे नियोजन आहे. अशावेळी नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची मुहूर्तमेढ, आयटी कंपन्यांचा वाढता कल आणि नवी मुंबईसह तिसर्‍या मुंबईच्या निर्मितीचे राज्य सरकारचे व्हिजन, यांसाठी नवी मुंबई विमानतळ हा एक गेमचेंजर प्रकल्प ठरणार आहे. या नव्या विमानतळावरून लवकरच उड्डाणांना प्रारंभ होईल. अशावेळी आता विरोधकांकडून विमानतळाच्या नामांतरणाचा असलेला वादाला खतपाणी घालण्याचे काम केले जात आहे मात्र, यावरही तोडगा काढत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमानतळाला लोकनेते ‘दि.बा. पाटील’ यांचेच नाव देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला असल्याचे स्पष्ट केल्याने, विमानतळाच्या राष्ट्रसेवेतील अडचण दूर झाल्याचीच चिन्हे आहेत.


मुंबईकरांचे मत विकासालाच


नवी मुंबई विमातळाच्या लोकार्पणासोबतच मुंबईकरांचा दैनंदिन प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी, बहुप्रतीक्षित अशा ‘मुंबई मेट्रो ३’च्या उर्वरित तिसर्‍या टप्प्याचेही लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. ८ ऑक्टोबर रोजी होत आहे. कुलाबा-वांद्रे-सिप्झ असा हा एकूण ३३.५ किमीचा भूमिगत मेट्रो कॉरिडोर आहे. याच्या एकूण २७ स्थानकांपैकी केवळ एक स्थानक जमिनीवर असून, इतर सर्व स्थानके भूमिगत आहेत. वरळी ते कुलाबा हा या प्रकल्पाचा अंतिम टप्पा मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. मुंबई मेट्रो तीन या प्रकल्पाला २०१८ साली मान्यता मिळाली. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबईतील वाहतुककोंडीवर उपाययोजना आणि शहराच्या कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा करण्यासाठी साकरण्यात आला.

आज ही मेट्रो मार्गिका मुंबईच्या पोटातून अभूतपूर्ण प्रवासाचा अनुभव देते आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच मेट्रो मार्ग ३ ‘क्वा लाईन टप्पा १’ आरे जेव्हीएलआर ते बीकेसी असा १२.६९ किमी सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी) या ‘२-अ’ या टप्प्याचे लोकार्पण दि. ९ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या सेवेला मुंबईकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शेवटचा टप्पा कार्यान्वित झाल्यावर प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज वर्तवाला जात आहे. या प्रकल्पाची पूर्तता आणि मुंबईकरांचा प्रतिसाद ही एका मोठ्या राजकीय अहंकाराला मुंबईकरांनी दिलेली चपराक आहे.

‘मुंबई मेट्रो ३’ तांत्रिक आव्हानांबरोबरच राजकीय आव्हानेही होती. ज्या ठाकरे पिता-पुत्रांनी आरे कारशेडवरून हा प्रकल्प ठप्प केला, त्याच आदित्य ठाकरेंनी एकदा वाहतुककोंडीमुळे वेळेवर सभास्थळ गाठण्यासाठी ‘मुंबई मेट्रो ३’चा आधार घेतल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित केला होता. मुंबईकरांनी ट्रोल करताच आदित्य ठाकरेंवर हा व्हिडिओ असणारे ‘ट्विट’ डिलीट करण्याची नामुष्की ओढवली. मुंबईकर तो अहंकार विसरले नसल्याचेच हे लक्षण म्हणावे. त्यामुळे जेव्हा २५ वर्षांत मुंबईकरांसाठी केलेल्या कामांची यादी देण्याची वेळ येईल, तेव्हा तेव्हा महायुतीचे पारडे नक्कीच जड असेल. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्येही महायुतीने केलेल्या विकास प्रकल्पांचीच छाप दिसून येईल. मुंबईकर त्यांचे अमूल्य मत हे विकासलाच देतील, यामध्ये तिळमात्र शंका नाही.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.