देशातल्या सर्व विद्यापीठांमध्ये मराठी पोहोचवू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मान्यवरांच्या उपस्थितीत अभिजात मराठी भाषा दिन उत्साहात संपन्न

    03-Oct-2025   
Total Views |


मुंबई : (Abhijat Marathi Bhasha Din) "मराठी भाषा ही भारताला संस्कृती देणारी अभिजात भाषा आहे. ज्या प्रकारे दिल्लीच्या जवाहलाल नेहरु विद्यापीठामध्ये आपण मराठी भाषेचं विशेष अध्यासन केंद्र सुरु केलं, त्या प्रकारे देशाच्या इतर विद्यापीठांमध्ये देखील आपल्याला मराठी भाषा पोहोचवायची आहे " असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
अभिजात मराठी भाषा सप्ताहच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की " मराठी भाषा ही मूळातच अभिजात होती. त्यावर राजमान्यतेची मोहर आपण अभिजात दर्जाच्या निमित्ताने उमटवली. खरं तर हा आपल्या सगळ्यांचा सन्मान आहे. ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिकेपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वचिंतनापर्यंत मराठी भाषेचा हा प्रवाह उत्तरोत्तर समृद्ध होत गेला. मराठी ही एकमेव भाषा आहे, जिथे २०० हून अधिक संमेलनं होतात, आणि या साहित्यसंमेलनांमध्ये कोट्यावधी रुपयांच्या पुस्तकांची विक्री होते. आताच्या डिजिटल युगामध्ये आपल्याला मराठी भाषा आणखी सर्वत्र पोहोचवण्यासाठी काम करायचे आहे आणि यासाठी कुठल्याही प्रकारे संसाधनांची मी कमी पडू देणार नाही अशी मुख्यमंत्री म्हणून मी ग्वाही देतो."
 
दि. ३ ऑक्टोबर रोजी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिर येथे अभिजात मराठी भाषा सन्मान दिन २०२५ निमित्त ' अभिजात मराठी भाषा सप्ताह उद्धाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री अॅड मंगलप्रभात लोढा, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद डॉ. मनिषा कायंदे, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र शोभणे, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप ढवळ, सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
सदर कार्यक्रमाची सुरुवात सुश्राव्य संगीत कार्यक्रमाने झाली ज्यामध्ये रोहित सरनौबत आणि त्यांच्या चमूने अजरामर मराठी गीतांचे बहारदार सादरीकरण केले. राज्याचे भाषा मंत्री मा. डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते हेमांगी व नवभारत या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी पार पडले, त्याचबरोबर आकाशवाणीवरील मुलाखतींच्या विशेष पुस्तकाचा सुद्धा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना भाषामंत्री उदय सामंत म्हणाले की " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा आम्हा सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये हा सन्मान आपण स्विकारला. अभिजात भाषेचा हा समृद्ध ठेवा आपल्याला जतन करायाचा आहेच, परंतु तो पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा न्यायचा आहे. कुसुमाग्रजांचे गाव अशी ओळख असलेले शिरवाडे हे गाव - इथे आपण मराठीचा भव्य महोत्सव येणाऱ्या काळात साजरा होणार आहे."
 
राज्याचे मुख्यमंत्री यांच्याहस्ते विशेष 'माय स्टॅम्प' टपाल तिकिटाचे आणि विशेष टपाल पाकिटाचे अनावरण यावेळी करण्यात आले. या प्रसंगी मुख्य पोस्ट मास्तर जनरल अमिताभ सिंह उपस्थित होते. त्याचबरोबर 'अभिजात मराठीची गौरवगाथा' या ग्रंथाचे प्रकाशन यावेळी पार पडले, तसेच 'अभिजात मराठी' या ओटीटी प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले यावेळी जयंती वाघधरे व अंकिता वालावलकर या अभिनेत्री उपस्थित होत्या.
  
"मराठीचा विस्तार मराठ्यांनी सबंध भारतात केला"
 
"कुठलीही भाषा अभिजात तेव्हाच ठरते जेव्हा त्या त्या भाषेमधून ज्ञानेचे संक्रमन होते. चर्चिल सारख्या माणसाने जेव्हा इतिहास लेखनाला प्रारंभ केला, तेव्हा त्याने सुद्धा ४ खंडांमध्ये ' हिस्ट्री ऑफ इंगलिश स्पीकींग पिपल' नावाचा ग्रंथ लिहीला. म्हणजे इतिहासाच्या परिप्रेक्ष्यात सुद्धा भाषा इतकी महत्वाची असते. मराठ्यांच्या कर्तृत्वाबद्दल बोलताना आपण म्हणतो की मराठ्यांनी अटकेपार झेंडा रोवला. परंतु, त्याच बरोबर मराठ्यांनी मराठी भाषेचा सुद्धा देशभर विस्तार केला हे आपल्याला इतिहासाकडे बघितल्यावर लक्ष्यात येते. "

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.