‘तमसो मा ज्योतिर्गमय’चा संदेश देत दिवाळी उजळत जाते. त्या तेजाच्या प्रकाशात विषमतेचा, अज्ञानाचा आणि समाजाला भेडसावणार्या प्रत्येक समस्येचा विनाश व्हावा, त्या विनाशातून समरस समाजाचे उत्थान व्हावे, या संकल्पनेतून साकारलेले दि. २४ ऑक्टोबर रोजीचे चिंचवड येथील समाजसंमेलन. रा. स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे समाजसमूह समन्वयक हेमंत हरहरे यांच्या नियोजनातून साकारलेल्या या संमेलनाचा मागोवा घेणारा हा लेख...
नारा समतेचा देऊया रं
तत्त्व संघाचे समजून घेऊया रं
भेदभाव अमंगळ आपण सारे समान
परमपूज्य हेडगेवार आणि गुरूजींची
हीच पहिली शिकवण
देऊ समरसतेची ललकारी
या कामाला लागूया रं
नारा समतेचा देऊया रं
तत्त्व संघाचे समजून घेऊया रं
तत्त्व संघाचे समजून घेऊया रं...
म्हणत व्यासपीठावर शाहीर आसाराम कसबे आणि शिवाजीराव पोळ भारूड सादर करत होते आणि समोर प्रत्यक्ष समरसता हेच जीवनव्रत मानून जगणारे अनेक मान्यवर उपस्थित होते. निमित्त होते, पश्चिम महाराष्ट्र प्रातांचे सामाजिक समूहाचे प्रमुख हेमंत हरहरे यांनी आयोजित केलेल्या समाज सद्भाव दीपावली संमेलनाचे. त्यांनी प्रस्तावना केली. ते म्हणाले, "संघाच्या शताब्दी वर्षामध्ये पंचपरिवर्तनाला महत्त्व आहे. या पंचपरिवर्तनाचे महत्त्वाचे सूत्र आहे, सामाजिक समरसता. या सामाजिक समरसतेसाठी कार्य करणार्या सगळ्या सहकार्यांचे दिवाळीनिमित्त एकत्रीकरण व्हावे, यासाठी हे स्नेहसंमेलन.
या संमेलनातून समरसतेच्या प्रयत्नांचा , विचारांचा जागर होणार आहे.” या स्नेहसंमेलनामध्ये पश्चिम महाराष्ट्र रा. स्व. संघाचे कार्यवाह प्रवीण दबडघाव, ‘विश्व हिंदू परिषदे’चे शहराध्यक्ष ललीत झुनझुनवाला, सद्भाव प्रमुख बाळासाहेब दळवी, प्रांत संपर्कप्रमुख मिलींद देशपांडे, ‘जेजुरी देवस्थान ट्रस्ट’चे अनिल सौदांडे, विभाग कार्यवाह मुकूंद कुलकर्णी, ‘बौद्ध जनविकास समिती’चे विजय कांबळे, प्रदिप पवार, ‘मातंग साहित्य परिषदे’चे डॉ. धनंजय भिसे, नाना कांबळे आदि मान्यवर सपत्निक उपस्थित होते.
"आपण संघाला अपेक्षित असलेले कार्य करू शकलो, कारण संघाचे संस्कार आणि हिची (म्हणजे सौभाग्यवतीची) अतूट साथ,” असे प्रत्येकाने आवर्जून सांगितले. त्यावेळी समोर बसलेल्या त्या प्रत्येक स्वयंसेवकांच्या पत्नीच्या डोळ्यांत आणि मनातही अनेक प्रसंग तरळून गेले असतील. सदैव समाज आणि देशहितासाठी काम करणार्या स्वयंसेवकांचे पाय घरात टिकत नसणारच. पण तरीही कसलीच कुरबूर न करता, नेटाने संसाराला यशाचे, समाधानाचे तोरण बांधणार्या त्या सगळ्या सौभाग्यवती काकू-मावशी-ताई यांच्यासाठी मन भरून आले.
तसेही हेमंत हरहरे यांच्या पत्नी स्मिता हरहरे यांनी या उपस्थित महिलावर्गाच्या आदरातिथ्यामध्ये कसलीच कसूर केली नाही. आल्याआल्या सनई-चौघड्याने स्वागत काय, हळदी-कुंकू काय, अत्तर लावणे काय, प्रत्येक दाम्पत्याचे जोडीने औक्षण करून त्यांना स्नेहाची भेटवस्तू देणे काय आणि हो, दिवाळीचा मनमुराद चविष्ट फराळ काय, सगळेच कौतुकाची स्नेहाची परिसीमा होती. या सगळ्या जणू दिवाळीला माहेराला आल्या, या लाडाकोडात हरहरे दाम्पत्याने त्यांचे माहरेपणच केले.
असो. या कौतुक सोहळ्याच्या अंतरंगात मात्र होता, समरसतेचा जागर. जातपात, विषमता समाजाला लागलेली कीड आहे. ही कीड नष्ट करण्यासाठी काय प्रयत्न केले किंवा करायला हवे, यासाठीचे चिंतन या संमेलनात केले गेले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून सामाजिक सद्भाव का महत्त्वाचा, या विषयावर मीही उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त केले. समाजामध्ये सद्भाव नसेल, तर विघातक प्रवृत्ती समाजाला आणि त्यायोगे देशाला कशा प्रकारे पोखरतात, याची उदाहरणे दिली. धर्मांतरण ते ‘लव्ह जिहाद’ ते नक्षलवाद, दहशतवाद या राष्ट्रविघातक प्रवृत्तींचा बिमोड व्हावा, यासाठी समाजात सद्भावना संवर्धित राहायला हवी, असे मत मांडले, तर पश्चिम महाराष्ट्र रा. स्व. संघ कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव म्हणाले की, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शताब्दी वर्षानिमित्त सद्भाव सभा घेऊन आपल्या जाती-ज्ञातीमधील विषमता दूर करण्यावर भर दिला आहे.
सर्व समाजांमध्ये समता-समरसता निर्माण करण्याचे काम संघाने हाती घेतले आहे.” या संमेलनाच्या सूत्रसंचलनाची धुरा पश्चिम महाराष्ट्र प्रांत संपर्क मंडळाचे अमित हरहरे यांनी यांनी सांभाळली. एकंदर, पुणे-चिंचवड परिसरात समाजिक स्नेहसमरसतेची पंढरी निर्माण करण्यामध्ये महत्त्वाचे योगदान असलेले हेमंत हरहरे आणि उपस्थित सर्वांच्या संवाद-विचारांच्या मंथनातून या कार्यक्रमात खरे समरसभावाचे दीप उजळले होते.