आशा उद्याची...

    27-Oct-2025   
Total Views |

कला म्हणजे माणसाच्या अभिव्यक्तीचे माध्यम. मात्र यापलीकडे एखादी सकस आणि अभिजात कलाकृती ही परिवर्तनाचे साधन होऊ शकते, हेसुद्धा वारंवार सिद्ध झाले आहे. एखादं गाणं, एखादं चित्र, माणसांच्या मनाला स्पर्श करतं, त्याच्यातील ऊर्जेला चेतवू शकतं याचे अनेक दाखले, इतिहासात आढळतात. कलेचा आशय हा युवा पिढीच्या काळजाला भिडायला हवा. त्यांच्या मनामध्ये एकदा एखादे कल्पनेचे बीज पेरण्यात कलाकार यशस्वी झाला, तर त्याची कलाकृती पुढचा अनंत काळ स्मरणात राहते. आजच्या कण्टेंटच्या जगामध्ये तर हा नियम अधिकच महत्त्वाचा. एका बाजूला निखळ मनोरंजनाच्या दृष्टीने कण्टेंट बनवताना, या माध्यमातून लोकांपर्यंत काहीतरी सकस, अभिरुची संपन्न मजकूर आपण पोहोचवायला हवा, असा विचार करणारेसुद्धा कलेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. कलेच्या माध्यमातून निसर्गसंवर्धनाचा असाच विचार जपानमध्ये मांडला जात आहे, एका ‌‘ॲनिमे‌’च्या माध्यमातून.

‌’ॲनिमे‌’ या चलचित्रप्रकाराकडे बरेचदा कार्टून म्हणून बघितले जाते मात्र, वास्ताविक या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. ‌’ॲनिमे‌’ हा शब्द ‌‘ॲनिमेशन‌’ या इंग्रजी शब्दापासून तयार झाला आहे. कार्टून हा प्रकार बऱ्याचअंशी लहान मुलांना नजरेसमोर ठेवून बनवला जातो, तर ‌‘ॲनिमे‌’ हा कला प्रकार सर्वच वयोगटांतील लोक बघतात. जपानमधील ‌‘एनएचके एन्टरप्राईज‌’च्या माध्यमातून ‌‘फ्युचर कीड तकारा‌’ नावाची ॲनिमे मालिका, नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकूण 11 भागांमध्ये प्रसारित होणाऱ्या या मालिकेचा उद्देश, तरुण पिढीला पर्यावरणाविषयी समस्यांचे आकलन व्हावे, त्याच्या परिणामांची त्यांनी दखल घ्यावी हा आहे. या मालिकेचा उद्देश केवळ भविष्यातील धोके दर्शवणे एवढाच नसून, शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणीय बदलांची माहिती व्हावी, त्यांनी याबद्दल सजग व्हावे, हा यामागचा हेतू. या मालिकेसाठी संशोधन करणारे शास्त्रज्ञ सीटा एमोरा यांच्या मते, जागतिक तापमानवाढ ही एक खूप मोठी समस्या आहे आणि ती शाळांमध्ये शिकवणं अवघड आहे. वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे या बदलाचे आव्हान सांगणे गरजेचे आहे. प्राथमिक स्तरावरची पर्यावरणाच्या ऱ्हासासंदर्भातील माहिती शालेय शिक्षणाच्या आराखड्यामध्ये समाविष्ट केलेलीच असते; मात्र पुन्हा एकवार वेगळ्या माध्यमातून मुलांपर्यंत हा विषय पोहोचवण्यामागे आणखी एक कारण आहे.

एका खासगी संस्थेने सादर केलेल्या संशोधनानुसार, जपानमध्ये हवामानविषयक बदलांसंदर्भात तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात उदासीनता आढळते. एका सर्वेक्षणात असे दिसून आले की, 18 ते 29 वयोगटातील फक्त 31 टक्के आणि 30 वर्षांवरील 30.3 टक्के लोकांनाच हवामानविषयक समस्यांमध्ये रस आहे. अर्थात, दुसऱ्या बाजूला वयाची सत्तरी ओलांडलेल्या वृद्धांमध्ये मात्र, ही सजगता जास्त असल्याचे बघायला मिळते. ऑक्सफर्ड विद्यापीठातील साहाय्यक प्राध्यापक योसुके बुचमेयर या मागच्या दोन कारणांवर प्रकाश टाकतात. एका बाजूला शालेय शिक्षणामध्ये अशा पद्धतीने विचारांची देवाणघेवाण होत नाही. अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिजमवर शाळेत शक्यतो बंदीच घालायचा विचार केला जातो. दुसऱ्या बाजूला माध्यमांमध्येसुद्धा, हवामानबदलासंदर्भात मजकुराला प्राधान्य दिले जात नाही. लोकांना त्याबद्दल शिक्षित केले जात नाही. एका बाजूला वादळ, पूर याविषयीचे वार्तांकन मोठ्या प्रमाणात होते, मात्र त्याला हवामानातील बदल या विषयाशी जोडले जात नाही. अमेरिका, युरोप, आशिया या खंडांमध्ये मोठ्या प्रमाणात तापमानवाढीचा, हवामानबदलाचा विचार केला जातो. जपानमधील पुढच्या पिढीनेसुद्धा हा विषय समजून घ्यावा, त्यावर व्यक्त व्हावे असा विचार अनेक तज्ज्ञांनी केला आहे.

‌‘फ्युचर कीड तकारा‌’ या मालिकेच्या माध्यमातून, असाच एक अभिनव प्रयोग केला जात आहे. चित्रपट, मालिकांमध्ये अशा प्रकारची आशयनिर्मिती केल्यास, ती प्रचारकी होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. मात्र, एखादा विषय जर लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल, तर हा मार्गच पत्कारावा लागतो. मजकूरनिर्मितीच्या असंख्य शक्यतांच्या जगामध्ये, आज आपण जगत आहोत. येणाऱ्या काळामध्ये आपल्यासमोर तितक्याच समस्यासुद्धा उभ्या ठाकल्या आहेत. कलाकृतीच्या माध्यमातून जर अशीच एखादी समस्या लोकांपर्यंत पोहोचवण्यात कलाकार, शास्त्रज्ञ यशस्वी झाले, तर श्रेयस आणि प्रेयस या दोन्हींचा संगम घडून येईल, असेच म्हणावे लागेल.

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.