कारागृहातील चतुरंग सेना...

    27-Oct-2025
Total Views |
(डावीकडून उभे पाटील, योगेश परदेशी, सागर मोहिते, केतन खैरे, दुबे, डॉ. भाईदास ढोले, कदम, पवन कातकडे, शिंदे गुरुजी, गणेश माळकरी, रामदास तागडडावीकडून बसलेले विजयी संघातील सहाजण : कासिम, लहू पवार, मनोज पासवान, शंकर पवार, विजय विक्की पालसिंग आणि मंगल)

‘तुरुंगवास‌’ असा शब्द ऐकला, तरी अनेकांच्या मनामध्ये धडकी भरते. अनेक गंभीर गुन्ह्यांतील कैद्यांमुळे तेथील वातावरण तसे असतेही. मात्र, या तुरुंगातच आता कैद्यांच्या पुनर्वसनाचे कार्यक्रम घेतले जाऊ लागले आहेत. या माध्यमातून अनेक कौशल्यांचे प्रशिक्षण त्यांना देण्यात येते. बुद्धिबळाचे कौशल्य आत्मसात करत, जागतिक स्पर्धांमध्ये कमावलेल्या यशाचा हा मागोवा...

ब्रिटिश राजवटीपासून आजतागायत दक्षिण आशियातील सर्वांत मोठ्या कारागृहांपैकी एक असलेल्या येरवडा मध्यवत कारागृहात, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, नेताजी बोस, लोकमान्य टिळक, वि. दा. सावरकर यांसह अनेकांना ठेवण्यात आले होते. आणीबाणीच्या काळात येथे बाळासाहेब देवरस, अटल बिहारी वाजपेयी यांनाही अटक करुन ठेवण्यात आले होते. समाजसेवक अण्णा हजारेही येथेच काही काळ बंदीवासात होते.

तसेच अभिनेता संजय दत्त, घोटाळेबाज तेलगी आणि अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी हे देखील याच कारागृहात होते. दहशतवादी कसाबलाही येथेच फाशी देण्यात आली. तसेच पुण्यातील जोशी-अभ्यंकर खून खटल्यातील कुप्रसिद्ध राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप, मुनव्वर शाह आणि सुहास चांडक याच कारागृहात होते. त्यांतील सुहास चांडक माफीचा साक्षीदार सोडता, बाकीचे याच तुरुंगात फासावरही गेले. यांच्यातील मुनव्वर शाहने केलेल्या गंभीर गुन्ह्याचा पश्चात्ताप झाल्याने, फासावर जाण्याआधी ‌‘येस, आय एम गिल्टी‌’ हे आत्मकथन लिहिले. अभिनव कला महाविद्यालयाचे हे विद्याथ हुशार होते पण, त्यांनी त्यांची हुशारी नको तिथे चालवली. काही कुप्रसिद्ध कैदी सोडले, तर आपल्या गुन्ह्याचा पश्चात्ताप झाल्यावर आता सन्मार्गावर चालायचा निश्चय करणारेही, याच कारागृहात आढळतात. त्यांना तो सन्मार्ग दाखवण्याचे काम अनेकजण करत असतात, त्यामध्ये कारागृह प्रशासनाचाही फार मोठा वाटा असतो.

(डावीकडून प्रज्ञा खैरे, नामदेव शिंदे, दुबे, सागर मोहिते, रवींद्र गायकवाड, पवन कातकडे, योगेश परदेशी, सुनील ढमाळ, सुहास वारके, ग्रॅण्ड मास्टर अभिजीत कुंटे, केतन खैरे, डॉ. ढोले, गणेश माळकरी, दोन ड्युटी अमलदार मेजर आणि रामदास तागड आणि बसलेले विजयी संघातील बुद्धिबळपटू)

खरं तर कैदी, कारागृह, येरवडा असे शब्द ऐकले की, आपल्या सगळ्यांच्याच मनात वेगळेच विचार येतात. येरवडा कारागृहाच्या ब्रीदवाक्यातच ‌‘सुधारणा व पुनर्वसन‌’ असे शब्द आहेत. यानुसार कैद्यांना सुधारून, समाजात पुन्हा सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले जातात. सुप्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावेने मागे एकदा येरवडा कारागृहातील एका कार्यक्रमात म्हटले होते की, ‌’आम्ही कलाकार जेंव्हा रंगमंचावर पहिली एंट्री घेतो आणि त्याचं पहिलं वाक्य तो जेव्हा उच्चारतो, तेव्हा त्याचा सूर बरोबर लागलाय की नाही, हे त्याचे त्याला आणि प्रेक्षकांना समजतं. इथल्या मंडळींचा आयुष्यातील एखादा सूर बेसूर झालाही असेल, पण तो सूरात आणण्याचं काम ही कारागृह प्रशासनातील सगळी मंडळी करतात.‌’ सुबोध भावेनं पुढे म्हटलंय की, “तुम्ही केलेल्या चुकीबद्दलची कायद्याने शिक्षा झाली आहे, म्हणजे तुमचं आयुष्य संपलेलं नाही. तुमचं खूप आयुष्य बाकी आहे आणि आयुष्य या शिक्षेपेक्षाही खूप मोठं असतं.” याच तुरुंगात अनेक राजकीय कैदी पारतंत्र्याच्या काळात होते. शिक्षेमुळे त्यांचे काम संपले नाही, खऱ्या अर्थानं देश स्वतंत्र करण्यात त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी वाहून दिलं. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात खूप काही करायचं आहे आणि ते काय व कसे करायचं, याची दिशा देण्याचं काम तुम्हाला येथे मिळतंय. याच रस्त्याने तुम्हाला पुढे जायचंय आणि अनेकांच्या आयुष्यातही आनंद द्यायचा आहे.

कैद्यांमध्ये बुद्धिचातुर्य बऱ्याच प्रमाणात आढळते. यातील अनेकजण सुटका झाल्यानंतर या बुद्धिचातुर्याचा योग्य उपयोग करुन, आपले उर्वरित आयुष्य व्यतीत करण्याचे ठरवतात. क्रीडा वृत्तीद्वारे मानसिक आणि भावनिक बळ वाढवून, सामाजिक परिवर्तन आणि पुनर्वसन सुलभ करणे हे उद्दिष्ट ठेवूनच, कारागृह प्रशासन कैद्यांना बुद्धिबळ, बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस अशा विविध खेळांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असते. कैद्यांना खेळांत प्रशिक्षण देणाऱ्या समाजसेवक व्यक्ती व संस्थांचे, कारागृह प्रशासन कायमच स्वागत करते. कैद्यांना चतुरंग सेनेत सामील होण्यास प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा, आज आपण आवर्जून उल्लेख करणार आहोत.

(डावीकडून उभे महिला प्रशिक्षक प्रज्ञा खैरे, येरवडा मध्यवत कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ, अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक सुहास वारके, ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे, माजी कॅरम विश्वविजेते योगेश परदेशी, पुरुष संघ प्रशिक्षक केतन खैरे, साहाय्यक प्रशिक्षक सागर मोहिते मिळवून आशियाई स्पर्धेची पात्रता फेरी गाठली. नुकत्याच पार पडलेल्या आंतरखंडीय स्पर्धेत, आशियाई गटातही त्यांनी तृतीय क्रमांक मिळविला, तसेच राष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय स्थानी असलेल्या भारतीय संघाचा पराभवदेखील केला. अंतिम फेरीसाठी प्रथम दोन संघ पात्र ठरल्याने, येरवडा महिला संघाची संधी थोडक्यात हुकली. मात्र, या स्पर्धेमुळे संघाचा आत्मविश्वास मात्र नक्कीच दुणावला आहे.)

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत येरवडा कारागृहास सुवर्ण! ही बातमी दि. 11 ऑक्टोबरच्या शनिवारी प्रसिद्ध झाली होती. ‌‘क्रीडा भारती‌’ पुणे महानगरचे बुद्धिबळपटू राजेंद्र शिदोरे यांच्याशी या बातमीबाबत चर्चा करत असतानाच, त्यांनी केतन खैरे या अजून एका बुद्धिबळपटूशी माझी ओळख करून दिली. खैरेंशी ओळख झाल्यावर, कारागृहातील चतुरंग सेनेची माहिती तर मला मिळालीच आणि कारागृहाकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनात कसा बदल झाला पाहिजे, हेही समजले.

जागतिक आंतरकारागृहीय ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत, 40 देशांतील 70 संघ सहभाग झाले होते. त्यात येरवडा कारागृह संघाने सुवर्णपदक मिळवल्याबद्दल खैरे सांगत होते. ‌‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड‌’च्या माध्यमातून ‌‘तिमिरातून तेजाकडे‌’ अर्थात ‌‘प्रीझन टू प्राईड‌’ हा उपक्रम, भारतातील विविध कारागृहांतील कैद्यांसाठी सुरू आहे. या उपक्रमांतर्गत तुरुंगांमध्ये विविध खेळ शिकवले जातात. त्यातील बुद्धिबळाची जबाबदारी भारतातील चौथे ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे यांच्या खांद्यावर आहे. कुंटे सरांच्या प्रोत्साहनामुळेच, केतन येरवडा कारागृहात कैद्यांना बुद्धिबळ शिकवण्यासाठी जाऊ लागले. सुरुवातीच्या दोन महिन्यांच्या कालावधीत फक्त कैद्यांना प्रशिक्षित करणे एवढाच त्यांचा उद्देश होता; पण त्यादरम्यान ‌‘जागतिक बुद्धिबळ संघटने‌’ने (फिडे) जगातील कैद्यांसाठी ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा सुरू केली. तो उपक्रम दसऱ्यादरम्यान सुरू झाला आणि पहिली स्पर्धादेखील त्याचदरम्यान होती. यामुळे भारतातील कारागृह संघ पहिल्या स्पर्धेत भाग घेऊ शकले नव्हते. पाच वर्षांपूव जेव्हा तुरुंगामध्ये हा उपक्रम सुरू झाला, तेव्हा खैरेंना निवडक 20 कैद्यांना प्रशिक्षित करण्यास सांगितले गेले.

(जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत येरवडा कारागृहास सुवर्ण मिळवून देणारी चतुरंग सेना)

सुरुवातीचा महिना सर्वांना खेळाचे मूलभूत प्रशिक्षण दिल्यानंतर, त्यांच्यातच स्पर्धा घेऊन सहाजणांची निवड केली गेली. दर आठवड्याला रोज सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत, प्रशिक्षणाचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. त्यासाठी खैरेंना मात्र रोज किमान चार तास तरी वेळ काढावा लागणार होता. त्या कैद्यांचा शालेय शिक्षणाचा स्तर बघितला, तर पहिल्या 20 पैकी तीन-चारजण उच्चशिक्षित, तेवढेच अशिक्षित आणि बाकीचे अर्धशिक्षित होते. जे अशिक्षित होते, त्यांना लॅपटॉपवर खेळताना माऊस कसा हाताळण्याचा येथपासून शिकवायला लागणार होते. यात शहरात राहणारे दोन-तीनजण होते, तर बाकीचे छोट्या गावात राहणारे होते. मग त्या 20 मधूनच निवडलेल्या सहाजणांना, अंदाजे दोन महिन्यांचे प्रगत प्रशिक्षण दिले गेले. पहिल्या वषच्या स्पर्धेत भाग न घेता आल्याने, दुसऱ्या वष मात्र तीन महिने आधीच, स्पर्धेची तयारी सुरू झाली. यामध्ये खेळाच्या तांत्रिक बाबी अधिक चांगल्या पद्धतीने समजाविण्यात खैरे यशस्वी झाले.

स्पर्धेसाठी निवड झालेले ते कैदी हे पाच वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेले असून, अनेकजण खुनाच्या गुन्ह्यासाठी शिक्षा भोगत होते. यात भावनोद्रेकाने घडलेल्या गुन्ह्यातील तर बहुसंख्य होते. जन्मठेप वगैरे शिक्षा झाली असली, तरी स्वतःच्या चांगल्या वर्तणुकीने ते बदलल्याची खात्री तुरुंग प्रशासनाला झाल्यानंतरच, या कैद्यांना विविध उपक्रमांत भाग घेता येतो. मात्र, जे सराईत किंवा गँगवॉरमधील गुन्हेगार असतात, त्यांना या सवलती मिळत नाहीत. अशांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव बंदिस्तच ठेवावे लागते. प्रशिक्षणाथ आधीपासून खेळ येत असलेलेच कैदी होते. असे असले तरी, त्यांना तांत्रिक बाबींचे ज्ञान नव्हते.

पुरुष कैद्यांना बुद्धिबळात शिक्षण देऊन खैरे थांबले नाहीत. महिला कैद्यांनाही बुद्धिबळ प्रशिक्षण देण्यासाठी, त्यांच्या पत्नी प्रज्ञा खैरे यांनी पती केतन यांना मदत करायचे ठरवले. आता प्रज्ञा मार्च 2024 पासून, महिला कैद्यांना प्रशिक्षण देत आहेत. महिलांसाठीचा उपक्रम हा बाकीच्या तुरुंगामध्ये सुरू होताच. पुण्यात काही कारणाने तो उशिरा सुरू झाला. अचानक सुरू करण्यात आल्याने, रोज चार तास सलग वेळ काढू शकणारे व्यावसायिक प्रशिक्षक उपलब्ध होणे अवघड होते. त्यामुळे ही जबाबदारीही खैरे यांनीच स्वीकारली. पुरुष विभागात दोन हजारांच्या आसपास कैदी असल्याने, तिथे निवडीला वाव होता. पण, महिलांमध्ये जेमतेम 300 आणि त्यातही बुद्धिबळाची आवड असलेल्या महिलांना शोधून, त्यांना प्रशिक्षित करणे आव्हानात्मकच होते.

300 पैकी मोजक्याच महिलांना बुद्धिबळाची माहिते होती. त्यामुळे त्यांना पटावर किती घरे असतात, कुठल्या सोंगटीला काय म्हणतात, कोणाची चाल कशी असते, इथपासून शिकवावे लागले. कच्चे कैदी असलेल्या महिलांनाही तेथे प्रवेश होता, पण मधूनच त्यातील एखादीची जामिनावर मुक्तता झाल्यास, त्यांच्या जागी परत नवीन महिला निवडून त्यांना शिकवणे, हे जास्त किचकट काम होते. बहुसंख्य महिला या अशिक्षित असल्यामुळे, त्यांनादेखील माऊस कसा हाताळावा येथून शिकवावे लागले. टेबलवर पट ठेवून त्यावर खेळणे आणि डोळ्यांसमोर असलेल्या स्क्रीनवर खेळणे, यातील समन्वय साधणेसुद्धा बऱ्याच महिलांना अवघड गेले. अशातही महिला कैद्यांची प्रगती वाखाणण्याजोगीच आहे.

ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या पहिल्या ऑनलाईन स्पर्धेत, महिलांची प्रगती यथातथाच होती. पण, मे महिन्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत मात्र महिला गटात येरवडा संघाने, तृतीय क्रमांक  मिळवून आशियाई स्पर्धेची पात्रता फेरी गाठली. नुकत्याच पार पडलेल्या आंतरखंडीय स्पर्धेत, आशियाई गटातही त्यांनी तृतीय क्रमांक मिळविला, तसेच राष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय स्थानी असलेल्या भारतीय संघाचा पराभवदेखील केला. अंतिम फेरीसाठी प्रथम दोन संघ पात्र ठरल्याने, येरवडा महिला संघाची संधी थोडक्यात हुकली. मात्र, या स्पर्धेमुळे संघाचा आत्मविश्वास मात्र नक्कीच दुणावला आहे.

या प्रशिक्षणामुळे कारागृहातील महिला कर्मचाऱ्यांनाही बुद्धिबळाची आवड निर्माण झाली आहे. या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मुलांसाठीही बुद्धिबळाचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची मागणी, प्रज्ञा खैरे यांच्याकडे केली आहे. या सर्व उपक्रमात ‌‘इंडियन ऑईल‌’चे अधिकारी अभिजीत कुंटे, तसेच योगेश परदेशी यांचे सहकार्य व पाठिंबा खूपच मोलाचा आहे. तसेच येरवडा मध्यवत कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ, अतिरिक्त अधीक्षक पी. पी. कदम, उपअधीक्षक रवींद्र गायकवाड, उपअधीक्षक डॉ. भाईदास ढोले, वरिष्ठ जेलर आनंद कांदे, डी. जी. दुबे, एन. आर. शिंदे, जी. व्ही. तागड यांसारख्या कर्तव्यतत्पर अधिकाऱ्यांचा तसेच प्रत्येक वेळी ड्युटीवर असणाऱ्या कर्मचारी वर्गाच्या सक्रिय पाठिंब्यामुळेच, हा अनोखा उपक्रम यशस्वी होत आहे. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतरही चतुरंग सेना सोडायची नाही, हा मनोदय अनेक कैदी आता व्यक्त करत आहेत, हेच या ‌‘प्रीझन टू प्राईड‌’चे खरं फलित मानावे लागेल.

- श्रीपीद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
9422031704