चलो आंबोली ! सिंधुदुर्गात रंगणार पश्चिम घाटाचा वेध घेणारा 'जैवविविधता मेळावा'

    27-Oct-2025
Total Views |
amboli biodiversity meet


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
पश्चिम घाटातील जैवविविधतेला अधोरेखित करुन तिचे संवर्धन करत त्याविषयी जनजागृती करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत 'जैवविविधता मेळाव्या'चे आयोजन करण्यात आले आहे (amboli biodiversity meet). वन विभाग आणि 'मलाबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब, आंबोली' यांच्या मार्फत आयोजित केलेला हा मेळावा २१, २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी पार पडेल. (amboli biodiversity meet)
 
पश्चिम घाटामधील जैवविविधता ही भारतामध्ये सर्वात समृद्ध आहे. या जैवविविधतेच्या रक्षणाबाबत उहापोह करण्यासाठी आंबोलीत 'जैवविविधता मेळाव्या'चे आयोजन करण्यात आले आहे. आंबोलीत गेली २० वर्ष निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या 'मलाबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब, आंबोली' यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांना वन विभागाचे सहकार्य मिळाले आहे. या मेळाव्यात देशभरातील नामवंत वक्ते, संशोधक आणि निसर्गप्रेमी सहभागी होणार आहेत. सरपटणारे प्राणी व त्यांचे विश्व या विषयावर केदार भिडे, उभयचर प्राणी यावर के. व्ही. गुरुराज बेंगलोर, वन्यजीव व वन अपराध या विषयावर रोहन भाटे, पक्षी व त्यांचे जीवन यावर पराग रांगणेकर गोवा, फंगी म्हणजेच बुरशी या विषयावर शीतल देसाई, वन्यप्राणी यावर गिरीश पंजाबी, वनसंवर्धन आणि वनांविषयीचे इतर प्रश्न यावर भाई केरकर-गोवा, फुलपाखरू व पतंग यावर हेमंत ओगले व मिलिंद भाकरे, वनस्पती तज्ञ मिलिंद पाटील, वटवाघूळ तज्ञ राहुल प्रभू खानोलकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
 
आताच्या निसर्गातील घडामोडी आणि त्या विषयीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतरत्र मांडण्यासाठीचे पर्याय यावर रमण कुलकर्णी बोलतील. या उपक्रमांतर्गत तज्ञांची व्याख्याने, जंगल भ्रमंती आणि इतर उपक्रम ठेवण्यात आले आहेत. तसेच, निसर्ग पर्यटक आणि अभ्यासकांसाठी रात्रीच्या वेळी येथील लोककला, म्हणजेच दशावतार नाटक यासारखे सादरीकरणही करण्यात येणार आहे. स्थानिकांसाठी विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. या उपक्रमास जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन, 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर घेण्यात येणाऱ्या या कार्यक्रमास नोंदणी करून यशस्वी करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. नोंदणीसाठी खालील क्रमांकावर किंवा संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क- काका भिसे आंबोली 7588447161
राजेश देऊळकर- 097655 75690
मेल आयडी संपर्क[email protected]