‘तिमिरातून तेजाकडे’चा लख्ख प्रवास

    21-Oct-2025
Total Views |

P. Chidambaram 
 
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी भारताच्या ६.५ टक्के आर्थिक वाढीला निराशाजनक ठरवले असले, तरी हाच भारत आज जगाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देतो आहे. दिवाळी-दसर्‍याच्या विक्रमी विक्रीतून जनतेचा आत्मविश्वासाचे प्रतिबिंब लख्खपणे उमटले आहे. मग प्रश्न हा आहे की, निराशा अर्थव्यवस्थेत आहे की, विरोधकांच्या स्वार्थी राजकारणात?
 
माजी अर्थमंत्री चिदंबरम यांच्या मते, सध्याची ६.५ टक्के वाढ ही अपुरी आहे आणि देशात आर्थिक क्षेत्रातील विश्वास घटला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक यांसारख्या जागतिक वित्तीय संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास कायम ठेवत, चिदंबरम यांचे विधान फोल ठरवले आहे. आज भारत हा जगातील सर्वांत वेगाने वाढणारा मोठा देश ठरला असून, भारताच्या वाढीवर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी शिक्कामोर्तब केले आहे. भारताची वेगाने वाढ होत असताना, युरोपावर मंदीचे सावट आहे, तर चीन मंदावलेल्या उत्पादनात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर भारताने स्थैर्य, वेग आणि विश्वासाची त्रिसूत्री कायम राखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकतेच म्हटले आहे की, भारताची होत असलेली वेगवान वाढ जागतिक संधींना संधी देत आहे. पंतप्रधान मोदी यांचे हे विधान म्हणजे केवळ राजकीय घोषणा नसून, ते वास्तव आहे. भारत आज जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनत असून, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ या केंद्राच्या योजनांनी संपूर्ण जगाला भारताची क्षमता दाखवून दिली आहे.
 
चिदंबरम म्हणतात तसे देशात गुंतवणुकीचा ओघ अजिबात कमी झालेला नाही. उलट, थेट विदेशी गुंतवणुकीचा प्रवाह सातत्याने वाढतो आहे. २०२४-२५ या वर्षात थेट विदेशी गुंतवणूक ६.४४ लाख कोटींवर पोहोचली आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश ही राज्ये गुंतवणुकीची नवी केंद्रे ठरली आहेत. तसेच, ‘अ‍ॅपल’, ‘फॉसकॉन’, ‘मायक्रॉन’, ‘सॅमसंग’ यांसारख्या दिग्गज कंपन्या आता भारतात उत्पादनाचे नवे केंद्र उभारत आहेत. त्यातील काही केंद्रे तर प्रत्यक्षात उत्पादन घेत असून, ‘मेक इन इंडिया’चा शिक्का घेऊन ही उत्पादने जगभरात विकलीही जात आहेत. ‘पीएलआय योजने’तून उद्योगसाखळीला नवीन ऊर्जा मिळाली असून, आज देशात मोबाईल, औषधनिर्मिती, इलेट्रॉनिस, सेमीकंडटर आणि संरक्षण उपकरणे या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे. देशात खरोखरच गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झालेला असता, तर या कंपन्यांनी भारतात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक का केली असती? या प्रश्नाचे उत्तर चिदंबरम यांनीच द्यावे.
 
अर्थव्यवस्थेची ताकद ही सरकारी आकडेवारीत नसते, तर ती प्रत्यक्षात दिसते जनतेच्या वाढलेल्या खरेदी क्षमतेत. यालाच आपण ‘क्रयशक्ती’ असेही संबोधतो. या वर्षीच्या दसरा-दिवाळीत देशभरात झालेली विक्रमी उलाढाल हेच त्याचे जिवंत उदाहरण. ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’च्या मते, दिवाळीपूर्व विक्री ३.२५ लाख कोटींवर पोहोचली असून, मागील वर्षाच्या तुलनेत यात तब्बल ३० टक्के इतकी घवघवीत वाढ नोंद झाली. फर्निचर, वाहन, इलेट्रॉनिस, कपडे, सोन्याचे दागिने या सर्व क्षेत्रांत विक्री वाढली. विशेष म्हणजे सोने-चांदीच्या दरात विक्रमी वाढ झालेली असतानाही, ग्राहकांनी विक्रमी खरेदी केली, हे विशेष!
 
अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दिग्गज कंपन्यांनी सांगितले की, त्यांच्या पहिल्या आठवड्यातील विक्रीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत दीडपट इतकी वाढ झाली आहे. अर्थव्यवस्था खरोखरच मंदावली असती, तर बाजारात इतकी उत्साही मागणी कायम राहिली असती का? हाही प्रश्न आहेच. ग्राहकांचा उत्सवातला सहभाग सांगतो की, जनतेच्या हातात पैसा आहे, रोजगार कायम आहेत आणि भविष्याविषयी आत्मविश्वासही कायम आहे. चिदंबरम यांनी भारतात गुंतवणुकीसाठी अयोग्य वातावरण आहे, असा चुकीचा आरोप केला आहे. मात्र, वस्तुस्थिती अशी की, खासगी भांडवली गुंतवणुकीत गेल्या दोन वर्षांत १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रेल्वे, महामार्ग, बंदरे, विमानतळ, हरितऊर्जा आणि गृहनिर्माण या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे.
 
सरकारच्या १०० लाख कोटी रुपयांच्या पायाभूत विकास आराखड्यामुळे देशातील उद्योगसाखळी आणि रोजगारनिर्मितीला गती मिळाली आहे. २०११-१२ साली काँग्रेसप्रणित युपीए सरकारच्या काळात ‘जीडीपी’ वाढ पाच टक्क्यांपेक्षा खाली होती, तर महागाई दहा टक्क्यांपेक्षा जास्त भडकली होती आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास त्यावेळी सर्वार्थांने लयास गेला होता. त्या काँग्रेसी कार्यकाळाच्या तुलनेत आजचा भारत हा अधिक सुसंगत, पारदर्शक आणि परिणामकेंद्रित झाला आहे.
 
आज भारतातील आर्थिक विकास फक्त शहरी भागापुरता मर्यादित राहिलेला नाही. ग्रामीण आणि निमशहरी भागातही डिजिटल अर्थव्यवस्थेचा वेग जबरदस्त असाच आहे. युपीआय व्यवहारांचे प्रमाण दरमहा १८ लाख कोटींवर गेले असून, यामुळे देश कॅश इकोनॉमीतून ‘डिजिटल ट्रस्ट इकोनॉमी’कडे यशस्वीपणे वाटचाल करत आहे. ‘पंतप्रधान गरीब कल्याण योजना’, ‘जन-धन-आधार-मोबाईल त्रिसूत्री’ आणि विविध सामाजिक सुरक्षा योजनांमुळे समाजातील तळागाळापर्यंत सर्वच घटकांची, क्रयशक्ती वाढली आहे.
 
‘अंत्योदय’ साकार झालेला दिसून येतो आहे. हा आर्थिक उत्सव केवळ मोठ्या शहरात नाही, तर गावकुसांमध्येही तितयाच उत्साहाने साजरा होत आहे, हे त्याचेच प्रतीक. चिदंबरम यांचे विधान प्रत्यक्ष आकडेवारीवर आधारित नाही. मात्र, ते राजकीय नकारात्मकतेचे प्रतिबिंब आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. वास्तव हे आहे की, आज भारतात गुंतवणूकदारांचा विश्वास घटलेला नाही, तर त्यांचा विश्वास वाढीस लागलेला आहे. जनतेचा आत्मविश्वासही वाढला आहे; उद्योगांमध्ये उत्साही वातावरण आहे आणि गुंतवणूकदारांनी भारताला विश्वासार्ह गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून केव्हाच मान्यता दिली आहे. भारताबद्दलचा हा जो विश्वास जागतिक पातळीवर वाढीस लागला आहे, तेच काँग्रेसचे खरे दुखणे. जनता आणि बाजारपेठा या दोन्हीही घटकांनी काँग्रेसी मानसिकतेला नाकारले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘जी-२०’ शिखर परिषदेत असे म्हटले होते की, भारत जेव्हा वाढतो, तेव्हा संपूर्ण जगाची वाढ होते. त्यांचे हे विधान आता जागतिक अर्थनीतीचे प्रतीक ठरले आहे.
 
भारत पुढच्या दशकात पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने निश्चितपणे वाटचाल करत आहे. त्यामुळे चिदंबरम यांची निराशा समजण्यासारखी आहे. कारण, जेव्हा आकडे वास्तव सांगतात, तेव्हा विरोधकांकडे केवळ शब्दांचे बुडबुडे बाकी उरतात. भारताच्या आर्थिक प्रवासाचा हा टप्पा म्हणजे, अर्थव्यवस्थेचा काँग्रेसी कार्यकाळातील तिमिरातून आज होत असलेला तेजाकडेचा लख्ख प्रवासच होय!
 
- संजीव ओक