जपानमध्ये ऐतिहासिक घडामोड! सनाए ताकाईची देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान

    21-Oct-2025   
Total Views |

Japan
 
टोकियो : (Japan'sNew PM Sanae Takaichi) जपानच्या राजकारणात एक ऐतिहासिक वळण घेत, सनाए ताकाईची यांची देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. पुरुषप्रधान राजकीय परंपरेत मोठा बदल घडवत, सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीने (LDP) त्यांना आपल्या नेत्या म्हणून निवडले आहे.
 
सनाए ताकाईची (Sanae Takaichi) या माजी आर्थिक सुरक्षामंत्री असून त्यांची मंगळवारी कनिष्ठ सभागृहात पार पडलेल्या ऐतिहासिक मतदानात निवड झाली. ४६५ जागांच्या या सभागृहात त्यांना २३७ मते मिळाली आणि त्यांनी बहुमताचा टप्पा गाठला.
 
ही निवड मावळते पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या राजीनाम्यानंतर करण्यात आली. इशिबा यांनी २०२५ च्या जुलै महिन्यातील निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर, एलडीपीने सत्तेवर पुनरागमन करण्यासाठी ओसाका-आधारित जपान इनोव्हेशन पार्टीसोबत युती केली. मात्र या युतीला दोन्ही सभागृहांत स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे ताकाईची यांचे सरकार काहीसे अस्थिर राहण्याची शक्यता असून, त्यांना सरकार टिकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
 
६४ वर्षीय ताकाईची (Sanae Takaichi) यांना आता वरिष्ठ सभागृहाचीही मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. यानंतर त्या सम्राटांची भेट घेऊन देशाच्या १०४ व्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. ही निवड जपानच्या राजकीय इतिहासातील एक नवे पर्व ठरेल, अशी चर्चा सध्या जगभरात सुरू आहे.
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\