नवी दिल्ली : (PM Narendra Modi) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी भारतीय जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करतात. यंदाची दिवाळी मोदींनी गोव्यात नौदलांच्या सैनिकांसोबत साजरी केली. यावेळी त्यांनी गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यावरील आयएनएस विक्रांतला भेट दिली. येथे, पंतप्रधान मोदींनी आयएनएस विक्रांतवरील नौदलाच्या कर्मचाऱ्यांना संबोधित केले आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. नौसैनिकांशी संवाद साधताना पीएम मोदी यांनी पाकिस्तानला कठोर संदेश सुद्धा दिला.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान मोदी म्हणाले, “तुमच्यासोबत दिवाळी साजरी करणं माझं सौभाग्य आहे. आजचा दिवस अद्भुत आहे. हे दृश्य संस्मरणीय आहे. माझ्या एकाबाजूला समुद्र आणि दुसऱ्याबाजूला भारतमातेच्या शूर सैनिकांचं सामर्थ्य आहे. समुद्राच्या पाण्यावरील ही सूर्य किरणांची चमक म्हणजे वीर जवानांसाठी दिवाळीचे दिवे आहेत. या आमच्या दीपमाळा आहेत. INS विक्रांतवर काल घालवलेल्या रात्रीचं शब्दांत वर्णन करता येणं कठीण आहे. हे जहाज वैगेरे आपल्याजागी आहे. पण जी आवड तुमच्यामध्ये आहे, त्यामुळे जिवंतपणा त्यात येतो. हे जहाज लोखंडाचे आहे, पण तुम्ही जेव्हा त्यामध्ये उतरता तेव्हा त्यात शौर्य उतरतं” अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी नौसैनिकांच कौतुक केलं.
विक्रांत या नुसत्या नावानेच पाकिस्तानची झोप उडाली
“आमच्या तिन्ही सैन्य दलात असलेल्या असाधारण समन्वयामुळे पाकिस्तानला रेकॉर्ड वेळेत गुडघे टेकायला भाग पाडलं. मी पुन्हा एकदा सशस्त्र पथकाच्या वीर जवानांना सलाम करतो. काही महिन्यांपूर्वी आपण बघितलं की, विक्रांत या नुसत्या नावानेच पाकिस्तानची झोप उडाली. ज्याचं नाव शत्रुच्या साहसाचा शेवट करेल ते म्हणजे INS विक्रांत. आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडियाच INS विक्रांत सर्वात मोठं प्रतीक आहे. स्वदेशी INS विक्रांत भारताच्या सैन्य क्षमतेचे प्रतिबिंब आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
डिफेन्स एक्सपोर्ट ३० पटीने वाढला
“आता सरासरी ४० दिवसांनी एक नवीन स्वदेशी युद्धनौका आणि पाणबुडी नौदलात सहभागी होत आहे. आमच्या ब्राह्मोस आणि आकाश मिसाइलने ऑपरेशन सिंदूरवेळी आपली क्षमता सिद्ध केली. जगभरातील अनेक देश आता ही शस्त्रे खरेदी करण्यात रस दाखवत आहेत. मागच्या एक दशकात आमचा डिफेन्स एक्सपोर्ट ३० पटीने वाढला आहे. यात सर्वात मोठं यश डिफेन्स स्टार्टअपच आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\