विषमुक्त शेतीच्या ध्यासातून मृदासंवर्धन

    02-Oct-2025   
Total Views |
  
आज विजयादशमी. घटस्थापनेपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवाची सांगता. याच नवरात्रोत्सवादरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही स्त्रीशक्तीचा जागर म्हणून आपण विविध क्षेत्रांतील काही कर्तृत्ववान नवदुर्गांचा सन्मान केला. या नवदुर्गांच्या माळेतील अखेरचे पुष्प पुण्याच्या जुन्नरमध्ये प्रयोगशील शेतकरी आणि उद्योजिका म्हणून उदयास आलेल्या काव्या ढोबळे-दातखिळे यांच्या कार्याला समर्पित...

कष्ट करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडसी निर्णय घेण्याची क्षमता असेल, तर एक स्त्री शून्यातून विश्व निर्माण करू शकते. धोपट मार्ग सोडून आणि परंपरागत शेतीची चौकट मोडून विषमुक्त शेती आणि माती संवर्धनासाठी झटणार्‍या काव्या ढोबळे-दातखिळे यांनी हे दाखवून दिले आहे.

आज आघाडीच्या प्रत्येक क्षेत्रात महिला आपले अस्तित्व यशस्वीपणे सिद्ध करीत आहेत. त्यात कृषिक्षेत्रदेखील मागे नाही. मुंबईसारख्या महानगरात नर्सिंगसारख्या क्षेत्रात सरकारी पदावर कार्यरत असणार्‍या काव्या यांनी ’मृदा संवर्धन आणि विषमुक्त शेती’ या विषयावर काम करण्यासाठी दरमहा ७५ हजार रुपये पगाराच्या सरकारी नोकरीवर पाणी सोडले आणि पुण्यातील जुन्नर तालुक्यातील मूळ गाव दातखिळेवाडीला त्या परतल्या.

‘कोरोना’ काळात आरोग्यसेवा बजावत असताना डोळ्यांदेखत त्यांनी अनेकांना जीव गमावताना पाहिले. या परिस्थितीत त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन बदलला. त्यांच्या लक्षात आले की, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, असेच रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहण्यासाठी योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली राखणे, गरजेचे आहे. आपण जे खातो, ते कुठून येतं, ते कसं पिकवलं जातं, या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचे त्यांनी ठरवले. त्यातून रासायनिक खतांचा मारा, कीटकनाशकांचा वापर यातून मानवी शरीराला वाचवण्यासाठी विषमुक्त शेती हाच पर्याय आहे, असा निश्चय त्यांनी केला.

गावाकडे परतल्यावर त्यांच्या लक्षात आले की, अनेक तरुण ‘कोरोना’ महामारीच्या काळात गावाकडे परतले होते. मात्र ते रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर करून पारंपरिक पद्धतीनेच शेती करत होते. पारंपरिक पद्धतीने केल्या जाणार्‍या तसेच रासायनिक शेतीमुळे मातीचं ढासळत चाललेलं आरोग्य लक्षात घेऊन शेतकर्‍यांनी विषमुक्त शेतीकडे वळावं, यासाठी त्यांनी विषमुक्त शेतीचे मॉडेल तयार केले आणि शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून ‘कृषिकाव्या गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पा’ची सुरुवात केली. विषमुक्त शेती करणार्‍या शेतकर्‍यांना वेळेत योग्य दर्जाचे गांडूळ खत पुरवून कमीत कमी भांडवलात जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल, तसेच पिकवलेल्या मालाला योग्य दर कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करून तीन हजारांहून अधिक शेतकर्‍यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. आणि प्रत्येक गावात एक गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प उभा राहिला पाहिजे, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. आतापर्यंत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ३०० हून अधिक प्रकल्प उभारले आहेत.

कृषिक्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना ‘शारदा सन्मान पुरस्कार’, ’झी युवा बळीराजा सन्मान’, ’कृषिसेवक पुरस्कार’, ’कृषिथॉन प्रयोगशील महिला उद्योजक सन्मान’, ’सह्याद्रीतील निसर्गरक्षक पुरस्कार’, ’व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले आहे. दरम्यान, त्या युट्यूब, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफार्मचा प्रभावीपणे वापर करून, त्यांच्या प्रॉडक्टची विक्री करत असून, या माध्यमांतून त्यांनी असंख्य ग्राहक जोडले आहेत. दरम्यान ’काव्याज व्लॉग’ या त्यांच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून यशस्वी शेतकर्‍यांच्या यशोगाथा, आधुनिक शेती आणि शेतीतील नवनवीन प्रयोग दाखवत असतानाच त्यांना मातीचे आरोग्य जपणार्‍या गांडूळ खतनिर्मिती या व्यवसायाची कल्पना सूचली.

स्वानुभवातून शिकलेल्या काव्या नव्या पिढीतील तरुणांना “शेतीची सुरुवातच विषमुक्त पद्धतीने करा,” असे सांगतात. त्या म्हणतात, “मातीकडून मिळणारे परिणाम हे दीर्घकाळ टिकणारे असतात. शेतीच्या बाबतीत ९९ टक्के काम माती म्हणजे मातीतील जिवाणू करतात आणि उरलेलं एक टक्का काम शेतकरी करतो. पण हल्ली रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या मार्‍यामुळे मातीतील जीवाणू हे नष्ट झाले आहेत. त्यांना जगवणं किंवा त्यांना पुन्हा रिप्लेस करणं फार गरजेचं आहे आणि ते काम गांडूळ खतामधून होऊ शकते. म्हणजे नुसतेच राबत बसण्यापेक्षा मातीला सक्रिय करणे गरजेचं आहे, त्यामुळे जर मातीवर काम केलं, तर आपले काम बर्‍यापैकी कमी होते. त्यांचे पती राजेश यांनीदेखील अभियांत्रिकी क्षेत्रातील नोकरी सोडून काव्या यांना या उद्योग उभारणीत सहकार्य करून वेळ देत आहेत.

‘कोरोना’ काळात विषमुक्त शेतीची संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून सुरुवातीला त्यांनी केवळ पाच गुंठ्यांत छोट्या प्रमाणावर सुरू केलेला गांडुळ खतनिर्मिती हा व्यवसाय, आता जवळपास एकरपर क्षेत्रावर कार्यरत असून, यामध्ये त्यांना नोकरीपेक्षाही चांगली आर्थिक प्राप्ती व मानसिक समाधानही मिळते. त्यामुळे “बाहेरगावी शहरांमध्ये दहा-बारा हजार रुपयांची नोकरी करण्यापेक्षा शेतकर्‍यांच्या मुलांनी शेतीपूरक उद्योग व्यवसायाकडे वळले पाहिजे. सेंद्रीय शेतीसोबत शेतीपूरक जोडव्यवसाय केल्यास, शेती परवडत नाही, असे म्हणण्याची वेळ येणार नाही,” असे ते त्या ठामपणे सांगतात.

शेतकरी आपल्या शेतात रासायनिक खते आणि औषधांचा अमर्याद वापर करत असल्याने उत्पादनखर्चात वाढ होऊन जमिनीचे आरोग्यही बिघडते. यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. त्याचे मानवी आरोग्यावरही याचे दुष्परिणाम होत आहेत. शेणखताचा थेट शेतात वापर करण्यापेक्षा गांडूळ खत बनवून वापरल्यास निश्चितपणे फायदेशीर ठरते आणि जमिनीचा पोतही सुधारतो. या विचारांतून सुरू झालेला काव्या यांचा हा प्रवास आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. गांडूळ खतनिर्मितीच करत नाहीत, तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असणार्‍या बेरोजगार तरुण व शेतकर्‍यांना प्रशिक्षणही देत आहेत. संबंधितांना मागणीनुसार गांडूळ खताचा पुरवठाही करतात. त्यांच्याकडे महाराष्ट्रभरातून व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असणारी मंडळी प्रशिक्षण घेण्यासाठी येतात.

‘माती संवर्धन व विषमुक्त शेती’ संकल्पनेची व्यावसायिक सांगड घालत ‘गांडूळ खतनिर्मिती’ हा शेतीपूरक व्यवसाय यशस्वीपणे चालवून, महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, हे स्वकर्तृत्वाने सिद्ध केले आहे. अशा शेतीसाठी आणि शेतकर्‍यांसाठी झटणार्‍या या कृषिकन्येला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\