Diwali Update : राज्यातील विविध भागात साजरा होणार दीपावली पहाट सांस्कृतिक उत्सव

उत्सवात सहभागी होण्याचे मंत्री आशिष शेलार यांचे आवाहन

    18-Oct-2025   
Total Views |
 
diwali
 
मुंबई : ( Diwali ) राज्यातील विविध भागात साजरा होणार दीपावली पहाट सांस्कृतिक उत्सव सांस्कृतिक कार्य संचालनालयाने विविध ठिकाणी 'दीपावली पहाट' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून दिवाळीच्या ( Diwali ) निमित्ताने होणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे. मुंबईतील रसिकांना गिरगाव, दादर, वांद्रे आणि मुलुंड येथे या कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे.
 
दिपावली पहाटचे वेळापत्रक कसे असेल?
 
रविवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वा. गिरगाव येथील साहित्य संघात ‘मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. अमित गोठिवरेकर यांच्या संगीत संयोजनात उत्तरा केळकर, सोनाली कर्णिक, दत्तात्रय मेस्त्री, अभिषेक नलावडे यांचे गायन होणार आहे. दि. २० ऑक्टोबर रोजी वांद्रे पश्चिमेच्या रंगशारदा सभागृहात होणाऱ्या 'स्वरोत्सव' या दीपावली पहाट कार्यक्रमात जयचंद्र मेचुंडी आणि सायली तळवलकर यांच्या गायनाला संजय उपाध्याय यांच्या प्रासादिक निवेदनाची जोड मिळणार आहे.
 
तसेच दि. २१ ऑक्टोबर रोजी पहाटे ६.३० वाजता दादर शिवाजी उद्यान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात रंगणाऱ्या 'त्रिवेणी संगीत दिवाळी पहाट' या कार्यक्रमात शाल्मली सुखटणकर, दत्तात्रय मेस्त्री, सोनाली कर्णिक, अभिषेक नलावडे हे गायक कलाकार ग. दि. माडगुळकर, जगदीश खेबुडकर आणि मंगेश पाडगावकर या दिग्गज कवींची गाजलेली गीते सादर करणार आहेत. दि. २२ ऑक्टोबर रोजी पहाटे ६.३० वा. मुलुंड पश्चिमेच्या कालीदास नाट्यगृहात सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या अजरामर गीतांवर आधारित 'दीप उत्सव दिवाळी पहाट' कार्यक्रमात अजित परब, शाल्मली सुखटणकर, प्राजक्ता सातर्डेकर आणि अभिषेक नलावडे हे गायक कलाकार रंगत आणणार आहेत.
 
विनामूल्य प्रवेशिका
 
या सर्व ठिकाणी रसिकांसाठी विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध असून एका प्रवेशिकेवर दोघांना प्रवेश मिळणार आहे. रसिकांनी या दिवाळी पहाट ( Diwali ) कार्यक्रमात सहभागी होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन मंत्री आशिष शेलार यांनी केले आहे.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....