एखाद्याला रडायचीच इतकी सवय असते की, प्रत्येक गोष्ट तो रडवेल्या सुरातच सांगत सुटतो. जगात काही चांगले होत आहे, हे त्याने जणू अमान्यच केलेले असते. कोणी काही बोलले किंवा काही चांगले कार्य केले, तरी त्यात दोष शोधायची त्याला सवयच लागलेली असते. सध्या महाराष्ट्रातील राजकारणात असे रडके लोक आता विरोधी पक्षात अधिक संख्येने वाढलेले दिसतात.
राज्याचे राजकारण केवळ वाहिन्यांवर दाखवल्या जात असलेल्या बातम्यांमुळे ओंगळवाणे आणि गलिच्छ झाले आहे. किंबहुना, राज्यातील विद्यमान शासन हे लोकांच्या जीवावर उठल्याचा आव जणू या सर्वांनी ठरवून आणलेला दिसतो, असेच सध्याचे नकारात्मक चित्र निर्मितीचे प्रयत्न जोरदार सुरु आहेत. आधी हे सरकार सत्तेत आले, तेव्हा ‘खोके’ नावाचा प्रकार विरोधकांनी समोर आणला. समाजमाध्यमांतील उतावीळवीरांनी तर याला अमाप प्रसिद्धी देत, आपण खूप मोठे तीर मारले आहेत, असाच आविर्भाव आणला. कालांतराने हे मागे पडले आणि मग दुसरे काहीतरी सरकारविरोधात सुसाट बोलत सुटायचे, त्याला कोणताही आधार नसतो, असे बोलत राहायचे, एवढाच कार्यक्रम या विरोधकांनी सुरू ठेवला.
काँग्रेस पक्षातील लोक मध्यंतरीच्या काळात कोमात गेल्याने त्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. अधूनमधून विजय वडेट्टीवार काहीतरी बोलून जायचे आणि आपला राग शांत करायचे, नाना पटोले काँग्रेसमध्ये आहेत की नाही, हा शोध घ्यावा लागत होता. बाळासाहेब थोरातांचीही तीच गत. मुंबईतील लोकांना बोलायची सोय नव्हती. अन्य प्रमुख नगरांमध्ये तर काँग्रेस पक्षात शुकशुकाट. मग काय संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनाच ‘कव्हरेज’ देण्याशिवाय उतावीळ माध्यमांना पर्याय उरला नाही.
शरद पवार, सुप्रिया सुळे यांनादेखील काय बोलावे, सूचेनासे झाले होते. जयंत पाटलांना भाव द्यावा की नाही, अशी स्थिती. विरोधक सरकारविरोधात बोलतात, याच केवळ बातम्या आहेत, असा भ्रम झालेल्या माध्यमांना हे नेतेतरी किती दिवस आपला ‘टीआरपी’ तारणार, हा प्रश्न पडला आणि नागरिकांनादेखील हे रडगाणे किती काळ सहन करायचे, हा प्रश्न पडला. पण, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता, ही रडारड, विरोधकांचा कांगावा वाढतच जाणार, हे वेगळे
सांगायला नको.
तारक की?
राज ठाकरे यांना आता विरोधकांनी आपला राजकीय तारणहार म्हणून पुढे आणले की काय, असा प्रश्न सर्वांनाच पडलेला. ‘लाव रे तो व्हिडिओ’ असा आदेश सहकार्याला जाहीर मंचावरून देणाऱ्या आणि नंतर राज्यातील राजकारणात एकाकी पडलेल्या या नेत्याने आता स्वतःचे पुनर्वसन करायचे की, महाविकास आघाडीतील नेत्यांच्या बालिश आरोपांमध्ये सामील व्हायचे, हे ठरवायचे आहे. आपल्या इंजिनाची राजकीय दिशा कधीच निश्चित नसलेल्या या नेत्याने आपल्या राजकीय उज्ज्वल कारकिदला कधीच लाथ मारली. केवळ वक्तृत्वाच्या भरवशावर त्यांनी जनतेचे मनोरंजन करण्याशिवाय दुसरे राज्याच्या प्रगतीसाठी कोणतेही ठोस काम केल्याचे जनतेला स्मरत नाही.
आधी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून होणारे राजकीय मनोरंजन आणि आता राज ठाकरे आपल्या शैलीत करणारे मनोरंजन एवढाच काय तो विरोधकांचा प्रचार, हे या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन जे काही बाष्कळ आरोप केले, यावरूनच लक्षात येते. सरकारविरोधात ठोस यांच्याकडे काहीही नाही आणि सरकार विकासाशिवाय काहीही दुसरे करीत नाही. विशेष म्हणजे, आता या नेत्यांना रोज-रोज माध्यमांपुढे बघून कंटाळलेल्यांसाठी किंवा जे मनोरंजन म्हणून याकडे बघतात, त्यांच्यासाठी आता राज ठाकरे सरकारविरोधात पुढे आले आहेत. खरे तर सरकार लोकांसाठी कामे करत असताना, विकासकामांचा वेग राज्यात वाढलेला असताना आणि नागरिकांची कोणतीही तक्रार नसताना जे काही विरोधक राज्यात तमाशा करतात, अशीच भावना नागरिकांची होत आहे.
विरोधक मविआ नेत्यांसोबत राज यांना बघून काही मनसे आणि मविआवाल्यांना संकोचल्यासारखे झाले होते म्हणे. मात्र, राज यांनी चक्क निवडणूक आयोगाला दुसरे कामच काय असते, असा बाष्कळ सवाल करून स्वतःदेखील संजय राऊत, उद्धव ठाकरे आदींसारखेच आहोत, हे दाखवून दिले. उतावीळ माध्यमांच्या काळजात मात्र त्यांच्या या वाक्याने धस्स झाले. सरकारविरोधात प्रचार करायला ते भविष्यात सामग्री देतील का, अशी चिंता त्यांना सतावित आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण हे विरोधक कोणत्या दिशेला नेतात, हे आगामी निवडणूक प्रचार काळात दिसून येईलच.
-अतुल तांदळीकर