पाटणा : (Bihar Assembly Election 2025) बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांची चुलत मेहुणी डॉ. करिश्मा राय (Karishma Rai) यांना परसा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
डॉ. करिश्मा राय या बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांच्या नात असून, आरजेडीचे ज्येष्ठ नेते चंद्रिका राय यांच्या भाची आहेत. तसेच त्या सीजीएसटी (केंद्रीय वस्तू आणि सेवा कर) चे आयुक्त विजय सिंह यादव यांच्या पत्नी आहेत. ही उमेदवारी केवळ कौटुंबिक घडामोडींवर आधारित नसून, ती लालू यादव यांनी कौशल्याने आखलेली एक राजकीय खेळी मानली जात आहे. तेज प्रताप यादव आणि त्यांच्या पत्नी ऐश्वर्या राय यांच्यातील घटस्फोटाचा खटला सध्या न्यायप्रविष्ट आहे. ऐश्वर्या ही करिश्मा राय यांची चुलत बहीण आहे. त्यामुळे करिश्मा यांना उमेदवारी देणे, हे तेज प्रताप यांच्याविरोधातील अप्रत्यक्ष संदेश म्हणून पाहिले जात आहे.
दरम्यान, तेज प्रताप यादव यांनी आरजेडीपासून विभक्त होऊन स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे आणि ते महुआ मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी आपल्या समर्थकांना उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहण्याचे आवाहनही केले आहे.बिहार विधानसभा निवडणुका (Bihar Assembly Election 2025) दोन टप्प्यांत पार पडणार असून, पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत लालू यादव यांनी कुटुंबीयांतील तणाव, राजकीय संधी आणि अनुभव यांचा समतोल साधत घेतलेला हा निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे.