बिहारच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! प्रशांत किशोर यांची विधानसभा निवडणुकीतून माघार; सांगितलं 'हे' कारण

    15-Oct-2025   
Total Views |

Prashant Kishor

 
मुंबई : (Prashant Kishor on Bihar Election) बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीसाठी इंडी आणि एनडीए आघाडीचे नेते सज्ज झाले आहेत; मात्र यांना टक्कर देण्यासाठी यंदा राजकीय रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचा जनसुराज्य पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. अशातच आता प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी एक मोठी धक्कादायक घोषणा केली आहे. विधानसभेच्या तोंडावर त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
 
पक्षहितासाठी हा निर्णय घेतलाय
 
पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना प्रशांत किशोर (Prashant Kishor) म्हणाले, "आमच्या पक्षाने घेतलेल्या निर्णयानुसार मी निवडणुकीला उभा राहणार नाही, त्याऐवजी मी इतर उमेदवारांचा प्रचार करणार आहे. मी जर स्वतः निवडणुकीला उभा राहिलो तर पक्षाच्या प्रचाराकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यातून पक्षसंघटनेच्या कामाला फटका बसेल. त्यामुळे पक्षहितासाठी हा निर्णय घेतला आहे", असे म्हणत त्यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.


या दोनच शक्यता दिसतायत
 
तसेच पुढे बोलताना प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी निकालाबाबतही खळबळजनक दावा केला, ते म्हणाले, "जर बिहारमध्ये जनसुराज्य पक्षाचा विजय झाला तर त्याचा राष्ट्रीय स्तरावर परिणाम होईल. राष्ट्रीय राजकारणाची कमान वेगळ्या दिशेने जाईल. बिहारच्या निवडणुकीत आमच्या पक्षाचा एकतर बहुमताने विजय होईल किंवा पक्षाचा सपशेल पराभव होईल. या दोनच शक्यता मला दिसत आहेत. मी आजवर अनेकदा पूर्ण खात्रीने सांगत आलो आहे की, माझ्या पक्षाला एकतर १५० हून अधिक जागा किंवा १० पेक्षाही कमी जागा मिळतील. याव्यतिरिक्त इतर काही होण्याची शक्यता नाही", असे विधान प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी केले.
 
राजद नेते तेजस्वी यादव यांच्याविरोधात राघोपूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत किशोर (Prashant Kishor)निवडणूक लढवतील, असे अंदाज वर्तवले जात होते. मात्र आता या मतदारसंघातून स्थानिक व्यावसायिक चंचल सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव विरुद्ध बसून प्रशांत किशोर (Prashant Kishor) असा सामना होणार नाही.
 
 

 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\