यंदाचा ‘नोबेल शांतता पुरस्कार’ व्हेनेझुएलाच्या मारिया मचाडो यांना जाहीर झाला. दि. १० डिसेंबर २०२५ रोजी ओस्लो नार्वे येथे त्यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मागे सारत त्यांनी हा पुरस्कार मिळवला वगैरे वगैरे म्हटले जाते. पण, ‘नोबेल पुरस्कारा’मागचे सत्य नक्की काय आहे, याचा घेतलेला हा मागोवा...
दिसताक्षणी तिला पोलीस पकडणार होते, म्हणून गेले अनेक महिने ती लपून होती. मात्र, तिथे सरकारविरोधात मोर्चा निघाला. गरीब दिसणारे आणि असणारे लोक रस्त्यावर उतरले होते आणि त्या मोर्चात अचानक ती आली. मोर्चाचे नेतृत्व केले आणि तिने लोकांच्या हक्कांची मागणी केली. सरकारी यंत्रणांनी त्या मोर्चाला घेरले. तिला पकडण्यासाठी पोलीस आले मात्र, मोर्चातल्या आयाबायांनी एकच गलका केला, ती आमची आशा आहे, तिला हात लावू देणार नाही. दरम्यान आजूबाजूच्या गल्लीबोळातील रस्त्यातून युवक आले. त्यांनी तिला पोलिसांपासून वाचवत त्या मोर्चातून बाहेर नेले. सरकारी यंत्रणा काहीच करू शकल्या नाहीत. हे कुठे घडले, तर ही घटना होती व्हेनेझुएलामधील. ती महिला होती मारिया कोरिना मचाडो. होय, ज्यांना यंदाचा ‘नोबेल शांतता पुरस्कार’ मिळाला तिच ही मारिया. मारिया यांची कारकीर्द पाहू. त्या ‘व्हेंटे व्हेनेझुएला’ या उदारमतवादी पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक आणि सह-संस्थापक आहेत. त्यांनी २०१० ते २०१५ या काळात, राष्ट्रीय सभेत खासदार म्हणून काम केले होते.
देशाचे राष्ट्राध्यक्ष निकोलास मादुरो हे लबाडी करून सत्तेत आल, निवडणुका पारदर्शी झाल्या नाहीत, असे मारिया यांचे म्हणणे होते. निवडणुका पारदर्शी व्हाव्यात, व्हेनेझुएलामध्ये निवडणुका कोणत्याही दडपणाशिवाय मुक्तपणे व्हाव्यात, यासाठी मारिया यांनी ‘सुमाते’ नावाची नागरी संस्था स्थापन केली. सत्ताधारी पक्षाने त्यांच्यावर देशद्रोह आणि कटाचे आरोप केले. प्रवासबंदी आणि राजकीय अपात्रतेचीह त्यांच्यावर कारवाई केली. त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घातली पण, मारिया यांनी एडमंडो गोन्झालेझ उर्रुटिया यांना पाठिंबा दिला. समर्थक नागरिकांच्या नेतृत्वाखाली मतदान केंद्रांचे निरीक्षण, मतमोजणीचे दस्तऐवजीकरण आणि निवडणूक गैरप्रकार उघड करण्याचे प्रयत्न केले. यामुळेच मारिया यांना ‘नोबेल पुरस्कार’ जाहीर झाल्याचे म्हटले जाते. आपल्यालाच शांततेचा ‘नोबेल पुरस्कार’ मिळावा म्हणून ट्रम्प यांनीही विशेष प्रयत्न चालवले होेते. पण, लोकशाहीची ज्योत जिवंत ठेवणारी धैर्यशील आणि समर्पित शांततेची दूत असे म्हणत ‘नोबेल समिती’ने मारिया मचाडो यांना ‘नोबेल शांतता पुरस्कार’ जाहीर केला.
हा पुरस्कार जाहीर झाल्या झाल्या मारिया यांनी म्हटले की, ट्रम्प आणि लॅटिन अमेरिकेच्या समर्थनावर जास्त विश्वास ठेवायला हवा. पुरस्कार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना समर्पित आहे.‘नोबेल’ शांततेच्या पुरस्कारासंदर्भातल्या या घटना वरवर सरळ साध्या वाटतात. पण, मारिया यांना मिळालेला शांततेचा ‘नोबेल’ पुरस्काराचा मागोवा घेतला तर जाणवते की, प्रत्यक्षात जे दिसते ते तसेच नाही. ट्रम्प आणि पुतीन काही एकमेकांचे दोस्त नाहीत किंवा शुभचिंतकही नाहीत. मात्र, तरीही पुतीन ट्रम्प यांना ‘नोबेल’ मिळावे, याबाबत आग्रही होते, का? तर यामागे राजकारण आहे तेलसाठ्याचे.
व्हेनेझुएलामध्ये जगाच्या तुलनेत सर्वांत जास्त तेलसाठा आहे. या तेलसाठ्यावर एनकेनप्रकारे मालकी मिळवण्यासाठी अमेरिका आणि युरोप प्रयत्न करतात. मात्र, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपती निकोलस मादुरो यांची दोस्ती रशिया आणि चीनसोबत आहे. चीनमधील ९० टक्के तेलाची आपूर्ती व्हेनेझुएला देशाकडून होते. रशिया आणि चीनने व्हेनेझुएला देशामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. व्हेनेझुएलामुळेच रशिया आणि चीनला दक्षिण अमेरिका खंडात प्रवेश मिळाला. अर्थातच हे अमेरिकाला सहन होण्यासारखे नाही. निकोलस हे ड्रग्ज पेडलर आहेत, ते आणि त्यांचे साथीदार अमेरिकेमध्ये ड्रग्जचा व्यापार करतात असे म्हणत, अमेरिकेने त्यांच्याविरोधात अटक वॉरेंट काढले. त्यांना पकडून देणार्यांना बक्षीसही जाहीर केले. हे तेच निकोलस आहेत, ज्यांनी सत्तेेतून बाहेर पडावे म्हणून मारिया यांनी आंदोलने सुरू केली. देशात बेरोजगारी, भ्रष्टाचार आहे गरिबी आहे, हे बदलायचे असेल तर निकोलस यांना सत्तेतून खाली खेचणे आवश्यक आहे.
तसेच, तेलसाठे हे खासगी करावे, हे सगळे परदेशाशी हातमिळवणी केल्याशिवाय हे शक्य नाही, असे मारिया यांचे म्हणणे होते. जोपर्यंत निकोलस सत्तेत आहेत, तोपर्यंत चीन आणि रशिया यांना शह देता येणार नाही, हे अमेरिकेला चांगलेच माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर व्हेनेझुएलामध्ये निकोलस यांच्याविरोधात मारिया यांचे नेतृत्व उभे राहिले. नेतृत्व उभारणीत मारिया यांना कुणी सहकार्य केले असेल? याचे उत्तर मिळाले, ते म्हणजे ‘नोबेल पुरस्कार’ जाहीर झाल्यावर मारिया यांनी पुरस्कार ट्रम्प आणि अमेरिकेला समर्पित केला. निकोलस यांना विरोध करणार्या मारिया या युरोप आणि अमेरिकेच्या गळ्यातल्या ताईत, तर रशिया आणि चीनच्या दृष्टीने विरोधक बनल्या. त्यामुळेच मारिया यांना ‘नोबेल’ मिळाला, याच्या आनंदाऐवजी ट्रम्प यांना ‘नोबेल’ मिळायला हवे होते असे पुतीन म्हणाले. मारिया यांना ‘नोबेल’ मिळावे, यासाठी अमेरिकेच्या सिनेट सभासदांनी ‘नोबेल’ समितीला पत्र लिहिल्याचेही उघड झाले आहे. मारिया यांना ‘नोबेल शांतता पुरस्कार’ मिळाल्याचे पडसाद व्हेनेझुएला सरकारमध्ये कसे उमटतील? हाच खरा खेळ आहे. तेलसाठ्यावर नियंत्रण आणि ‘नोबेल पुरस्कार’ यांचे नाते काय बरं असेल? तरीही तूर्तास मारिया कोरिना मचाडो यांचे अभिनंदन!
शांततेच्या ‘नोबेल पुरस्कारा’चा इतिहास...
नॉर्वेजियन ‘नोबेल कमिटी’ ही नॉर्वेच्या संसदेतून नियुक्त केलेली, पाच सदस्यांची एक स्वतंत्र संस्था आहे. ही समिती ‘नोबेल शांतता पुरस्कारा’ची निवड करते. हा पुरस्कार मिळावा म्हणून, महात्मा गांधी यांचे नामाकंन पाच वेळा करण्यात आले होते. मात्र, त्यांना पुरस्कार प्राप्त झाला नाही. विशेष म्हणजे हिटलर आणि मुसोलिनी यांचेही पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते. या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी, यावर्षी ३३८ नामांकने प्राप्त झाली होती. ज्यामध्ये २२४ व्यक्ती आणि ९४ संस्थांचा समावेश होता. या पुरस्कामध्ये मारिया यांना ११ दशलक्ष स्विडीश क्रोन (१ लाख, १५६ हजार,६५२.८६ डॉलर्स) मिळणार आहेत.
मारिया कोरिना मचाडो यांच्याविषयी...
उच्चशिक्षित मारिया मचाडो यांना व्हेनेझुएलाची ‘आर्यन लेडी’ म्हटले जाते. ‘नोबेल’ मिळवणार्या त्या २०व्या महिला असून, दक्षिण अमेरिकेतील पहिल्या महिला आहेत. त्यांना ‘बीबीसी’च्या २०१८ सालच्या १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत स्थान मिळाले होते. त्यांना २०१४ साली ‘चार्ल्स टी. मॅनट पुरस्कार’, २०१५ साली ‘लिबर्टाड कॉर्टेस डी कॅडिझ’ आणि २०१९ साली ‘लिबरल इंटरनॅशनल फ्रीडम प्राईझ’ असे प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.