
रा. स्व. संघाने शताब्दी वर्षानिमित्त पंचपरिवर्तनाचा विषय लोकांपर्यंत पोहोचवून कृतिशील सामाजिक परिवर्तनाचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. पंचपरिवर्तनातील एक महत्त्वपूर्ण विषय म्हणजे, सामाजिक समरसता. उच्च-निच्चतेची भावना समाजमनातून नाहीशी झाली पाहिजे, यासाठी ‘सामाजिक समरसता मंच’ची निर्मिती झाली. हा मंच जातिभेदाचा कलंक नष्ट करण्यासाठी आजही प्रयत्नरत आहे. यासाठी कार्यकर्ते तयार करणे, अथांग चिंतन करणारे आणि प्रत्यक्ष प्रकल्पांच्या उभारणीकरिता ताकदीने लेखन करणारे, प्रसंगी त्यासंदर्भातील आव्हानांना तोंड देणारे असे चतुरस्र व्यक्तिमत्त्व म्हणजे पद्मश्री रमेश पतंगेे. तेव्हा पंचपरिवर्तनातील सामाजिक समरसता या तत्वाचे विविधांगी पैलू उलगडणारी रमेश पतंगे यांची ‘समरसता साहित्य परिषद’ महाराष्ट्राचे कार्यवाह प्रसन्न पाटील यांनी नुकतीच दै. मुंबई तरुण भारतच्या स्टुडिओत मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचा हा संपादित अंश...
‘सामाजिक समरसता’ परवलीचा शब्द! या तत्त्वज्ञानाला विरोध होताना दिसला. सामाजिक समरसता याचा नेमका अर्थ काय?
काही ठराविक लोकांनी समरसतेला विरोध केला. मात्र, आता तो विरोध बोथट झाला आहे. नवी संकल्पना, नवा विचार मांडणार्यांना सुरुवातीला विरोध हा होतोच. भगवान बुद्धांनी त्यांची संकल्पना मांडली, तेव्हा त्यांनाही किती विरोध झाला. अगदी त्यांची हत्या करण्याचेही प्रयत्न झाले. ज्यावेळी बाबासाहेबांनी भूमिका मांडली, त्यांनाही विरोध झाला. तसेच, समरसता ही आम्ही काही नवीन भूमिका मांडली किंवा नवीन संकल्पना शोधली म्हणून आम्हाला समरसतेचा साक्षात्कार झाला, असे आम्हाला वाटत नाही आणि असे आमचे अजिबात म्हणणेही नाही. राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी, देशात अस्पृश्यतेचा लवलेश राहू नये, जातीपातीत भेद राहू नये यासाठी स्थापनेपासूनच रा. स्व. संघ काम करतो आहे. मात्र, काहींनी याविरोधात राजकीय दुकाने थाटली. त्यांनी संघाला विरोध केला. काय सत्य, काय असत्य याचा अजिबात विचार न करता, त्यांचे काम एकच होते ते म्हणजे, त्यांचे दुकान थेट चालवण्यासाठी संघाला विरोध करण्याचे. ‘समरसता मंचा’चे काम करताना या विरोधाला जेवढे गांभीर्याने घ्यायचे, तेवढे गांभीर्याने आम्ही घेतले. पण, त्यांच्या विरोधाला घाबरलो नाही. आता आम्ही आमच्या समरसता भूमिकेबाबत अधिक आक्रमक झालो आहोत. तथागत गौतम बुद्धांनी मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा सांगितली. त्यानुसार समरसतेसाठी काम केले. उदाहरणार्थ समाजामध्ये सर्वसामान्य भरपूर लोक असे असतात की, त्यांना विचारले कसे काय सुरु आहे? तर त्यांचे उत्तर असते आनंदात आहे, छान चालले आहे. त्यांच्याकडेही दुःख असतचे पण, तरीही ते आनंदी आहेत असे सांगतात. त्यांच्या आनंदात आनंद शोधणे. तर दुसरीकडे काही असेही लोक आहेत, ज्यांच्या मागे दुःख हात धुवून लागलेले असते. त्यांच्या आयुष्यात समस्याच समस्या असतात. त्यांच्याविषयी करुणा व्यक्त करणे, त्याच्या दुःखात सहभागी होणे, ही आहे करुणा-मैत्री. तत्त्वज्ञानानुसार उपेक्षेचा अर्थ मी काय काढतो, तर जी जी वाईट प्रवृत्तीची माणसं आहेत त्यांना आपण सुधारू शकत नाही, त्यांची उपेक्षा करा. कारण, अंगुलिमालला सुधारण्याची शक्ती भगवान गौतम बुद्धांकडे होती. ते अंगुलिमालला सुधारू शकले. या दृष्टिकोनातून आपल्या मते उपेक्षा म्हणजे काय असावी? तर माझ्या मते, काही लोक कुत्र्याच्या शेपटीसारखे असतात. त्यांना कितीही सुधारले, तरी ते सुधारित नाहीत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांची उपेक्षा करा. उदाहरणार्थ, असा एक समुदाय आहे जो कायम आम्हाला शिव्या घालतो, त्यांचे काय करायचे? तर त्यांचे बोलणे या कानाने ऐकायचे त्या कानाने सोडून द्यायचे. त्यांची उपेक्षा करायची.
‘समता’ रूढ शब्द आहे. ‘समता’ असताना ‘समरसता’ का?
भगवद्गीतेमध्ये ७०० श्लोक आहेत, त्यांपैकी ४१ श्लोकांत समता शब्द आला आहे. तो शब्द ‘समत्व’ या रूपाने आला आहे. महापुरुषांच्या जीवनाचे सार समत्व आहे. समता समाजामध्ये प्रत्यक्षपणे अनुभवायची आहे, तर प्रत्यक्ष समरसता आणल्याशिवाय ते शक्य नाही. समतेला विरोध असण्याचे कारणच नाही. समतेसाठी मैत्री, करुणा, मुदिता या भावनेने समरस झाल्याशिवाय, समता अनुभवता येणार नाही. समतेचे कायदे करता येतात. संविधानातही कायदे आहेत. कायद्याला विरोध केला, तर शिक्षा होते. पण, कायदा माणसामध्ये मानसिक परिवर्तन घडून आणू शकत नाही. कायद्याची गरज आहेच पण, आपल्याला त्याच्यापलीकडे जायचे आहे. एकरस, एकमय समाजनिर्मिती करायची आहे. त्या समरस समतेसाठी, समरसतेचा भाव निर्माण होणे गरजेचे आहे.
सामाजिक न्याय म्हणजे काय? समरसता त्याला पूरक कशी आहे?
सामाजिक आणि न्याय दोन शब्द आहेत. न्याय म्हणजे काय? चोराला पकडले. आरोप सिद्ध झाला, त्याला शिक्षा झाली, ज्याची चोरी झाली होती, त्याला चोरीचा माल परत दिला, न्याय झाला. पण, सामाजिक न्यायाचा असा मर्यादित अर्थ नाही; तर समाजव्यवस्थेच्या शोषणातूनच समाजाच्या घटकांवर अत्याचार होतात. ज्या व्यवस्थेमुळे अन्याय झाला, ती व्यवस्था बदलणे हा विषय म्हणजेच सामाजिक न्याय होय. हा विषय समाज परिवर्तनाचा आहे. यासाठी पिढ्यान्पिढ्या काम करावे लागते. दुसर्या देशात असे बदल घडवण्याच्या भयंकर पद्धती होऊन गेल्या. एकसारखा असलेला समाज निर्माण करण्यासाठी, रशियामध्ये लेनीन- स्टॅलिनने अडीच कोटी माणसे मारली. त्यांना वर्गविहीन समाज निर्माण करायचा होता, हे सारेच भयंंकर होते. अमेरिकेमध्ये निग्रोंवर अत्याचार झाला. आठ लाख लोक मारले गेले. आपल्याकडे असे झाले नाही. आपल्याकडे एक माणूस जरी मेला, तरी आपण सहन करू शकत नाही. माणसं जिवंत राहायला हवीत आणि जिवंत माणसामध्ये सुधारणा व्हाव्यात, असे आपले संस्कार आणि विचारही आहेत. १४० लोकांच्या मनात बदल घडवून आणणे, ही प्रदीर्घ प्रक्रिया आहे. हे परिवर्तन घडवण्यासाठी लक्षावधी समर्पित कार्यकर्ते लागतील. या सामाजिक समरसतेसाठी ‘समरसता मंच’चे हजारो कार्यकर्ते आज कार्यरत आहेत.
सामाजिक समरसतेबाबत काय म्हणाल?
सामाजिक समरसता याचा महाराष्ट्रापुरता अर्थ असा आहे की, समाजामध्ये जातीपाती आहेत, विषमता आहे. यासंदर्भात शोषित-वंचित समाजाबाबत इतर समाजाचा व्यवहार जर विषमतापूर्ण असेल, तर असा व्यवहार एकूणच आपल्या व्यापक तत्त्वज्ञानात कुठेही बसणारा नाही. सामाजिक समरसता म्हणजे कुणाला हीन मानू नका, एकमेकांच्या घरी जा, सहजतेने स्नेहाचा, आपलेपणाचा व्यवहार करा.
सामाजिक समरसतेसाठी कार्यकर्ता कसा निर्माण होतो?
सामाजिक समरसतेसाठी काम करणारे कार्यकर्ते उभे करणे हे महत्त्वाचे काम. ज्यांना सोबत घेऊन सामाजिक समरसतेसाठी काम करायचे, तो कार्यकर्ता पूर्व संस्कार घेऊन येतो. त्यामुळे त्यांचे वर्ग घेणे, शिबीर घेणे यांचे आयोजन करावे लागते. तसेही रा. स्व. संघाचे कार्यकर्ते दोन पद्धतीने काम करतात. संघाने सांगितले म्हणून कार्य करायचे, पटो अथवा ना पटो. तो संघाने सांगितले म्हणून तांत्रिकदृष्टीने काम करतो. उदाहरणार्थ, सामाजिक समरसतेसाठी कार्यक्रम करायचा आहे, तर तो कार्य्कर्ता त्या कार्यक्रमाची तयारी चोख करेल. तर दुसरा कार्यकर्ता असा आहे की, जो विचार करतो की, कार्यक्रम कशासाठी करायचा आहे? यातून समरसतेचा भाव समाजात निर्माण होणार का? याचे उद्दिष्ट काय? असा विचार आणि कार्य करणाराच कार्यकर्ता असतो. असा कार्यकर्ता घडवण्याचा प्रवास आहे.
तुम्ही संत आणि महंतांच्या विचारांचा समरसतेत असलेल्या एकात्मतेचा प्रवाह मांडला. त्याविषयी काय सांगाल?
समरसतेचा आशय आहे "सर्वांशी समबुद्धीने व्यवहार करा, लहान-मोठा, उच्च-निच्च विचार करू नका.” गौतम बुद्धांनी मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा हे सूत्र सांगितले आहे. त्याला ‘ब्रह्म भाव’ म्हटले जाते. तथागथांनी तर केवळ माणसांसोबतच नाही, तर सर्व सृष्टीसोबत करुणा आणि मैत्रीचा अंगीकार करण्यास सांगितले. पतांजली सूत्रामध्येही याबाबत लिहिलेले आहे. नाथ संप्रदाय पाहा, गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ यांच्याबाबत आणि एकंदर नाथ संप्रदायाबाबत आपल्या शालेय शिक्षणात शून्य माहिती आहे. पण, आज आपण जे काही आहोत, म्हणजे हिंदू, बौद्ध, शीख, जैन वगैरे वगैरे एकंदरच जे भारतीय आहोत आणि इतरांपेक्षा चांगल्या दृष्टीने वेगळेे आहोत, त्यामध्ये महत्त्वाची भूमिका नाथ संप्रदायाची तसेच, गोरखनाथांची आहे. नाथ संप्रदायाचे मुख्य सूत्र समरसता हेच होते. त्यांनी तत्कालीन अस्तित्वात असलेल्या सगळ्या संप्रदायांमध्ये समन्वय साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सगळे संप्रदाय समरसतेने एकवटले. गोरक्षनाथ आणि दत्तात्रय यांच्याबाबतीतील एका कथेत, सामरस्य सिद्धीचा उल्लेख येतो. नाथ संप्रदायात सांगितलेली ही सामरस्य सिद्धी म्हणजेच समरसता होय. या समरसतेबद्दलचे एक उत्तम उदाहरण, त्यावेळी रा. स्व. संघाचे रणकंदन माजले होते. संघामध्येही त्याबाबत चिंतन होत होते. काहीजणांचे मत होते की जातपात दर्शवणारे काही नको. यावर सरसंघचालक बाळासाहेब देवरस म्हणाले की, "ज्यांच्यासाठी आरक्षण आहे, त्या समाजाच्या व्यक्तीच्या जागी आपण स्वतः आहोत अशी कल्पना करा. त्याजागी राहून त्यांच्या सुख-दुःखाचा विचार करा. मग तुम्ही आरक्षण हे योग्य की अयोग्य याचा निर्णय घ्या.” त्यांच्या बोलण्याने आरक्षणाला अनुकूल नसलेल्या स्वयंसेवकांनीही मत मांडले की, खरोखर शोषित-वंचित समाजाला आरक्षणाची सवलत असायला हवी. ही जी समरस विचारांची बांधणी आहे, ती आपल्या संतपरंपरा, संप्रदायांच्या सिद्धांतातूनच आली आहे.
समरसतेचा भाव समाजात जागवताना काय समस्या आल्या?
सुरुवातीला अवघड गेले. समाजाचे सोडा, संघातही काही स्वयंसेवकांचे म्हणणे होते की संघ जातीपाती मानत नाही, मग ‘समरसता मंच’ स्थापन करून, पुन्हा आपण जातीचाच विचार का करत आहोत? त्यांचे म्हणणे १०० टक्के सत्यच होते. मग सुरुवातीला स्पष्टपणे हळूवारपणे समजवावे लागले की, आपल्या समाज जीवनात विसंगती आहे. एका बाजूला आपले महान तत्त्वज्ञान आहे; मात्र त्याचबरोबर दुसरीकडे सामाजिक विषमताही आहे. जातीच्या आधारे विषमता होत असेल, तर समाजाचा भाग म्हणून आपल्याला काम करावे लागेल. मात्र, हे करताना संघाचा जो ‘जातीपातीविरहित समाज’ हा उद्देश आहे, तो उद्देश विसरायचे नाही. समाजातील सर्वच स्तरावर समरसता यावी, त्यातूनच समता प्रस्थापित व्हावी, यासाठी विशेष संकल्पना उपक्रम राबवायला सुरुवात केली. त्यानुसार आपला संबंध असलेल्या प्रत्येक संस्थेचे रूप हे समाजासारखे असावे, असा संकल्प केला. समाजात ज्याप्रमाणे विविध समाज गट आहेत, समाज म्हणून त्यांचे प्रतिनिधित्व आहे, तसेच संस्थेच्या कार्यकारी मंडळावरही असावेत. संस्थेवर सर्व एकाच जातीची लोक नसावीत अशी भूमिका मी एका बैठकीत मांडली. तेव्हा प्रमोद महाजन म्हणाले की, "कसं करावं? असे करताना कार्यकर्त्यांना जात विचारावी लागेल.” त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्यांचे म्हणणे बरोबरच होते. पण, आता सध्या परिस्थिती बदलली आहे. आता एखाद्या कृतीत सर्व समाजाचा सहभाग नसेल तर लोक विचारतात की, ते सगळे ठीक आहे पण, आमच्या समाजाला प्रतिनिधित्व आहे का? सर्व समाजाला सहभागिता मिळणे, प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे, हीच समरसता आहे आणि त्यातूनच समतेची स्थापना होते.
‘सामाजिक समरसता मंच’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारकार्याला आदर्श मानतो. ती भूमिका नेमकी काय आहे?
१९२४ साली बहिष्कृत हितकारिणी अधिवेशन झाले. या अधिवेशनामध्ये पुढच्या चळवळीचा आराखडा मांडला गेला. अस्पृश्यता दूर करण्यासाठी काय केले पाहिजे, यावर चिंतन-मंथन झाले, सूचना आल्या. यातील सर्वानुमते मान्य झालेली सूचना होती की, अस्पृश्यता दूर होण्यासाठी नावात बदल केला पाहिजे. मग नावात बदल काय करायचा, तर आडनावाऐवजी आदी द्रविड, चोखा असे नाव लावायचे. सगळ्यांचे म्हणणे ऐकून बाबासाहेब म्हणाले, "केवळ नामांतर करून जातीची भावना संपणार नाही. ते संपवण्याचे सामर्थ्य एका शब्दात आहे, तो शब्द म्हणजे ‘हिंदू.’ प्रत्येकाने आपल्या आडनावापुढे हिंदू शब्द लावावा.” बघा प्रत्येकाने आपल्या नावापुढे आडनाव म्हणून हिंदू लिहा हे सांगणारा मी नाही, तर बाबासाहेब आहेत. इतकेच काय १९२७ साली महाडचा सत्याग्रह झाला. जिथे बाबासाहेबांनी हिंदू मात्राचा, जन्मसिद्ध हक्काचा जाहीरनामा सादर केला. आपल्या संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार आहेत, तेच त्या जाहीरनाम्यामध्ये आहेत. त्यांनी भाषावार प्रांतरचनेचा पुरस्कार केला कारण, ‘विविधतेत एकता’ यावर त्यांचा विश्वास होता. म्हणून त्यांचे ‘थॉट्स ऑफ पाकिस्तान’ वाचा. ते वाचून कुणी मूर्ख, गाढव, महाढोंगी किंवा बदमाशच बाबासाहेबांना हिंदूविरोधी म्हणेल. पुस्तकामध्ये बाबासाहेब लिहतात की, "इतके सगळे मुसलमान भारतात राहिले, तर हिंदूंना राजकीय स्वातंत्र्य मिळाले असते. पण, त्यांना कायमचे मुस्लिमांच्या वर्चस्वाखाली राहावे लागले असते.” बाबासाहेबांच्या म्हणण्याचा अर्थ हे डावे लोक समजत नाहीत. बाबासाहेबांनी ‘हिंदू कोड बिल’ तयार करताना प्रचंड मेहनत घेतली. हिंदू महिला आणि एकंदर समाजाच्या उत्थानासाठीचेच ते दस्तावेज होते. मला सांगा बाबासाहेब जर हिंदूविरोधी असते, तर त्यांनी हिंदूहितासाठी काम केले असते का? बाबासाहेबांनी लिहिलेले मूळ ‘हिंदू कोड बिल’ न स्वीकारता, त्याची तोडमोड करून नेहरूंनी ते बिल स्वीकारले. ही ऐतिहासिक चूकच होती. हिंदू एक जीवन पद्धती आहे. ही जीवनपद्धती समृद्ध आणि संवर्धित करण्यामध्ये डॉ. बाबासाहेबांचे योगदान खूपच मोठे आहे.
सामाजिक समरसतेसाठी तुम्ही आयुष्यभर चिंतन, मनन, विचारकार्य आणि संघर्षही केले. त्याविषयीच्या काही आठवणी सांगाल?
उदाहरणासाठी सातार्याच्या वैचारिक संमेलनाबद्दल सांगतो. या संमेलनाचा विषय होता ‘लोकांच्या धर्मभावनेमुळे सांप्रदायिकता वाढते का?’ या संमेलनाला मला बोलावले होते. पण, व्यासपीठावर दिब्रेटो होते आणि अ. ह. साळुंखेही. अन्यही पाच-सातजण होते. पहिल्या शब्दापासून आक्रमक राहायचे, असे मी ठरवूनच गेलो होतो. मी म्हणालो, "तुम्ही मला संमेलनाला का बोलावले, हे मला माहिती आहे. मी संघाचा स्वयंसेवक आहे. संघाचा महानगर कार्यवाह. सध्या हिंदूंचे रामजन्मभूमी आंदेलन सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला असे म्हणायचे आहे की, यामुळे सांप्रदायिकता वाढते? पण, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, हिंदू नावाचा धर्म भारतात अस्तित्वात नाही. तुमच्या म्हणण्यानुसार ज्याला धर्म म्हणतात, त्या धर्मासाठी एक प्रेषित धर्मग्रंथ असावा लागतो. धर्माची आचरणपद्धती एकसारखी असावी लागते. पण, या न्यायाने हिंदू कुणाला म्हणायचे हाच प्रश्न आहे. इथे देवाला मानणारे आहेत आणि देवाला न मानणारेही आहेत. संकष्टी चतुर्थी पाळणारेही आहेत, त्याचदिवशी तंदुरी चिकन खाणारेही आहेत. त्यामुळे हिंदू म्हणून असा धर्मच अस्तित्वात नाही. मग जो धर्म अस्तित्वात नाही, त्याने सांप्रदायिकता कशी वाढते? खरे तर तुमच्यासारख्या लोकांमुळेच सांप्रदायिकता वाढते. तुम्हाला एक मनू सापडला आहे आणि तो तुम्ही आमच्या डोक्यावर लादला आहे. जे जे काही वाईट आहे ते मनुवादी. जसे जातीयता, विषमता हे हिंदुत्व. मात्र, जे चांगले आहे, जसे की योग किंवा आयुर्वेद हे मात्र हिंदू नाही, तर हे जागतिक आहे. असे कसे? ही ढोंगबाजी आहे आणि या ढोंगबाजीमध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात.” हे सगळे ऐकून, व्यासपीठावरचे ते सगळे अस्वस्थ झाले. व्यासपीठाचे संकेत झुगारून अ. ह. साळुंखे मध्येच उभे राहिले आणि म्हणाले, "मी मनुविषयी पतंगेला डिबेटचे आवाहन देतो.” मी लगेच म्हणालो की, "मनुसंदर्भातला वादविवाद मनुचे समर्थन करण्याने करावा, आमचा मनुशी सुतराम संबंध नाही. आम्ही १९२५ सालीच मनु नाकारला. संघ स्थापनेचा उद्देशच समग्र हिंदूंचे संघटन करणे आहे. या समग्र हिंदूंमध्ये आदिवासी आले आणि भटके-विमुक्त मागासवर्गीय सगळे सगळे आले. तुम्ही शब्दाने मनु नाकारता, आम्ही कृतीने मनुला नाकारले आहे आणि नाकारतो.” माझे बोलणे संपल्यानांतर एक कम्युनिस्ट माझ्याजवळ येऊन हळूच म्हणाला, "अहो पतंगे, तुम्ही जाहीरपणे मनु नाकारला. उद्या नागपूरमधून आदेश येईल आणि तुमचे ‘विवेक’चे संपादकपद जाईल. पण, मला संघ स्वयंसेवक म्हणून रा. स्व. संघाची समरस समतेची भूमिका माहिती होती. त्यातूनच पुढे ‘मी मनु आणि संघ’ हा लेख दिवाळी अंकात लिहिला. त्यावेळी रंगा हरी, दामुअण्णा दाते यांचे मोठे बंधु त्यांनी लेख वाचला. ते म्हणाले, "रमेशजी लेख पढा| बहुत आनंद आया| ऐसे लेख से स्वयंसेवक का मनोबल बढता हैं| ऐसे लेख का पुस्तक बनाईऐ|”
‘संघाच्या शताब्दी वर्षात समरसतेचे महत्त्व’ याबाबत आताच्या कालखंडात कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा आहेत?
अपेक्षा नाही, दोन कृतींची आवश्यकता आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा या विषयाचा प्रवक्ता झाला पाहिजे, त्याने समरसतेबद्दल बोलले पाहिजे. मौन धारण करून जमणार नाही. आपापल्या पद्धतीने उत्तर द्यायला शिकले पाहिजे. प्रत्युत्तर द्यायचे असेल, तर वाचन करावे लागेल, जे वाचले आहे त्याचे चिंतन-मनन करावे लागेल. हे केले नाही, तर प्रत्युतर देता येत नाही. आपल्याला बौद्धिक सापळ्यांमध्ये अडकवायचे प्रयत्न होतात, पण आपण अडकू नये. मला एकाने प्रश्न विचारला, "संघचालक दलित नहीं हो सकता हैं क्या? कौन नहीं हो सकता, मैं प्रश्न करता हूं| आपने तो संघ के लिए दरवाजे बंद करके रखा हैं| पहिले आइये|” अशा नाजूक जागा हेरून विचार केला पाहिजे. दिवस-रात्र आम्हा युद्धाचा प्रसंग या उक्तीप्रमाणे, पावलोपावली तुम्हाला संघर्ष करावा लागेल. तयारी नसेल, तर नाही होणार ते म्हणून तयारी आधी केली पाहिजे. समरसता हा जितका बौद्धिक दृष्टीने मांडण्याचा विषय आहे, त्याहून अधिक जगण्याचा विषय आहे. सर्व समाजानेच हा विषय जगला पाहिजे. यामध्ये एकमेकांच्या भावभावनांचा आदर करणे, सन्मान करणे आले. गणपतीची पूजा, मी गणपती बसवत नाही ठीक आहे. पण, त्यांनी मला बोलावले, तर मूर्ती, माणूस की विषय महत्त्वाचा? हे ठरवले पाहिजे. सरसंघचालक बाळासाहेब देवरस हे अतिशय बुद्धिवादी होते. त्यांना कर्मकांड पटत नसे. पण ते एकदा आजारी पडले असता, एका कार्यकर्त्याने त्यांना आराम पडावा म्हणून घरामध्ये पूजायज्ञ केला. त्या पूजेला बाळासाहेब देवरस हजर होते. त्या पूजेचा नियम होता असा होता की, पूजा पूर्ण झाल्यानंतरच जेवायचे. अरे तुझा तर यावर विश्वास नाही, मग कशासाठी? अरे माझा विश्वास नाही, पण त्याची श्रद्धा आहे. त्याची श्रद्धा दुखावण्याचा मला काय अधिकार? ही झाली समरसता. आपल्या समाजात विविध प्रथा-परंपरा आहेत, त्यामुळे आपण कुणावर मत लादू नये, फारफार तर सूचना करू शकतो.
श्रोत्यांचे प्रश्न आणि रमेश पतंगे यांची उत्तरे
सुहास पोतदार : बाबासाहेबांचे विचार समजून घेण्यासाठी कोणती पुस्तकं वाचावीत? तसेच, बाबासाहेबांनी भाषावार प्रांतरचनेचे समर्थन का केले?
बाबासाहेब जर खर्या अर्थाने समजून घ्यायचे, तर त्यांच्यावर इतरांनी म्हणजे मुख्यतः विदेशी लोकांनी लिहिलेली पुस्तक वाचण्यापेक्षा, प्रत्यक्ष बाबासाहेबांनी लिहिलेले साहित्य वाचा. त्यांचे साहित्य शासनाने प्रसिद्ध केले आहे. दुसर्या लेखकांची पुस्तके वाचायची असतील, तर चांगदेव खैरमोडे यांचे संच आहेत बाबासाहेबांच्या जीवनावर. धनंजय किर यांनी बाबासाहेबांवर लिहिलेले पुस्तकही उत्तम आहे. त्यांच्या पुस्तकावरपण काहीजण प्रश्न उपस्थित करतात. का? तर त्यांचे आडनाव किर आहे. हीच विकृती आहे. तसेच, समरसतेचा विचार घेऊनही बाबासाहेबांवर अनेक पुस्तके लिहली गेली आहेत, तीही वाचावी. तुमचा दुसरा प्रश्न होता की, बाबासाहेबांनी भाषावार प्रांतरचनेचे समर्थन का केले? तर एक राज्य-एक भाषा असेल, तर राज्य आणि देश नीट चालेल. विविध भाषा असणारे दोन-तीन प्रांत एकत्र जोडून,एक राज्य निर्माण झाले तर गोंधळ होतो. संयुक्त महाराष्ट्र याचे उत्तम उदाहरण आहे. एक भाषिक लोक एका राज्यात आले, तर तो संघर्ष टळेल.
शरद कांबळे : सामाजिक न्यायाची प्रतीक्षा करताना, ‘एक गाव, एक पाणवठा, एक स्मशान’साठी संघर्ष करावा लागतो, ही लढाई किती वर्षे लढावी लागेल?
ही लढाई लढण्यासाठी किती कार्यकर्ते निर्माण करण्याची क्षमता सध्या आपल्या सर्वांमध्ये आहे, हेच याचे उत्तर आहे. ही एका लढाई माणसाची नाही, तर सर्व समाजाची आहे. त्यासाठी समाजाची ताकद हवी. ही ताकद जेवढ्या लवकर निर्माण होईल, तेवढ्या लवकर प्रश्न संपेल.
आकाश जगताप : समाजात नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाने समता आणण्यासाठी प्रयत्न केले. समाज त्या विचारांच्या सकारात्मकेने का वागत नाही?
नाथ संप्रदायाने सर्व प्रकारच्या विषमतेचा धिक्कार केला. सर्वच संतांनीही विषमतेला विरोध केला. पण, समाजात एक विकृती आहे की जो कोणी मानवतेचा उपदेश करेल त्याला देव बनवायचे. पण, त्या महामानवाच्या विचारांचे आचारण शून्य करायचे. त्यांच्यासारखे आचरण का करता येणार नाही, तर उत्तर देतात की, ते देव आहेत, आपण कसे त्यांच्यासारखे होणार? त्यामुळेच समाजात तत्त्वज्ञान जगणारे जिवंत आदर्श निर्माण व्हायला हवेत. त्या आदर्शानेच समाजात सकारात्मक बदल घडेल. याचा गांभीर्याने विचार प. पू. हेडगेवारांनी केला. आपले उदात्त तत्त्वज्ञान जगणारे लोकं घडवली पाहिजेत. ते जिवंत आदर्श पाहूनच समाजात परिवर्तन होईल. तसेच, किमान आपल्या समरस विचारांचे दहाजण तरी तयार केले पाहिजेत.
नितीन मोरे : बुद्ध हा विष्णुचा नववा अवतार आहे, असे बोलणारी मंडळी आहेत. मग असे आहे, तर त्यांच्या घरी बुद्ध का दिसत नाही? मंडळीकडे बुद्ध का दिसत नाही. ‘महाबोधी विहार’ हे बुद्धांना द्यावे, याबाबत कुणी भाष्य का करत नाही?
भारतात कुठेही गेलात, तरी सर्व संघ कार्यालयात तुम्हाला बाबासाहेबांची प्रतिमा लावलेली दिसेल. बुद्धांना कुणाचाही विरोध असणे शक्यच नाही, आक्षेपही नाही. बुद्ध पौर्णिमा किंवा बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी, संघातर्फे अनेक शेकडो उपक्रम राबवले जातात. समरसतेचे काम म्हणजेच काय, तर भगवान बुद्धांच्या विचारांच्या प्रसाराचे काम वेगळ्या भाषेत करणे. तसेच, बोधगयेचा विषय न्यायालयीन विषय आहे. सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो निर्णय संपूर्ण देश स्वीकारेल.
अखिलेश गुप्ता : संघाच्या माध्यमातून आम्ही वस्तीपातळीवर संपर्क सेवा करत असतो. मात्र, वस्तीपातळीवर समाजाला एकत्रित करण्यासाठी काय करता येईल?
तुम्ही जे काम करता, त्याची गती आणि वेग वाढवा. वस्ती पातळीवर अनेक समस्या आहेत, त्या समजून घ्या. त्या काही खूप मोठ्या नसतात पण, त्या सोडवण्यासाठी दिशा-मार्गदर्शन त्यांना नसते. आपण या समस्या सोडवण्यासाठी मदत करायला पुढे होणे आवश्यक आहे. लोकांच्या जगण्याच्या विषयात आपण त्यांना जेवढी मदत करू, तेवढे त्यांच्याशी संबंध निर्माण करू शकू. तत्त्वज्ञान वगैरे ठीक आहे. पण, लोकांना प्रत्यक्षात मदत करणे गरजेचे आहे. भुकेल्याला अन्न, आजारी व्यक्तीला औषध, गरजू विद्यार्थ्याला शैक्षणिक मदत करणे, हे जगण्याचे विषय लक्षात घेणे आवश्यक आहे. हे समाजाच्या समरसतेचे काम आहे.
योजना ठोकळे : आजही दलितांवरचे अत्याचार थांबत नाहीत, असे का?
अत्याचाराचे निराकरण दोन मार्ग आहेत, एक आहे कायदेशीर मार्ग. सामाजिक संदर्भात अत्याचार झाला, तर त्याची नोंद घेऊन त्यासंदर्भात त्वरित कायदेशीर कारवाई उभी करून, न्याय मिळवून देणारी चळवळ उभी राहिली पाहिजे. हे अत्याचार थांबण्यासाठी दुसरा मार्ग आहे मानसिक तयारीचा. अत्याचार न सहन करण्याची मानसिक तयारी. ते म्हणतात ना, ‘लाथो के भूत बातो से नहीं मानते|’ अत्याचार्याला विरोध करण्याची मानसिकता हवी. कुत्रं अंगावर आला आणि त्याच्या पाया पडलो, तर तो थांबतो का? त्याच्यावर उगारल्याशिवाय पर्याय नाही.
अशोक कांबळे : रा. स्व. संघाचे शताब्दी वर्ष आहे. या वर्षात समरसतेसाठी काय विशेष प्रयत्न सुरू आहेत?
शताब्दी वर्षात निश्चित प्रयत्न सुरू आहेत, उदंड काम सुरू आहे. विविध सामाजिक प्रकल्प सुरू आहेत. समरसतेच्या भावनेने कार्य करण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज उभी राहत आहे. देशभरात लक्षावधी उपक्रम सुरू आहेत. समरसता जगण्याचा विषय आहे, त्यातून सर्व समाजाच्या समरस समाजाची निर्मिती होत आहे.
शब्दांकन : योगिता साळवी