‌‘ऑपरेशन सिंदूर‌’ची ध्येयपूर्ती आणि भारताची यशस्वी शस्त्रसंधी...

    12-Oct-2025   
Total Views |

‌‘ऑपरेशन सिंदूर‌’च्यावेळी भारतीय सैन्याच्या भीमपराक्रमामुळे संपूर्ण देशाच्या अंगातच वीरश्रीचा संचार झाला होता. पाकिस्तानचा प्रश्न एकदाच निकाली काढावा, अशी जवळपास प्रत्येक भारतीयाची सुप्त इच्छा होती. मात्र, भावनेच्या आहारी जाऊन युद्ध लढता येत नाहीत. त्यामुळेच एका विशिष्ट ध्येयाची निश्चिती करून ते ध्येय पूर्ण करण्यासाठी भारतीय लष्कराने यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर अत्यंत हुशारीने पाकिस्तानच्या शस्त्रसंधीच्या विनवणीचा स्वीकार करत देशाच्या संभाव्य नुकसानालाही टाळले. भारतीय राजकीय आणि लष्करी नेतृत्वाने एकाच वेळी शक्ती आणि बुद्धीचे दाखवलेले उदाहरण जगात चर्चेचा विषय ठरले. भारतीय सैन्याच्या या भीमपराक्रमाचा आणि त्यातून साध्य केलेल्या ध्येयाचा घेतलेला आढावा...

भारतीय वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी दि. 4 ऑक्टोबर रोजी ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’बाबत माहिती देत, पाकिस्तानच्या नुकसानाचे तपशील जगासमोर उघड केले. या कारवाईत भारताने पाकिस्तानच्या हवाई तळांवर आणि लष्करी ठिकाणांवर अचूक हल्ले केले. त्यामुळे पाकिस्तानी रडार, कमांड सेंटर्स, धावपट्ट्या आणि हॅन्गर यांना मोठेच नुकसान झाले. एका ‌‘सी-130‌’ वर्गातील विमानासह अनेक लढाऊ विमानांचा फटका पाकिस्तानला बसला. एक ‌‘एसएएम‌’ प्रणालीही नष्ट करण्यात आली. तसेच, लॉन्ग-रेंज ‌‘एसएएम‌’ प्रणालीच्या साहाय्याने 300 किमी अंतरावरील लक्ष्यही भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले.

‌‘ऑपरेशन सिंदूर‌’ : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला, भारतावरील ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे हल्ले याला प्रत्युत्तर म्हणून भारताने दि. 10 मे रोजी पाकिस्तानातील अनेक हवाई तळ आणि रडार केंद्रांवर योजनाबद्ध पद्धतीने निर्णायक हल्ले केले. रफिकी, मुरिद, चाकाला, पाकिस्तान एअरफोर्स बेस यांसारख्या लष्करी ठिकाणांवर भारतीय लढाऊ विमानांमधून अचूक प्रहार करण्यात आला. ही कारवाई जमिनीवर आणि हवाई अशा दोन्ही आघाड्यांवर पार पडली. स्वदेशी बनावटीच्या ‌‘आकाश‌’ या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या प्रणालीसह ‌‘व्हेंचुरा‌’ आणि ‌‘ओसा‌’ यांसारख्या मंचांचाही परिणामकारक वापर या कारवाईवेळी खुबीने करण्यात आला. भारतीय सेनेने खांद्यावरून डागता येणाऱ्या वहनक्षम हवाई संरक्षण प्रणालींपासून ते दीर्घ पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारक क्षेपणास्त्रांपर्यंत विविध प्रकारच्या उपकरणांचा वापर या कारवाईत केला.

पाकिस्तानच्या हवाई तळांचे झालेले नुकसान

भारताने पाकिस्तानच्या अनेक हवाई तळांना लक्ष्य केले.

या हल्ल्यात किमान चार ठिकाणचे रडार, दोन ठिकाणचे कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर्स उद्ध्वस्त झाले.

दोन धावपट्ट्या क्षतीग्रस्त झाल्या. तीन वेगवेगळ्या ठिकाणांवरील हॅन्गरचेही मोठे नुकसान झाले.

विमान आणि हवाई संरक्षण व्यवस्थेवर परिणाम

किमान चार ते पाच लढाऊ विमानांचे नुकसान झाले. यामध्ये बहुतांश विमाने ही ‌‘एफ-16‌’ या प्रकारातील होती.

एक मोठे ‌‘सी-130‌’ वर्गातील वाहतूक नजर ठेवणारे विमान नष्ट झाले.
एक ‌‘एसएएम‌’ प्रणाली उद्ध्वस्त झाली.

भारतीय वायुसेनेने 300 किमी अंतरावरील लक्ष्याचाही अचूकपणे वेध घेतला.

दीर्घ पल्ल्याच्या ‌‘एसएएम‌’ प्रणालीची भूमिका
पत्रकार परिषदेदरम्यान एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी सांगितले की, “आम्ही अलीकडेच कार्यान्वित केलेल्या लॉन्ग-रेंज ‌‘एसएएम‌’ प्रणालींनी पाकिस्तानमध्ये आतपर्यंत जात लक्ष्य साध्य केले. यामुळेच पाकिस्तानला स्वतःच्या हद्दीतसुद्धा ठराविक अंतरापर्यंत उड्डाणे करता आली नाहीत. हा इतिहासातील सर्वांत लांबचा मारक प्रहार आहे, ज्यामध्ये 300 किमीपेक्षा जास्त अंतरावरचे लक्ष्य भेदले गेले.

‌‘ऑपरेशन सिंदूर‌’ची सुरुवात
दि. 7 मे रोजी भारताने पाकिस्तानातील दहशतवादी छावण्या व पायाभूत सुविधांना लक्ष्य केले. यामध्ये नऊ महत्त्वाच्या ठिकाणी क्षेपणास्त्र व ड्रोनच्या साहाय्याने हल्ले करण्यात आले. ‌‘राफेल‌’ जेटमधून ‌‘स्काल्प‌’ क्षेपणास्त्रे आणि ‌‘एएएसएम‌’ हॅमर बॉम्ब तसेच ‌‘ब्रह्मोस‌’ क्रूझ क्षेपणास्त्रांचाही वापर करण्यात आला. पीओकेमधील छावण्यांवर भारतीय सैन्याने स्काय स्ट्रायकर ड्रोन व एक्सकॅलिबर राऊंड्सचा वापर केला.

पाकिस्तानची प्रतिकारात्मक कारवाई
दि. 8 मे रोजी पाकिस्तानने भारताच्या या कारवाईविरोधात प्रतीकात्मक कारवाई करण्यात सुरुवात केली. पाकिस्तानकडून जम्मूतील पूंछ व राजौरी भागात मोर्टार व तोफांचा मारा करण्यात आला. या हल्ल्यामध्ये काही नागरिकांचा मृत्यू झाला. अमृतसर व आदमपूर येथे पाकिस्तानकडून क्षेपणास्त्रे व ड्रोन्स हल्ले झाले. या हल्ल्यांना भारताच्या ‌‘एस-400‌’ संरक्षण प्रणालीने निकामी केले. त्यामुळे पाकिस्तानने 900 हून अधिक ड्रोन्सच्या साहाय्याने भारतावर हल्ल्या केला.

पाकिस्तानचे हे ड्रोन हल्ले 40 वेगवेगळ्या ठिकाणांहून, जवळपास तीन हजार फूट उंचीवरून करण्यात आले. या कारवाईमध्ये भारताचे हवाई तळ, सैनिकी छावण्या, पठाणकोट, जम्मू, जालंधर, अमृतसर, हलवारा, भटिंडा आणि जैसलमेर या भागांना प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आले. मात्र, भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीने (एस-400, बाराक-8, आकाश, डीआरडीओचे ॲण्टी-ड्रोन सिस्टम्स) आणि जलद प्रतिसाद देणाऱ्या शस्त्रांनी पाकिस्तानचा हा प्रयत्नही निष्फळ ठरवला. पाकिस्तानने नियंत्रण रेषेपासून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत, जवळपास 26 ते 36 ठिकाणी केलेले कमिकाझे ड्रोन, क्षेपणास्त्र आणि तोफगोळ्यांचे हल्ले भारतीय सैन्याने यशस्वीपणे परतवले.

एक बहुस्तरीय संरक्षण कवचाची उभारणी...
पाकिस्तानी लष्कराच्या अविवेकी आक्रमणाला प्रत्युत्तर देताना भारतीय वायुरक्षण दलाने आणि भारतीय हवाई दलाने, एक बहुस्तरीय सुरक्षा कवचाची उभारणी केली. यामुळे शत्रूंच्या क्षेपणास्त्रांना वेळीच नाकाम करण्यात येऊन संभाव्य नुकसान टाळण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना यश आले.

या बहुस्तरीय सुरक्षा कवचामध्ये ‌‘एल-70‌’ व ‌‘झु-23‌’ मिमी तोफ प्रणाली, आखूड पल्ल्याची भूदल ते आकाश मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली, ‌‘ओएस्के‌’, ‌‘एके‌’सारखी तत्काळ प्रतिसाद देणारी प्रणाली तसेच सुधारित स्वयंचलित नियंत्रण व अहवाल प्रणालीचा समावेश होता. ड्रोन शोध आणि अडथळा प्रणाली, ‌‘एमआरएसएएम‌’ (मध्यम पल्ल्याची भूदल ते आकाश क्षेपणास्त्र प्रणाली) यासोबतच लष्कर व हवाई दलाने संयुक्तपणे यामध्ये भूमिका निभावली. या मोहिमेचे यश लक्षणीयच ठरले. दि. 7 मे ते दि. 10 मे रोजी दरम्यान तुर्की बनावटीच्या ड्रोनसह पाकिस्तानचे सुमारे 900 पेक्षा अधिक ड्रोन्स नष्ट करण्यात आले. युद्धबंदी जाहीर होण्यापूव बहुतेक कारवाया भारतीय वायुरक्षणातल्या तोफ प्रणालींनी पार पाडल्या. या तोफांची कामगिरी उल्लेखनीय अशीच होती. रडार नियंत्रणाखालील ‌‘एल-70‌’ तोफा, ‌‘झु-23‌’ मिमी तोफा विथ नाईट साईट्स, तसेच सुधारित ‌‘शिल्का तोफ प्रणाली‌’ यांचा यात समावेश होता. यामधून भारतीय आकाश हे अभेद्य असून घुसखोरी शक्य नसल्याच स्पष्ट संदेश देण्यात आला.

पाकिस्तानातील हानी : 138 पाकिस्तानी सैनिक मृत्युमुखी किंवा ठार
‌‘ऑपरेशन सिंदूर‌’ दि. 10 मे रोजी संपल्यापासून पाकिस्तान आपले मृत आणि जखमी लपवण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु, दि. 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी शौर्यपदक विजेत्यांची यादी जाहीर केली. ही यादी प्रत्यक्षात भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिशोधात केलेल्या विध्वंसक कारवाईची आठवणच ठरली. पाकिस्तानी टीव्ही वाहिनी ‌‘समाआ‌’ने मृत्युपश्चात सन्मानित करण्यात आलेल्या 138 पाकिस्तानी सैनिकांची नावे जाहीर केली. या सर्वांच्या नावांपुढे ‌‘शहीद‌’ असा उल्लेख करण्यात आला होता. या मृतांची यादी हेच पाकिस्तानच्या नुकसानीचे खरे प्रमाण दाखवणारी ठरली.

भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेवर केलेल्या आक्रमक कारवाईमुळे पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागेल. काही भागांत पाकिस्तानी सैनिक नियंत्रण रेषा सोडून पळूनही गेले. विशेष म्हणजे, पाकिस्तानी सैन्यप्रमुख जनरल मुनीर यांच्या पत्नीने पाकिस्तानमध्ये न राहता इंग्लंडमध्ये आश्रय घेतला.

अन्‌‍ पाकिस्तानी शस्त्रसंधीचा पवित्रा...
दुपारी साडेतीन वाजता पाकिस्तानी लष्कराच्या लष्करी कारवाई विभागाच्या महासंचालकांनी (डीजीएमओ) भारताच्या ‌‘डीजीएमओं‌’ना फोन करून शस्त्रसंधीची तयारी दर्शवली. ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’मध्ये ‌‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ‌’ (सीडीएस) जनरल अनिल चौहान, ‌‘चीफ ऑफ आम स्टाफ‌’ जनरल उपेंद्र दिवेदी यांचा महत्त्वपूर्ण आणि निर्णायक वाटा होता. त्यांनी या ऑपरेशनची योजना, रणनीती आणि अंमलबजावणीचे नेतृत्व केले.

भारताचा शस्त्रसंधीचा निर्णय योग्य होता का?
आपण शस्त्रसंधी करण्यापूव पाकिस्तानला पुरेसा धडा शिकवलेला नाही, असे काहींचे आजही मत आहे. भारतीय सैन्यादलात कोणतेही युद्ध सुरू करण्यापूव एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की, या युद्धाचे ध्येय नेमके काय आहे? यातून भारतीय सेनेला नेमके काय साध्य करायचे आहे? कोणत्याही युद्धाचे नियोजन करताना संघर्ष समाप्ती म्हणजेच, नेमके युद्ध केव्हा थांबवायचे हा एक निर्णय महत्त्वाचा असतो.

‌‘ऑपरेशन सिंदूर‌’मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी त्यांचे तळ उद्ध्वस्त करून त्यांचे मोठे नुकसान करणे हेच आपले उद्दिष्ट होते आणि हे उद्दिष्ट आपण ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’च्या कारवाईत साध्यही केले. म्हणजेच, आपण ठरवलेले ध्येय पूर्ण झाले होते. पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान करणे किंवा पाकिस्तानसोबत ‌‘ऑल आऊट वॉर‌’ लढणे, हे आपले ध्येय नव्हतेच.

याव्यतिरिक्त, भारताने केलेल्या हल्ल्यात नूरखान हवाई तळावर असलेल्या पाकिस्तानी अणुबॉम्बच्या साठ्याचे नुकसान झाले. त्यामुळे तेथून अणुकिरणोत्सर्गाची गळती सुरू झाली. हे तपासण्यासाठी एका तज्ज्ञ पथकाने तिथे जाऊन पाहणी करणे तातडीचे होते. यानंतर लगेचच संयुक्त राष्ट्राच्या ‌‘आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थे‌’ने नूरखान हवाई तळाची पाहणी करून किरणोत्सर्गाची गळती थांबवली. खरं तर चीनला वाटत होते की, भारत-पाकिस्तान युद्ध खूप दिवस चालेल आणि जसे रशिया-युक्रेन युद्धात अडकला, तसेच भारतही या युद्धात फसेल. त्यामुळे साहजिकच भारताच्या आर्थिक प्रगतीचा वेग मंदावेल. पण, भारताने यशस्वी माघार घेत, चीनचे हे मनसुबेही धुळीस मिळवले. अशाप्रकारे, ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’च्या संघर्ष समाप्तीसाठी योग्य वेळी अचूक निर्णय घेतल्याबद्दल आपण आपल्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाचे कौतुक करायलाच हवे. कारण, आपण आपले उद्दिष्ट साधले, पण दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धात अडकून आपली आर्थिक प्रगती थांबवली नाही.

- हेमंत महाजन

हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.