मुंबई : आजचा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजात साक्षरता आणि समता निर्माण होऊ शकते. तंत्रज्ञान, डिजिटायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या साधनांना भौगोलिक सीमा नाहीत त्यामुळे श्रीमंत-गरीब, जाती, भाषा यांचा फरक कळत नाही. हे तंत्रज्ञान प्रत्येक भारतीयांच्या कल्पनांना आकार देऊ शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बांद्रा येथील मेहबुब स्टुडिओमध्ये एचपी आणि इंटेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एचपी ड्रीम अनलॉक्ड’ या उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी एचपी इंडिया व्यवस्थापकीय संचालिका इप्सिता दासगुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे, विपणन प्रमुख आकाश भाटिया, कायदेशीर आणि शासकीय व्यवहार विभाग प्रमुख राजू नायर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “शासनाने आता एआय स्वीकारण्याचे धोरण सुरू केले असून हे तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले आहे. यात प्रत्येक जण आपल्या कल्पनांना वास्तवात आणू शकणार आहे. शासनाने एचपी सोबत डिजिटल मीडिया सेंटर ऑफ एक्सलन्स उभारले असून आता आणखी पुढे जाऊन सर्वसामान्यांना नव्या तंत्रज्ञानांचा, विशेषतः एआयचा सहज प्रवेश मिळावा यासाठी भागीदारीचा आराखडा तयार करण्याचे ठरवले आहे. कृषीक्षेत्रातही एआयचा वापर सुरू केला आहे. पुण्यात झालेल्या अॅग्री-हॅकथॉनमध्ये तरुणांनी तयार केलेले एआयमॉडेल हे हवेतील घटकांचे विश्लेषण करून पिकावर होणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आणि सर्तक करते. हे खरोखरच गेम-चेंजर मॉडेल आहे.”
एआय तंत्रज्ञानाने शासन प्रणालीत पारदर्शकता वाढवली
“अशा तांत्रिक हस्तक्षेपांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळेल, खर्च कमी होईल आणि कृषीक्षेत्रात अधिक नफा मिळेल. एआय, ब्लॉकचेन आणि डिजिटायझेशन या तंत्रज्ञानांनी केवळ उद्योगच नव्हे तर शासन प्रणालीतही पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवली आहे. या कार्यक्रमात देशभरातील जवळपास ४० हजार तरुणांनी सहभाग घेतला असून त्यापैकी ४० सर्वोत्तम नवीन कल्पक उपक्रमांचा सन्मान करण्यात आला. हे ४० नवीन उपक्रम समाजात आणि अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष परिणाम करू शकतील. या उपक्रमांच्या माध्यमातून नागरीकांचे जीवनमान उंचवण्यासाठी शासन भागीदारी करण्यास तयार आहे,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....