पूरग्रस्त बळीराजासाठी कल्याणकरांचा मदतीचा ताफा रवाना; जीवनावश्यक वस्तू -अन्नधान्य आणि औषधांचा समावेश

    11-Oct-2025   
Total Views |

कल्याण : महाराष्ट्राच्या सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत मुसळधार पावसाने अनेक गावं जलमय झाली. हजारो एकर शेती पाण्याखाली गेली असून जनावरे, धान्य, घरं आणि संसाराची साधनं वाहून गेल्याने ग्रामीण भागातील बळीराजा आणखीनच संकटात सापडला आहे.

या भीषण परिस्थितीत पूरग्रस्त बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी कल्याणकर एकदिलाने पुढे आले आहेत. शुक्रवारी रात्री कल्याण शहरातून पूरग्रस्त भागांसाठी जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे आणि औषधं घेऊन ताफा सोलापूर- धाराशिवकडे रवाना झाला. कल्याण पश्चिमेतील बेतुरकर पाडा विभाग मित्र परिवाराच्या पुढाकारातून ही मदत रवाना करण्यात आली.

एकीकडे दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पुरामुळे मात्र शेतकऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण करण्यासह त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी बेतुरकर पाडा विभाग मित्र परिवारातर्फे जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचे आवाहन करण्यात आले होते. ज्याला कल्याणातील सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि दानशूर व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाच्या संसारासाठी ही मदत पोहोचवून कल्याणकरांनी पुन्हा एकदा माणुसकीचं सुंदर उदाहरण घालून दिलं आहे. अनेक ग्रामीण भागांत पुरामुळे शाळा, रस्ते आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिस्थितीत नागरी भागातून येणारी ही मदत शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा देणारी ठरत आहे.

या मदत मोहिमेत शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. विशेष सहकार्य करणाऱ्यांमध्ये नरेंद्र पवार, माजी नगरसेवक संदीप गायकर आणि त्यांचे सहकारी यांच्यासह राजेश ठाणगे, अक्षय वाघ, दिनेश अभंग, भाऊ धुमाळ, अमित आहेर, अमेय आमले, शुभम अभंग, अक्षय देशमुख, कपिल देसले, बसवराज कोळी, कुणाल जगताप, अजित म्हस्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिंहाचा वाटा उचलला.

या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत असून, “कल्याणकरांची ही मदत म्हणजे पूरग्रस्तांच्या जीवनातील अंधकार दूर करणारी आहे. पुरामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाची दिवाळी गोड करण्यासाठी बेतुरकर पाडा मित्र मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी घेतलेला हा पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे अशा शब्दांत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार , प्रिया शर्मा , भाऊ धुमाळ, सोमनाथ अभंग, कपिल देसले, दीपक देसले आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.