२६/११ च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला का केला नाही, पी चिंदमबरम यांनी कोणता गौप्यस्फोट केला?

    01-Oct-2025   
Total Views |

नवी दिल्ली : (P. Chidambaram) मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तत्कालीन यूपीए सरकारने मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा विचार केला होता, परंतु आंतरराष्ट्रीय दबाव आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या भूमिकेनंतर सरकारने लष्करी कारवाई न करण्याचा निर्णय घेतला असं पी.चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले चिदंबरम?

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पी. चिदंबरम २६/११ च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला का केला नाही, पी चिंदमबरम यांनी कोणता गौप्यस्फोट केला?म्हणाले की, "मुंबईतील हल्ल्यानंतर काही दिवसांतच मी केंद्रीय गृहमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता. या हल्ल्यात १७५ हून अधिक लोकांचा जीव गेला होता. जगातील अनेक देशांतील अधिकाऱ्यांनी दिल्ली गाठत युद्ध सुरू करू नका, असे म्हटले होते. त्यावेळी कोंडोलीजा राइस ज्या तत्कालीन अमेरिकन परराष्ट्र मंत्री होत्या, त्यांनी माझी आणि पंतप्रधानांची भेट घेतली आणि प्रत्युत्तर देऊ नका, असं सांगितले. मात्र हा निर्णय सरकार घेईल असे मी तेव्हा म्हटले. आपल्याला बदला घ्यायला हवा असा विचार माझ्या मनात होता. त्यानंतर पुढे पंतप्रधान आणि इतर लोकांशीही संभाव्य कारवाईबाबत चर्चा केली होती. त्यानंतर जो निर्णय झाला त्यावर परराष्ट्र मंत्रालय आणि जागतिक संघटनांचा प्रभाव दिसून येत होता", असे त्यांनी म्हटले.

भाजपकडून काँग्रेसवर हल्लाबोल

दरम्यान, पी. चिदंबरम यांच्या विधानानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. मुंबई हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय दबावामुळे चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले गेले हे देशातील जनता जाणते, आता माजी गृहमंत्र्यांनी १७ वर्षांनी त्याचा स्वीकार केला असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे. तर चिदंबरम मुंबई हल्ल्यानंतर गृहमंत्रिपद सांभाळण्यासाठी तयार नव्हते. त्यांना पाकिस्तानविरोधात सैन्य कारवाई करायची होती, परंतु त्यांच्यावर दबाव होता, असे भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी आरोप केला.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\