'सन्मान सौदामिनीं'चा ; महावितरणमध्ये महिला सन्मान सोहळा; महावितरणमधील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

Total Views |

मुंबई : वीजसेवेसारख्या धकाधकीच्या, जोखमीच्या तांत्रिक क्षेत्रामध्ये महावितरणमध्ये कार्यरत महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगदान व क्षमता सिद्ध केली आहे. ही महिला शक्ती खऱ्या अर्थाने आदिशक्तीचे रूप आहे असे गौरवोद्गार महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी काढले.

नवरात्र उत्सवानिमित्त महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयामध्ये कार्यरत महिला अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ 'सन्मान सौदामिनींचा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक पवार बोलत होते. व्यासपीठावर कार्यकारी संचालक अपर्णा गिते (सुरक्षा व अंमलबजावणी) व स्वाती व्यवहारे (वित्त) यांची उपस्थिती होती.

संचालक पवार म्हणाले, एकेकाळी पुरुषांचे क्षेत्र समजल्या जाणाऱ्या वीज क्षेत्रात स्वकर्तृत्वाने भरारी घेणाऱ्या महिला शक्तीचे अस्तित्व खऱ्या अर्थाने प्रकाशमान झाले आहे. महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रभावीपणे व आत्मविश्वासाने महावितरणच्या प्रगतीला हातभार लावला आहे. या महिला शक्तीच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी नवरात्रीनिमित्त राज्यभरात ‘सन्मान सौदामिनींचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

कार्यकारी संचालक (वित्त) स्वाती व्यवहारे यांनी सन्मान सौदामिनींच्या आयोजनाचे स्वागत केले. महिलांनी स्वतःसाठी वेळ काढून तब्येतीची जाणीवपूर्वक काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांनी सांगितले, की परिस्थिती अनुकूल नसतानाही महिलांनी धडपड करणे, प्रसंगी दुर्गा होणे आवश्यक आहे. विधवा, परित्यक्ता महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक आणि त्यांना कायदेशीर सल्ला मिळण्यासाठी मार्गदर्शन व प्रबोधन व्यवस्था निर्माण करण्याचे गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य अभियंता कविता घरत यांनी नवरात्रीच्या नवरंगाचा उत्साह महिलांच्या आयुष्यात निर्माण व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यासाठी महिलांनी स्वतःला सक्षम करण्याची आवश्यकता व्यक्त केली. तर वैशाली तळपलकर यांनी कठीण परिस्थितीत खचून न जाता महिलांनी आत्मविश्वासाने काम करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात मुख्य अभियंता सुचिता गुजर, मुख्य महाव्यवस्थापक (वित्त) स्वाती जानोरकर, सुरक्षा रक्षक स्वाती मोहिते, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) प्रांजली कोलारकर यांचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित नातू यांनी केले तर उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी आभार मानले. यावेळी महावितरण व महानिर्मितीमधील महिला अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.