संघांची १०० वर्षे हा काही नुसता सरत्या वर्षांचा ताळेबंद नाही. हिंदू समाजाच्या उत्थानाचा हा डॉक्टर हेडगेवारांचा यशस्वी प्रयोग आहे. त्याकडे तसेच पाहिले पाहिजे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. संघ नेहमीप्रमाणे तटस्थ आहे. संघाची शंभरी हा खरे तर या देशात साजरे करण्याचा क्षण असला पाहिजे, परंतु तसे करणे खुद्द संघालाही मान्य नाही. संघ याकडेही समाजात विस्तारण्याची एक संधी म्हणून पाहतोय. हिंदू समाजाच्या सर्व प्रकारच्या शक्तिवर्धनासाठी आपल्या सांस्कृतिक संचिताच्या आधारावर संघाने पंचपरिवर्तनाचा अजेंडा समाजासमोर ठेवला आहे. त्याच्या तपशीलात जाण्याचे कारण नाही, कारण त्याचा पुनरुच्चार पुढे वर्षभर वारंवार होणार आहे. संघाला हे पंचपरिवर्तन आपल्या कार्यकर्त्यांच्या आधारावर घडवून आणायचे आहे. परिवर्तनाचा लाभाथ मात्र समाजच असणार आहे. या सगळ्या प्रयोगांकडे ज्यांनी खुल्या मनाने पाहिले, ते कायमचे संघाचेच झाले. ज्यांना संघाचे मूल्यमापन आजही रुढ अर्थाने अन्य संस्था, संघटनांचे केले जाते तसे करायचे असेल, तर ते चाचपडतच बसणार आहेत. याचे मुख्य कारण, त्यांना संघाचे आकलन स्वतःच्या बौद्धिक चिकित्सेचा कंडू क्षमविण्यासाठी करायचे आहे. त्यांना समाजाशी काही देणे-घेणे नाही. संघ मात्र ‘व्यक्ती ते समष्टी‘ या प्रवासात रमला आहे. याचे गमक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या विचारपद्धतीत दडले आहे. केवळ विचारपद्धतीतच नाही, तर हिंदू समाजाच्या समोरील आव्हानांचे डॉक्टरांना झालेल्या आकलनातसुद्धा.
त्यासाठी थोडे डॉक्टरांच्या संघस्थापनेच्या पूवच्या कालखंडात जावे लागेल. डॉक्टर देशभक्त होतेच, पण त्यांच्या देशभक्तीला धर्माचे अधिष्ठान होते. त्यांचे विचार अस्सल होतेच, पण त्या सगळ्याला अनुभवांची जोड होती. संघस्थापनेच्या पूव कितीतरी प्रयोगांत डॉक्टरांनी आपल्या आयुष्याची काही वर्षे खच घातली. यात ते विचार करीत बसले नाहीत. समाजातल्या निरनिराळ्या प्रयोगांत डॉक्टर सहज सहभागी झाले. पर्यायाने डॉक्टर ज्या कालखंडात वावरत होते, त्या काळातील विचारसरणींचे आकर्षण त्यांना वाटलेच नसेल असेही नाही. ते होतेच, पण तेही प्रयोगापुरतेच. आपल्या लाडक्या हिंदू समाजासमोरील प्रश्नांचे आकलन करता येते का? उत्तरे शोधता येतात का? याचे उत्तर शोधण्यासाठीच. डॉक्टरांना वर्ज्य काहीच नव्हते, क्रांतिकार्यापासून ते काँग्रेसच्या विदर्भ प्रदेश कमिटीचे सदस्य म्हणून काम करण्यापर्यंत, सत्याग्रहापासून तुरुंगात जाण्यापर्यंत डॉक्टरांनी सर्व काही करून पाहिले; मात्र कशातही ‘राम’ गवसला नाही. यातूनच बीजारोपण झाले ते ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ नावाच्या गगनावरी गेलेल्या वेलूचे. नावही किती सुटसुटीत; भूमिका किती स्पष्ट! संघटन हिंदूंचे असले, तरी संस्था राष्ट्रीयच! या भव्यतेचे दर्शन त्यांनी याची देही याची डोळा पाहिले. डॉक्टरांनी केवळ १५ वर्षांत एक राष्ट्रव्यापी संघटन उभे केले आणि त्यांच्या वारसांनी त्याचा विस्तार विश्वभर केला. मर्त्य मानवाच्या जन्माला आलेल्या या महापुरुषाचे काम कुठल्याही प्रेषितापेक्षा कमी नाही. मात्र, ना डॉक्टरांना असा प्रेषित होण्यात रस होता, ना त्यांच्या अनुयायांना. डॉक्टरांचे तारतम्य इतके उत्तम होते की, ज्या विचारसरणी किंवा संस्था अथवा पक्षापासून ते दूर गेले आणि संघकामाची सुरुवात त्यांनी केली, ते करताना त्यांना कुणावरच टीका किंवा उपदेश केला नाही. खरे तर त्यांना इतका वेळही नव्हता. मात्र, याचा परिणाम इतका होता की प्रसंगी मुस्लिमांनाही त्यांची बाजू घेऊन उभे राहावे लागले. सर्वसमावेशकतेचे बीजारोपण इथेच रोवले गेले. एखादी संस्था किंवा व्यक्ती मोठी होते, ती तिच्या ठायी असलेल्या मूल्यांच्या आधारावर. कोण कोणती मूल्ये आत्मसात करतो, त्यावर त्याचे यश-अपयश ठरलेले असते. डॉक्टरांनी ही मूल्यव्यवस्था संघात स्वतःच्या कृतीने रुजविली. त्याग! अपरंपार त्याग! स्वतःचे जीवनच संघकार्याला झोकून देऊन डॉक्टरांनी समर्पणाचा वस्तुपाठ घालून दिला.
हिंदूंचे हरपलेले आत्मभान हे डॉक्टरांनी निदान केलेल्या आजाराचे मूळ कारण होते. तिथूनच डॉक्टरांची सुरुवात झाली, जगाच्या इतिहासातील हिंदूंना आत्मभान मिळवून देण्याच्या सर्वांत मोठ्या प्रयोगाची. डॉक्टरांनी व्यक्तिनिर्माणाचे काम इतक्या मूलभूत घटकातून सुरू केले की पुढे व्यक्तिनिर्माणाच्या कामाला मोठी आधारशिलाच सापडली. या आधारशिलेचे नाव होते, संघाची शाखा. शाखा बालांना आकर्षित करण्याचे केंद्र ठरले. आणि या शाखेच्या आधारावरच भावी कार्यकर्त्यांची पिढीच्या पिढी उभी राहिली. ही पिढी प्रचारकांच्या रुपाने संघाला मिळाली. पण, डॉक्टरांचा प्रयोग बालपणापासून संघाच्या शाखेत येऊन पुढे बालांचे तरुण होऊन कार्यकर्ता होण्यापर्यंत सीमित नव्हता. आपले संपूर्ण आयुष्यात डॉक्टर समाजातल्या विविध सन्माननीय, यशस्वी लोकांनाही भेटले आणि ते संघात येतील, रुजतील व संघकार्याला हातभार लावतील, यादृष्टीने प्रयत्नांत राहिले. व्यक्ती आपल्या किमान योगदानातून, पण कमाल श्रद्धेतून डॉक्टरांना जोडल्या गेल्या व नंतर संघप्रवाहाच्या ओघात पूर्णपणे समर्पित झाल्या. संघटनशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना आजही डॉक्टरांच्या जीवनाचा अभ्यास अशा प्रकारे करावा, असे वाटत नाही. याचे कारण डॉक्टरांनी निर्माण केलेला संघ व त्याची रचना समजून घ्यायला अत्यंत सोपा असला, तरी त्यामागची विचारप्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. हे इतके सोपे नाही. संघटना किंवा तिचे शीर्षस्थ नेतृत्व आपणच अनुभवसिद्धतेतून निर्माण केलेली एक वाट सोडून, पुन्हा ही वाट यश देणारीच असताना नवनव्या मार्गांवर चालण्यासाठी प्रयत्न करते, तेही यशापयशाची चिंता न करता, हे अव्याहतपणे सुरू आहे. याचे गमक डॉक्टर व संघाच्या कार्यपद्धतीत दडले आहे. कारण, संघाला काहीच वर्ज्य नाही.
संघाला समांतर किंवा संघाप्रमाणेच देशासाठी, समाजासाठी काही करण्याची इच्छा असलेल्या संघटनांचे काय झाले आहे? एकेकाळी देशाचा मूळ राजकीय प्रवाह असलेली काँग्रेस, तळागाळातील माणसाचे भले करायला निघालेल्या डाव्यांच्या संघटना, या दोन्हींची स्थिती आज काय आहे? या दोन्हींचे भविष्य काय आहे? काँग्रेस एका कुटुंबाच्या दावणीला बांधली गेली आहे, तर डावे पक्ष संघपरिवाराच्या द्वेषातून भाजपचा विरोध करण्याव्यतिरिक्त काहीच करायला तयार नाहीत. कारण त्यांच्या कार्यपद्धतीत नावीन्यता नाही. हा डीएनए संघपरिवारात डॉक्टरांनी रुजवला आणि तोही कृतीतून. त्यामुळे १९२५ सालापासून संघाने हिंदू संघटना केंद्रस्थानी ठेवून अनेक प्रयोग केले. यातले अनेक प्रयोग यशस्वी झाले, अनेक फसलेसुद्धा! मात्र, संघ त्यात अडकला नाही. संघाच्या निर्मितीपासून ते आजतागायत डॉक्टरांच्या मनात अशा एका व्यवस्थेचा विचार होता, जो हिंदू समाजाला आत्मभान देण्याच्या प्रक्रियेला सक्रिय ठेवेल. हा समाज आपणच ताब्यात घेऊ आणि आपणच आपल्याला हवा तसा त्याला चालवू, ही संघाची संकल्पना नाही. सक्षम सुसंघटित हिंदू समाज निर्माण करणारी व्यवस्था हे संघाचे ध्येय आहे. समाजाचे आत्मभान हरपले की तो आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अयोग्य ठरतो आणि मग संकटांना बळी पडतो. औद्योगिक क्रांतीने प्रगती आणली, परंतु मानवी जीवनाचे भयावह शोषण हा त्यातला सगळ्यात गंभीर भाग होता. मार्क्सला या समस्येेचे मूळ शोधता आले. मात्र, त्याला किंवा त्याचा अनुयायी म्हणवून घेणाऱ्यांना त्याच्या प्रश्नांची उत्तरे शोधता आली नाही. कामगारांच्या संघटना आजही चाचपडत आहेत. अनेक ठिकाणी तर त्या संदर्भहिन आहेत. याउलट संघपरिवारातील संस्था या अधिक प्रभावीपणे समाजासमोरील प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत. अनेक ठिकाणी त्यांना मिळणारी उत्तरे समाधानकारक देखील आहे. कारण, त्यांना ऊर्जा देणारी बलस्थाने संघकार्याच्या चौकटीत दडली आहेत. कुणाला व्यक्ती प्रेरणा देते, तर कुणाला विचार. प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीही आसपासच आहेत. त्यांनी मोठे ग्रंथ निर्माण केलेले नाहीत, त्यांनी प्रभावी भाषणे दिलेली नाहीत. अनेक ठिकाणी आजच्या निकषांवर लागू पडतील, अशी त्यांची आकर्षक व्यक्तिमत्त्वेही नाहीत. मात्र, परिणाम प्रभावी आहेत. कारण, या व्यक्ती आपला प्रभाव कृतीतून सिद्ध करतात. कुणी घरातले दुःखद प्रसंग बाजूला ठेवून संघस्थानावर शाखा लावायला हजर असते, तर कुणी आपले संपूर्ण आयुष्यच संघाला समर्पित करून टाकते. वाव प्रत्येकाला आहे. सर्व प्रकारच्या समर्पणाचे स्वागतच आहे आणि उचित सन्मानदेखील! हा डॉक्टरांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेचा परिणाम आहे.
हीच व्यवस्था माणसे उभी करते. विविध क्षेत्रांत जाऊन अत्यंत जबाबदारीने हीच माणसे काम करतात. संघाच्या व्यक्तिनिर्माणाचा पाया इतका भक्कम आहे की, संघ त्यांना काहीही न सांगता तिथल्या क्षेत्राची नीतिमत्ता शोधून ही माणसे तिथे काम करतात. कधीकधी अशी माणसे फसतातसुद्धा, काम बंदही पडते. व्यक्ती व संस्थेचे नुकसानही होते. मात्र, ते अपयश त्या व्यक्तीचे असते, संघाचे नाही. संघ माणसे घडवतो, व्यवस्था नाही. संघावर एक आरोप सतत होत असतो आणि तो म्हणजे, या देशाची घटना बदलण्याचा. हा आरोपच हास्यास्पद आहे आणि तो ज्यांच्याकडून होत असतो, ती माणसेच घटनेतल्या आजतागायतच्या बदलांसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जबाबदार असतात. मुळात संघाला देश चालवायचा नाही. संघाला संघाचे काम आहे. देश चालविण्याचे काम संसदेच्या शीर्षस्थ स्थानी बसलेल्या राजकीय नेतृत्वाचे आहे. संघ त्यात ढवळाढवळ करत नाही. देशाच्या प्रमुखपदी संघाचा स्वयंसेवक असेल, तर संघ हिंदू समाजाच्या न्याय्य मागण्या अधिक जोमाने रेटू शकतो; नसेल तर संघाचे काहीच अडत नाही. किंबहुना इतिहासात स्वयंसेवक प्रमुखपदी किंवा प्रक्रियेत नसतानाही राष्ट्रकारणासाठी संघाने दिलेल्या पाठिंब्याची उदाहरणे समोर आहेत. हा देश आपला आहे आणि या देशाची सेवा करण्यासाठी, देशावर संकटे आली असतील, तर त्यावर मात करण्यासाठी आपल्याला कुठल्याही आदेशाची, शासकीय पाठिंब्याची किंवा पदांची गरज स्वयंसेवकांना वाटत नाही. ही भावना सर्वसामान्यांतल्या सर्वसामान्य माणसाच्या मनात रुजविण्यात आलेले यश हीच संघाची खरी ताकद आहे.