नागपूर : राज्यात १०० टक्के पीक पाहणी होणार असून ३१ ऑक्टोबरपर्यंत ही पीक पाहणी पूर्ण होणार आहे, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, १ ऑक्टोबर रोजी दिली.
माध्यमांशी संवाद साधताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आमचे ग्राम महसूल अधिकारी गावागावात जाऊन १०० टक्के पीक पाहणी करणार आहेत. जेणेकरून कुठलाही नुकसाग्रस्त शेतकरी सुटणार नाही. ते घरोघरी जाऊन संपूर्ण राज्याची पीक पाहणी करणार असून ३१ ऑक्टोबरपर्यंत ही पीक पाहणी पूर्ण होणार आहे. शेतकऱ्यांना निकषांपेक्षा जास्तीची मदत मिळणे हाच ओला दुष्काळाचा अर्थ असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याबाबत योग्य निर्णय करतील."
अनिल देशमुख यांची स्टंटबाजी
"निवडणूकीच्या काळात अनिल देशमुख यांच्यासोबत घडलेल्या घटनेची पोलिसांनी चौकशी केली आहे. प्रथमदृष्ट्या झालेल्या चौकशीमध्ये अनिल देशमुख यांनी जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंट केल्याचे दिसते आहे. आता न्यायवैद्यक अहवाल आल्यानंतर आणखी काही गोष्टी स्पष्ट होतील. कुठल्याही व्यक्तीने खिलाडूवृत्तीने विजय-पराजय स्विकारला पाहिजे. परंतू, एखादी निवडणूक जिंकण्याकरिता स्वत:च स्वत:ला दगड मारणे योग्य नाही. महाराष्ट्रातील जनता अशा स्टंटबाजीला मत देत नाही," असेही ते म्हणाले.
"गोपीचंद पडळकर मागच्या वेळी काहीही संदर्भ नसताना बोलले होते. त्यावेळी आम्ही त्यांच्याशी बोललो होतो. आज काही संदर्भ देत ते बोलले आहेत. त्यांच्यावर व्यक्तिगत टीका टिपण्णी झाल्याने त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. परंतू, राजकारणात कुणालाही आईवडीलांचे नाव घेऊन बोलू नये, अशी आमची सूचना आहे," असेही मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
कुर्ला परिसरात लावण्यात आलेल्या 'आय लव्ह मोहम्मद' या बॅनरबद्दल बोलताना ते म्हणाले की, "सार्वजनिक जागेवर बॅनर लावणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. कायदा व सुवव्यवस्था संपवणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांशी बोलणार आहे. प्रत्येकाने आपले वैयक्तिक मत प्रकट करावे. परंतू, सार्वजनिक जागेवर समाजात तेढ निर्माण करणारे प्रदर्शन करणे योग्य नाही."
मविआत तिन्ही पक्ष एकमेकांना लाथा मारतील
"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत महायूती एकत्रित लढणार आहे. काही ठिकाणी आम्ही चर्चा करणार असून अडचण वाटत असलेल्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू. महायूतीमध्ये मतभेद होतील पण मनभेद होणार नाहीत. कुठलीही टीका टिपण्णी होणार नाही. पण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची लाथाडी होणार आहे. तिन्ही पक्ष एकमेकांना लाथा मारत राहतील आणि निवडणूका संपून जाईल. पण महायूती मात्र, ५१ टक्के मते घेऊन विजयी होईल," असा विश्वासही महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला.
डॉ. हेडगेवार यांना भारतरत्न मिळावा ही सर्वांचीच भावना
"जमाल सिद्दीकी यांनी पत्र लिहून भावना व्यक्त केली असून केंद्र सरकार त्यावर योग्य विचार करेल. देशाला मजबूत करणे, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीमध्ये राष्ट्रभावना निर्माण करणे आणि भारत माता ही जगातील मोठी शक्ती व्हावी यासाठी डॉ. हेडगेवार यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यामुळे त्यांना भारतरत्न मिळावा ही सर्वांचीच भावना आहे," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....