कृण्वन्तो विश्वमार्यम्‌

    01-Oct-2025
Total Views |

‌‘कृण्वन्तो विश्वमार्यम्‌‍‌’ या ऋग्वेदातून आलेल्या मंत्राचा अर्थ असा की, प्रत्येक व्यक्तीने स्वतःमध्ये श्रेष्ठ गुण, कर्म आणि स्वभाव विकसित करून इतरांनाही श्रेष्ठ मार्गावर नेले पाहिजे. याच पद्धतीने पुढे साऱ्या विश्वाला श्रेष्ठ आणि सुसंस्कृत बनवण्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. समग्र विश्वाचे अधिष्ठान धर्म व्हावे, यासाठी हिंदू समाज संघटित व्हावा, अशी भावना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक पू. डॉ. हेडगेवार यांच्या या विचारांनी विदेशातील संघटित हिंदू समाज आज वाटचाल करताना दिसत आहे. आपल्या संस्कृतीला तसेच हिंदू परंपरेला धरून विविध उपक्रम हिंदूंमार्फत स्थानिक पातळीवर राबवले जात आहेत. या एकंदरीत वाटचालीचा घेतलेला हा धावता आढावा...

ऋग्वेदात पुरुष सूक्त नावाचे एक सूक्त आहे. ‌‘पुरुष‌’ याचा अर्थ होतो, एक वैश्विक अस्तित्व, जे सर्वांमध्ये अंतर्निहित आहे. त्याची पहिली ऋचा आहे, ‌‘सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात्‌‍|‌’ या ऋचेत अशा पुरुषाचे वर्णन केले आहे, ज्याला हजार मस्तके आहेत, हजार डोळे आहेत आणि हजार पाय आहेत. येथे ‌‘हजार‌’ हा शब्द अपरिमिततेचे द्योतक आहे. हजारो मस्तके, डोळे आणि पाय असूनही तो एकच पुरुष आहे! ही कल्पना काही प्रमाणात संघाच्या वैश्विक विस्तारासंबंधी ध्यानात येते. संघ हे केवळ एक औपचारिक संघटन नाही, तर जागृत जैविक समाजाचे प्रतिनिधित्व करणारे ते संघटन आहे. म्हणूनच संघाचे जागतिक स्वरूप हे फक्त संघाचा औपचारिक भाग नसून, जनकल्याणासाठी स्वतंत्रपणे कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा समूह आहे. संघाच्या प्रेरणेत हिंदू धर्माविषयीची आस्था असते. हिंदू धर्म हा विश्वधर्म व्हावा, अशी आकांक्षा संघामध्ये सतत जागृत असते.

समग्र विश्वाचे अधिष्ठान धर्म व्हावे, यासाठी हिंदू समाज संघटित व्हावा, अशी भावना आहे. म्हणूनच पूजनीय डॉ. हेडगेवार यांनी जो व्यक्तिनिर्माणाचा मार्ग निवडला, तो स्वयंपूर्ण असल्यामुळे व्यक्तिनिर्माणाच्या या माध्यमाबद्दल जगातील सर्व कार्यकर्त्यांच्या अंतःकरणात श्रद्धा आहे. या माध्यमातून आपापल्या देशांमध्ये परिस्थितीनुसार रचना उभी करून, चारित्र्यनिर्माणाच्या मार्गाने समाज संघटित करून धर्मप्रस्थापनेसाठी विविध कार्ये केली जातात. हेच संघाचे वैश्विक स्वरूप आहे. यालाच ‌‘विश्व विभाग‌’ असे नाव आहे. इथे कार्यकर्ते आपल्या संपूर्ण कुटुंबासह नियमितपणे शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक संस्कारासाठी एकत्र येतात. अनुशासनभरल्या उत्साहाने सर्व कार्यक्रम करतात. धर्मविकासासाठी संकल्पबद्ध होण्याची प्रार्थना करतात आणि समाजसंपर्कासाठी बाहेर पडतात. प्रत्येक कुटुंबाला या संस्काराशी जोडण्याचा प्रयत्न करतात. समाजसंस्काराचे हे कार्य अखंडपणे जगातील 50 पेक्षा अधिक देशांमध्ये सुरू आहे.

हिंदू धर्मातील व्रत-उत्सवांना अर्थपूर्ण पद्धतीने साजरे करणे, हे हिंदू संघटनांच्या कार्याचा एक अविभाज्य भाग आहे. गुरू पौर्णिमेच्या प्रसंगी स्थानिक शिक्षकांना आपापल्या शाखांमध्ये आमंत्रित केले जाते. ‌‘गुरुवंदना‌’ किंवा ‌‘शिक्षणवंदन‌’ या नावाने हा उत्सव ओळखला जातो. आपली हिंदू मुले-मुली आपल्या शिक्षकांना वंदन करतात. शिक्षक व विद्याथ यांच्या नातेसंबंधांवर एक परिसंवाद घेतला जातो. शाळांमधील शैक्षणिक वातावरण सुधारण्यात अशा कार्यक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका असते.

एक प्रसिद्ध सण म्हणजे रक्षाबंधन, जो बहुतांश ठिकाणी अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. आपल्या ठिकाणी समाजरक्षणाचे दायित्व निभावणाऱ्या पोलीस, अग्निशामक दल तसेच सैनिक यांना राखी बांधून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी असते. समाजाला ‌‘वसुधैव कुटुम्बकम्‌‍‌’ हा संदेश देत आपण सारे समाजरक्षणासाठी कटिबद्ध होऊ, या आवाहनातून धर्मविकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले जाते.

हिंदू आपली भाषा, प्रांत, आवड-निवड, आहार-विहार, उपासना या सगळ्यांत विविधतेने नटलेला आहे. सर्व देशांमध्ये विविध भाषिक, प्रांतीय, जातीय, सांप्रदायिक संघटना उभ्या आहेत. ही भारताची विविधता आहे. या सर्वांना एकत्र आणण्यातही आनंद आहे. परस्पर प्रांतीय कार्यक्रमांना जाणे सर्वांना आवडते. ‌‘हिंदू संघटन दिन‌’, ‌‘हिंदू मेळा‌’, ‌‘इंडिया विक‌’ तसेच ‌‘भारत दिवस‌’ या माध्यमांतून सर्व हिंदू समाजाला एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न हा हिंदू संघटन कार्याचा एक भाग आहे. हिंदू समाजाच्या धर्म पुनर्स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत स्थानिक आणि जागतिक पातळीवर नियमित आयोजित होणारे हिंदू संमेलन हे धर्म पुनरुत्थानाचे एक अत्यंत महत्त्वाचे संघटित प्रयत्न आहेत. दर चार वर्षांनी होणारे विश्व हिंदू संमेलन हे आज जगभरातील हिंदूंना एकत्र आणण्याचे एक सक्षम माध्यम ठरत आहे.

प्रत्येक देशाची या समाजनिर्मितीत स्वतःची भूमिका असते. एखादा समाज राजकीय व्यवस्थेला नवे आयाम देतो, लोकशाही व्यवस्था जी प्राचीन काळापासून चालत आली आहे, ती नव्या स्वरूपात मांडतो. कोणी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन शोधांना जन्म देतो. कोणी पृथ्वीच्या गर्भात दडलेल्या पेट्रोलियम, खनिजे इत्यादी मौल्यवान गोष्टी उपलब्ध करून देतो. कोणी आर्थिक क्षेत्रात प्रचंड प्रगती करून भौतिक जीवनाच्या सर्व सुविधा निर्माण करतो. कोणी कला क्षेत्रात, कोणी क्रीडा क्षेत्रात जागतिक भूमिका बजावतो. भारताची भूमिका काय असेल आणि भारताचा अविभाज्य घटक असलेल्या हिंदू समाजाची भूमिका काय असेल, याविषयी आपण विचार करतो, तेव्हा आपल्या शास्त्रांनी योग्य मार्गदर्शन केलेले दिसते. भारताची भूमिका म्हणजे जीवन कसे जगावे, याचे सार प्रदान करणे. वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात सामंजस्य साधून कसे जगायचे, हे जगाप्रति भारताचे कर्तव्य आहे. भारत हे निभावतो, तेव्हाच त्याची भारतीयता प्रकट होते. हिंदू समाज हे कार्य अनेक माध्यमांतून करत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे आणि जगासाठी सुखाच्या शाश्वततेचा विषय आहे.

युक्रेनमध्ये युद्धाचे वातावरण निर्माण झाले. हजारो विद्याथ असुरक्षितता अनुभवू लागले. ‌‘सेवा इंटरनॅशनल‌’ने तत्काळ मदतीचा हात पुढे केला. हेल्पलाईन सुरू केली. सुमारे 1 हजार, 200 विद्यार्थ्यांचे धाडस वाढवले, त्यांनी धीर दिला. ग्राऊंड लेव्हलवर जी गरज होती, तिची पूर्तता केली. केवळ भारतीयच नव्हे, तर आफ्रिकेतील विद्यार्थ्यांसाठीही मदतीचा हात पुढे केला. अमेरिकेत विविध चक्रीवादळांच्या वेळी 24 तास कार्य करून नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवणे, अन्न-औषधांची सुविधा उपलब्ध करून देणे, आफ्रिकेतील शाळांमध्ये नियमित भोजनव्यवस्था करणे, सर्वांना पाणी मिळावे म्हणून रेनवॉटर हार्वेस्टिंगसारख्या योजनांची अंमलबजावणी करणे, श्रीलंकेत युद्धपीडित कुटुंबांना उद्योग करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देणे, हे सर्व कार्य निस्वार्थ भावनेने करण्यासाठी ‌‘सेवा इंटरनॅशनल‌’चे मोठे जाळे सुमारे 25 देशांत पसरले आहे. ‌‘सेवा‌’ या शब्दाचा अर्थही सर्वांना माहीत आहे, निस्वार्थ सेवा. आज जे बंधू सेवेतून लाभ घेतात, तेच सेवाकार्याचे भागीदार बनावेत, ही आकांक्षा साकार करण्यासाठी सर्व सेवाव्रती पुढे सरसावले आहेत. ‌‘चलो जलाए दीप वहाँ जहाँ अभी भी अंधेरा है और सेवा है यज्ञकुंड समिधा सम हम जले,‌’ ही भावना साक्षात ‌‘सेवा इंटरनॅशनल‌’मध्ये प्रकट होताना दिसते.

हिंदू समाज भारताबाहेर वेगवेगळ्या काळात व भिन्न कारणांनी गेला आहे. प्राचीन काळात दक्षिण-पूर्व आशियात संस्कृती प्रसारासाठी स्थलांतर, बौद्ध मताद्वारे इतर आशियाई देशांमध्ये स्थापना, शेतमजुरी व रेल्वे आदी कामांसाठी असंख्य नागरिकांचे देशांतर, व्यापारासाठी आफ्रिका व पाश्चात्य देशांमध्ये स्थलांतर, तसेच वैज्ञानिक व शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च पदांवर कार्य या सर्व कारणांमुळे हिंदू समाज आज जगातील एक अत्यंत मोठा समाज आहे. तो अनुशासित आहे, प्रगतिशील आहे, आपली परंपरा जतन करून ठेवलेला आहे, तसेच स्थानिक समाजात आपली चांगली छाप निर्माण केलेली आहे.

हिंदू युवा हा आज आणि उद्याच्या भविष्याचा निर्माता आहे. विविध देशांमध्ये हिंदू युवांचे संघटन कार्यरत आहे. कुठे आठवड्यातून एकदा पूजा, आरती आणि ध्यान करण्यासाठी एकत्र येतात, तर कुठे वर्तमानातील विषयांवर चर्चा करतात. अमेरिकेत युवांनी ‌‘दर्शन‌’ नावाची एक प्रदर्शनी उभारली, जी स्थानिक समाजाला हिंदू धर्म समजावून सांगण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरली. यूथ कॉन्फरन्स, युवा संगम आणि साहसी कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होऊन युवक आपली हिंदू ओळख उज्ज्वल करत आहेत. हाच युवा पुढे जाऊन अधिवक्ता, राजकारणी, लेखक, सोशल मीडिया प्रभावक (इन्फ्लुएन्सर) इत्यादी बनतो आणि हिंदू धर्म एका सुसंगत व सध्याच्या काळाशी सुसंगत अशा भाषेत सादर करतो.

हिंदू आहे, म्हणून स्थिर कुटुंबव्यवस्था आहे. कुटुंबाला प्रत्येक हिंदू अत्यंत महत्त्व देतो. हिंदू आईवडील आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दिवस-रात्र मेहनत करतात. हे सर्वश्रुत आहे की, हिंदू विद्याथ सर्व शाळांमध्ये आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे स्थिर कुटुंबव्यवस्था. 1990 मध्ये इंग्लंडच्या तत्कालीन पंतप्रधान मार्गरेट थॅचर यांनी या कुटुंबव्यवस्थेचे भरभरून कौतुक केले होते. कुटुंब आहे म्हणून सुरक्षा आहे, समाजात सामंजस्य आहे, एक अंतर्निहित एकतेचा अनुभव हिंदू नेहमी घेत असतो. हिंदू समाजाची ही वैशिष्ट्ये पाहून स्थानिक समाजही आपोआपच चरित्रनिर्मितीच्या कार्यात गुंतला आहे, असे चित्र काही ठिकाणी दिसू लागले आहे. ‌‘हिन्दू जगें तो विश्व जगेगा,‌’ या गीताचा आशय जगातील अनेक देशांत अनुभवता येतो.

जिथे दैवी गुण आहेत, तिथे असुरी गुणही असतात. जिथे सात्त्विकतेचे कार्य घडते, तिथे त्याला संपविण्याच्या इच्छेने तामसी शक्तीही सक्रिय होते. ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. वाद होतील, द्वंद्व होईल, कष्ट येतील, पण शेवटी सत्याचाच विजय होईल. विश्वातील हिंदू समाजही वेळोवेळी आक्रमणाचा बळी ठरत असतो. शाळांमध्ये, साहित्यातून, प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर करून आणि काही ठिकाणी जबरदस्ती धर्मांतराच्या माध्यमातून हिंदू विचार नष्ट करण्याचे षड्‌‍यंत्र रचले जाते. हे एक बौद्धिक युद्ध आहे. त्याला तशाच पद्धतीने उत्तर मिळाले पाहिजे. हिंदू समाज या बौद्धिक युद्धासाठी सज्ज होत आहे. अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया या भागांमध्ये संशोधन केंद्रे, वैचारिक गट आणि ॲडव्होकेसी गट निर्माण झाले आहेत. ते समाजाला असुरी कार्यांविषयी सतर्क करतात आणि योग्य गोष्ट समाजासमोर मांडतात.

वर्तमान काळ हा एक गतिमान काळ आहे. आर्थिक जागतिकीकरणाची प्रक्रिया आता मंदावली आहे. सांप्रदायिक राजकारण आणि युद्धांमुळे समाज कंटाळला आहे. अनियंत्रित भोगवाद आणि स्वैर विचारसरणीमधून कुठलेही सुख मिळत नाही. अशा चौकटीवर समाज संभ्रमित अवस्थेत उभा आहे. या काळात धर्माच्या मार्गाने चालणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. योगच्या माध्यमातून आपले जीवन घडविण्याचा प्रयत्न होत आहे. लाखो लोक योग करतात. त्यांना जोडण्यासाठी सर्व देशांमध्ये योग दिन किंवा योग संमेलनांचे आयोजन केले जाते. जागतिक समस्या वैयक्तिक जीवनात अशांतता निर्माण करतात. म्हणून अनेक लोक आध्यात्मिक मार्गाने चालून धार्मिक जीवनरचनेचा स्वीकार करतात. बुद्धांच्या विचारांनी प्रभावित झालेले लोक सम्यक मार्गाचे अनुचर बनत आहेत. संस्कृत ही केवळ एक भाषा नाही, तर सुसंस्कृत जीवनाचा मूलाधार आहे. संस्कृत संभाषण आणि प्राचीन शास्त्रांचे अध्ययन आज जगातील अनेक विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहे. श्रीमद्गवद्गीता ही केवळ हिंदूंचा धर्मग्रंथ नाही, तर कोणत्याही मानवाच्या भौतिक आणि पारमार्थिक उन्नतीचा आधारग्रंथ आहे. गीतेचे पठन-पाठन आज लाखो लोक करतात आणि गीता महोत्सवात सहभागी होतात.

अनेक लोक आपल्या प्राचीन धर्मसंस्कृतीचा शोध घेत त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतात. अझ्टेक, माओरी, शिंटो, योरूबा, ड्रुइड, रोमुव्हा, हेलेनिक अशा अनेक प्राचीन सभ्यता पुन्हा उभारल्या जात आहेत. युरोप आणि पश्चिम आशियाच्या अनेक देशांमध्ये सूर्यमंदिरांचा शोध घेतला जात आहे. वरील सर्व प्रयत्न वर्तमान समस्याग्रस्त जगाला प्रभावी औषधासारखे आहेत. अशा कोणत्याही मार्गातून या सर्व प्रयत्नांना बळ देण्याचे कार्य आपला हिंदू समाज करत आहे. वेद, उपनिषद, त्रिपिटक, द्वादशांग आणि सर्व गुरुवाणींनी ज्या जागतिक समाजरचनेचा ‌‘कृण्वन्तो विश्वमार्यम्‌‍‌’ असा उद्गार दिला आहे, तो साकार करण्यासाठी जागतिक हिंदू समाज संघटित स्वरूपात नियमित संस्कारित कार्यांद्वारे आपली आहुती देत आहे. या आहुत्यांच्या गाथा भविष्यात विधाता सुवर्णाक्षरांत नक्की लिहील.

- राम वैद्य
(लेखक विश्वविभागाचे सहसंयोजक आहेत.)