नागपूर : शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर विधानसभा निवडणूकीदरम्यान झालेला हल्ला बनावट असल्याचा दावा नागपूर ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात केला आहे.
विधानसभा निवडणूकीच्या काळात १९ नोव्हेंबर २०२४ रोजी काटोल विधानसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार आणि अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांच्या प्रचारार्थ नरखेड येथील सांगता सभा आटोपून अनिल देशमुख काटोल येथे तिनखेडा भिष्णूर मार्गाने परत येत होते. दरम्यान, काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करत हल्ला केला. यातील एक दगड अनिल देशमुखांच्या कपाळावर लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तसेच त्यांनी या हल्ल्याविरोधात तक्रारही दाखल केली होती.
या घटनेमुळे चांगलेच वातावरण तापले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी हा हल्ला भाजपकडून करण्यात आल्याचा आरोप केला होता. या घटनेच्या तपसानंतर आता पोलिसांनी न्यायवैद्यक चाचणीचा हवाला देत ग्रामीण पोलिसांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात 'क्लोजर रिपोर्ट' दाखल केला आहे. अनिल देशमुख यांच्या कारमधील दगड मागच्या काचेतून आत आला होता. तो दगड मागच्या सीटवर पडला असता. परंतू, तो दगड पुढच्या सीटवर होता, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच ही विसंगती पाहता हा हल्ला बनावट असल्याचेही त्यात सांगण्यात आले आहे.
याबद्दल बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, "माझ्या एका इसमाने मोठा दगड आणि एका इसमाने लहान दगड मारल्याने त्यांच्या गाडीची काच फुटून त्याची जखम त्यांच्या कपाळाला झाली, असे फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये म्हटले आहे. परंतू, ही घटना घडल्यानंतर सुरुवातीपासूनच राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधिक्षक यांनी चौकशी पुर्ण होण्याच्या आधीच राजकीय दबावापोटी या घटनेबद्दल उल्लेख केला," असे ते म्हणाले.
"१० महिन्याआधी अनिल देशमुख यांनी त्यांच्यावर काही लोकांनी हल्ला केल्याचा दावा केला होता. त्यावेळी मी काटोल भागात अनेकांशी बोलल्यानंतर ही घटना बोगस असल्याचे माझ्या लक्षात आले. अनिल देशमुख यांनी निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळी मी जे सांगितले तेच आज न्यायवैद्यक अहवालात दिसून येत आहे. आज अनिल देशमुख यांचे पितळ उघडे पडले आहे." - विधानपरिषद आमदार परिणय फुके
"अनिल देशमुख हे स्वत:च्या कर्माचे फळ भोगत आहेत. २५ वर्षे सत्ता असताना त्यांना लोकांच्या विश्वासात उतरता आले नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:च स्वत:वर हल्ला करून घेतला. ही सगळी त्यांच्याच कर्माची फळे आहेत." - आ. चरणसिंग ठाकूर, काटोल विधानसभा
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....