एसटीची दिवाळीनिमित्त होणारी भाडेवाढ रद्द; १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय मागे घेण्याचा निर्णय

Total Views |

मुंबई : परतीच्या पावसामुळे राज्यभर निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे दिवाळी दरम्यान एसटीने केलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात येत आहे,अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी हंगामात १५ आक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून १० टक्क्यांची हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. परंतु परतीच्या पावसामुळे आलेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्य जनतेला सोसावा लागणाऱ्या आर्थिक भाराचा विचार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर भाडेवाढ रद्द करावी, अशी सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना केली. त्यानुसार मंत्री सरनाईक यांनी महामंडळाला दिलेल्या निर्देशानुसार महामंडळाने भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी जाहीर केल्यानुसार १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत साधी, निमआराम (हिरकणी), शयन आसनी, वातानुकूलित शिवशाही आणि जनशिवनेरी अशा सर्व बसगाड्यांमध्ये १० टक्के भाडेवाढ लागू होणार होती. परंतु, आता प्रवाशांना अतिरिक्त भाडे मोजावे लागणार नाही. त्यामुळे नेहमीच्या दरानुसार दिवाळीत देखील प्रवाशांना एसटीचे तिकीट काढणे शक्य होणार आहे.

एसटीने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांना दिलासा

सणासुदीच्या काळात राज्य परिवहन प्राधिकरणाने महामंडळाला ३० टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याची मुभा दिली होती. त्यानुसार १० टक्के दरवाढीचा निर्णय महामंडळाने घेतला होता. पण राज्यातील पूरपरिस्थिच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांवर होणारा परिणाम लक्षात घेता हंगामी भाडेवाढ मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. अर्थात,या निर्णयामुळे दिवाळी सणात एसटीने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.