उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सज्जड दम
30-Jan-2025
Total Views | 67
बीड : कुणीही कुणाला खंडणी मागितल्याचे कानावर आल्यास त्याच्यावर मकोका लावण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गुरुवार, ३० जानेवारी रोजी त्यांनी बीड येथील राष्ट्रवादी भवन जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना त्यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "मी अनेक वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम केले आहे. हे काम करत असताना मी कधीही जातीपातीचा, नात्याचा गोत्याचा विचार केलेला नाही. आपण सर्वांनी जातीय सलोखा ठेवला पाहिजे. १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आम्ही सगळे प्रमुख शिवनेरी किल्ल्यावर जाऊन महाराजांसमोर जाऊन नतमस्तक होतो. महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पुढे जायचे आहे. जर कुणी एखाद्या गोष्टीत जबाबदार असेल किंवा वेडेवाकडे प्रकार केले असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. विकासाचे काम करत असताना कुणीही कुणाला खंडणी मागण्याचा प्रकार करू नये. माझ्या कानावर आल्यास मी त्याच्यावर मकोका लावण्यासही मागेपुढे पाहणार नाही," असे ते म्हणाले.
चुकीच्या पद्धतींना आळा घातलाच पाहिजे!
"मी भेदभाव करत नाही. पण पुर्वापार चालत आलेल्या चुकीच्या पद्धतींना कुठेतरी आळा घातलाच गेला पाहिजे. कधी कधी कुणी पिस्तूल लावून फिरत असतात. पण जो कुणी पिस्तूल लावून फिरेल त्याचे लायसन्स रद्द करण्यास मी विभागाला सांगणार आहे. तुम्ही बनवलेले रील वगैरे खपवून घेणार नाही. मला कुणालाही टार्गेट करायचे नसून सगळ्यांना सारखा नियम लावणार आहे. इथे बदल झाला पाहिजे हे मला आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकांना जाणवायला हवे," असे त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांनी आपापले चारित्र्य स्वच्छ ठेवावे!
"सर्व कार्यकर्त्यांनी आपापले चारित्र्य स्वच्छ ठेवा, जनमानसात आपली प्रतिमा चांगली ठेवा. आपल्या आजूबाजूला चुकीच्या प्रवृत्तीची लोकं राहता कामा नये. पोलीस विभागात राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही. महायुतीच्या कुणाकडूनच होऊ देणार नाही. मी देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेंनाही विनंती करणार आहे की, कुणावरही अन्याय होऊ द्यायचा नाही. पण यात कुणी भरडलादेखील जाता कामा नये. हे नव्याचे नऊ दिवस नसून हे सातत्य पुढे राहिले पाहिजे," असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.