अमेरीकेतील 'त्या' भारतीयांवर एस.जयशंकर यांचं मोठं वक्तव्यं!

    23-Jan-2025
Total Views |

sj 1
 
नवी दिल्ली : अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची कमान हाती घेतली आहे. आपल्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी अमेरीकेत अवैधपणे राहणाऱ्या स्थलांतरितांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशातच अमेरीकेत अवैधपणे राहणाऱ्या भारतीयांचे काय असा प्रश्न विचारला जात होता. या विषयीच बोलताना भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले की अशा भारतीयांना कायदेशीररित्या भारतात आणलं जाईल.

अमेरीका या राष्ट्राच्या जन्मानंतर विविध देशाचे, वंशाचे, भाषेचे लोक अमेरीकेमध्ये स्थायिक झाले. अमेरीका या राष्ट्राच्या जडणघडणीत या लोकांचा खूप महत्वाचा वाटा होता. परंतु काही काळानंतर अवैध मार्गाने अमेरीकेत राहणाऱ्या स्थलांतरीतांची संख्या वाढत गेली. यामुळे अमेरीकेतील नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागलं. अशातच ट्रम्प यांचं सरकार आल्यानंतर इथल्या अवैध नागरिकांना आपआपल्या मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय ट्रम्प यांच्या नेतृत्वात घेण्यात आला आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार जवळपास १८ हजार भारतीय नागरिकांना त्यांच्या मायदेशी परतावं लागणार असल्याचं बोललं जात आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की या बाबत भारताची भूमिका ही कायमच सुसंगत राहिली आहे. जर कुठलाही भारतीय नागरिक अमेरीकेमध्ये अवैधपणे वास्तव्य करत असेल, आणि तो जर भारतीय नागरिक आहे ही गोष्ट सिद्ध झाली तर कायदेशीररित्या त्यांच्यासाठी परतीचे मार्ग खुले आहेत. त्यामुळे अमेरीकेसाठी ही गोष्ट नवीन नाही, असं सुद्धा जयशंकर म्हणाले. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प प्रशासनाने सूचित केलेल्या कागदपत्रांची भारत पडताळणी करेल आणि जी व्यक्ती भारतीय नागरिक असल्याचे आढळून येईल त्यांना परत स्वीकारले जाईल.