विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सरस्वती छात्रसेना

    22-Jan-2025
Total Views |
Saraswati Chhatra Sena

शालेय मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवणारी आणि त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसोबतच बौद्धिक विकासातदेखील अमूल्य योगदान देणारी संस्था म्हणजे ‘सरस्वती मंदिर ट्रस्ट’ संचालित ‘सरस्वती छात्रसेना’. त्यानिमित्ताने छात्रसेनेच्या विविध उपक्रमांचा घेतलेला आढावा...

अनुशासन, शौर्य, राष्ट्रप्रेम हे ब्रीद डोळ्यांसमोर ठेवून ‘सरस्वती छात्रसेना’ आज २२ वर्षे अविरत कार्यरत आहे. ठाण्यातील ‘सरस्वती मंदिर ट्रस्ट’ संचालित ‘सरस्वती छात्रसेने’ची स्थापना जुलै २००२ मध्ये झाली. ‘सरस्वती छात्रसेना’ म्हणजे राष्ट्रीय छात्रसेना असते, तसेच छोटे रुप आहे. केवळ १७ मुलांपासून सुरू झालेल्या छात्रसेनेने आज यशस्वीपणे ३००ची संख्या गाठली आहे. शाळेच्या प्रांगणात दर रविवारी तीन तास छात्रसेनेची परेड असते. त्यात आजूबाजूच्या भागात राहणारी इयत्ता सहावी ते इयत्ता नववीपर्यंतची शालेय मुले सहभागी होतात. माजी छात्रसैनिक आणि राष्ट्रीय छात्रसेनेचे कॅडेट्स तेथे प्रशिक्षक म्हणून कार्यभाग सांभाळतात.

दररोज शाळेसाठी सकाळी उठताना कंटाळा करणारी ही मुलेमुली रविवारी मात्र नेहमीपेक्षा लवकर मैदानावर हजर असतात. कारण, सैनिकी प्रशिक्षण म्हणजे वेळ पाळणे तर आलेच आणि उशिरा पोहोचणार्‍याला शिक्षादेखील होतेच. त्यामुळे सर्व छात्रसैनिक पूर्ण गणवेशात रविवारी सकाळी मैदानात पोहोचतात.

छात्रसेना म्हटले की साधारणपणे फक्त परेडच डोळ्यांसमोर येते. परंतु, ‘सरस्वती छात्रसेने’मध्ये दर रविवारी पळणे आणि व्यायामापासून सरावाला सुरुवात केली जाते. त्यानंतर कधी परेड, तर कधी काहीतरी सांघिक खेळ खेळले जातात. तेथे शालेय वयाच्या मुलांना रायफल आणि पिस्तुल चालवायला शिकवले जाते. तसेच, धनुर्विद्येचेदेखील प्रशिक्षण दिले जाते. या गोष्टींची वार्षिक परीक्षा घेऊन छात्रसैनिकांना प्रमाणपत्र दिले जाते. छात्रसेनेचा भर जरी शारीरिक तंदुरुस्तीवर असला, तरी सैनिकाला अद्ययावत सामान्य ज्ञानाचीदेखील तेवढीच गरज असते. त्यामुळे, सरस्वती छात्रसेनेत मुलांना भारतीय स्थलसेना, नौसेना, वायुसेना आणि तटरक्षक दल इत्यादी संरक्षणाच्या द्वितीय फळीबद्दलही माहिती दिली जाते. तसेच, अद्ययावत ज्ञानासाठी आणि छात्रसैनिकांना नियमित वर्तमानपत्र वाचनाची सवय लागावी यासाठी दर आठवड्याला मुलांना संरक्षण दलाशी संबंधित एका बातमीचे कात्रण कापून त्याबद्दल इतर सर्व मुलांसमोर त्याविषयी स्वतःचे मत मांडावे लागते.

छात्रसेना लॉकडाऊन काळातही अविरतपणे कार्यरत होती. त्या काळात शारीरिक प्रशिक्षण देणे शक्य नव्हते. तरी बौद्धिक विकासावर भर देत छात्रसेना प्रशिक्षकांनी पीपीटी तयार करून मुलांना भारतीय सैन्यातील पदे, शस्त्र, गणवेश इत्यादी गोष्टींबद्दल माहिती दिली होती. या सर्व गोष्टींची वर्षातून दोन वेळेस लेखी परीक्षा घेतली जाते. त्यासाठी मुलांना सैन्यदलाबद्दल अद्ययावत माहिती असणे अपेक्षित असते. सरस्वती छात्रसेनेचा चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर जेव्हा छात्रसैनिक पुढे महाविद्यालयात राष्ट्रीय छात्रसेनेत प्रवेश घेतात, तेव्हा त्यांना फक्त परेडच नाही, तर संरक्षणशास्त्राविषयीचे सामान्य ज्ञानदेखील त्यांना आधीच अवगत असते. त्यामुळे राष्ट्रीय छात्रसेनेच्या दिल्लीच्या परेडला जाण्याच्या संधी सरस्वतीच्या छात्रसैनिकांना मोठ्या प्रमाणात मिळतात.

ही संस्था खासगी असल्यामुळे त्यातील उपक्रमांना कोणतेही बंधन नाही किंवा कोणत्याही प्रकारे साचेबद्धता नाही. ‘सरस्वती छात्रसेने’मध्ये शिकवले जाणारे उपक्रम हे मुलांचा एकंदरीत व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, या उद्देशाने तयार केलेले असतात. म्हणजे, एखादी परिस्थिती सांगून यावेळी तुम्ही काय कराल, असे प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ, दोन बाजूबाजूच्या झाडांना दोरी बांधून त्याचे जाळे तयार केले जाते. सीमेवर जसे कुंपण बांधले जाते, तसे हे वीजप्रवाह असणारे तारेचे जाळे आहे, असे मानावे. आता आपला २० मुलामुलींचा गट त्या दोरीला स्पर्श न करता पलीकडे कसा जाऊ शकतो, याचा मुलांनी विचार करायचा. आपल्या गटातील मुलांना तसेच मुलींनादेखील सुरक्षितपणे दोरीच्या पलीकडे नेणे यात मुलांचा खरोखर कस लागतो. अशा प्रकारे असंख्य उपक्रम राबवत या शालेय मुलांना खर्‍या अर्थाने छात्रसैनिक बनवले जाते. छात्रसेनेमध्ये शिकवला जाणारा आणखी एक स्तुत्य उपक्रम म्हणजे तिरंगा बांधणे. राष्ट्रीय सणांना आणि महाराष्ट्र दिनाला झेंडा फडकावणार्‍या व्यक्तीचे जर आपण निरीक्षण केले, तर तो फक्त साहाय्यक सांगेल, ती दोरी खेचतो. कारण त्याला स्वतःला ते ज्ञान अवगत नसते. असे समाजात बरेच लोक आहेत. आपला तिरंगा बांधण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि एक भारतीय म्हणून आपल्याला तो व्यवस्थित बांधता आलाच पाहिजे, या भावनेतून या उपक्रमाची सुरुवात झाली. यामध्ये झेंड्याची व्यवस्थित घडी घालून तो अचूक बांधून प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली फडकावला जातो.

गडकिल्ल्यांविषयी जागृती करण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी दरवर्षी छात्रसेनेचा एक ट्रेक जातो. तसेच, छात्रसेनेचा वार्षिक कॅम्प हा तर विशेष आकर्षणाचा मुद्दा. त्यामध्ये रॉक क्लाईंबिंग सारखे साहसी खेळ असतातच, पण त्यासोबतच त्यासाठी लागणार्‍या दोरीच्या गाठीदेखील मुलांना शिकवल्या जातात. त्यांना होकायंत्र वापरून दिशा शोधणेही शिकवले जाते. सरस्वती छात्रसेनेच्या प्रयोगशील वृत्तीमुळे, दरवर्षी कॅम्पमध्ये काहीतरी नवीन उपक्रम घेतला जातो. छात्रसेनेची मुलेमुली एकत्र क्रिकेटसुद्धा खेळतात आणि बॅण्ड वाजवण्याच्या स्पर्धेतसुद्धा भाग घेतात. छात्रसेनेमध्ये पूर्ण शिस्तीचे वातावरण असले, तरी ‘शिस्तीत मस्ती करणे’ म्हणजे नक्की काय हा सरांचा मंत्र एकदा उमगला की ती शिस्तही मनापासून आवडू लागते. ‘सरस्वती छात्रसेने’तील एक विशेष उपक्रम म्हणजे, एक दिवस मुलांना जंगलामध्ये राहायला नेले जाते. तेथे थंडीत तंबूत झोपणे, आपापले विहिरीतून पाणी काढणे, चूलीवर स्वयंपाक करणे हे सारे काही मुले मोठ्या उत्साहाने करतात. यात सांघिक कौशल्याचा कस लागतो. आपल्या गटातील मुलांच्या क्षमता जाणून घेऊन, कामाची विभागणी करण्यासाठी गटप्रमुखाचे कौशल्य पणाला लागते. गटातील प्रत्येकाने आपापले काम चोख करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असते. या काळात आदर्श छात्रसैनिकाला शेवटी गौरवले जाते. आपल्या सामान्य जीवनातदेखील आवश्यक गोष्ट म्हणजे प्रथमोपचार. आपल्याला एखादी व्यक्ती रस्त्यात जखमी अवस्थेत दिसल्यावर आपण काय करावे, हे शिक्षणदेखील ‘सरस्वती छात्रसेने’मध्ये दिले जातात. सरस्वती छात्रसेनेमध्ये चालणार्‍या प्रत्येक उपक्रमामागे काहीतरी दूरदृष्टी ठेवून केलेला विचार आहे. या अभ्यासक्रमामुळे छात्रसैनिकाचे विकसित झालेले व्यक्तिमत्त्व जीवनभर आपली ओळख बनते. सैनिकी प्रशिक्षणाने आपल्या अंगी स्वयंशिस्त येते, हा अनुभव सरस्वती छात्रसैनिकांना लहान वयातच घेता येत आहे. सरस्वती छात्रसेनेचे हे देशकार्य असेच निरंतर चालू राहो, हीच सदिच्छा.

ओवी लेले