अजुन कोण कोण देवाच्या घरी जातयं? निरागस मायराचा “मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपट प्रदर्शित होणार ३१ जानेवारीला!
22-Jan-2025
Total Views |
मुंबई : लहान मुलांच्या भावविश्वात खूप काही सुरू असतं. मुलांना अनेक प्रश्न पडत असतात. त्या प्रश्नांची उत्तरं मुलं आपल्या पद्धतीनं शोधण्याचा प्रयत्न करतात. “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटात ग्रामीण भागातली गोष्ट मांडण्यात आली आहे. सैन्यात असलेले वडील देवाघरी गेले असं आईनं मुलीला सांगितल्यावर देवाचं म्हणजे काय ? आणि ते कुठे असतं? याचा शोध सुरू होतो.
तिची आई आपल्या शहीद झालेल्या पतीचं पेन्शन मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचं ट्रेलरमधून दिसतं. त्यामुळे भावनिकतेची किनार असलेल्या या कथानकाची मांडणी अतिशय हलक्याफुलक्या, रंजक पद्धतीनं केल्याचं ट्रेलरमधून समजतं आहे. श्रवणीय संगीताचीही जोड या कथानकाला असून “सुंदर परिवानी” ह्या गोड़ गीताला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे.
आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेपर्यंत पोहोचतं, तर देवाच्या घरी नक्की पोहोचेल असं वाटणाऱ्या एका लहान निरागस मुलीचा देवाच्या घराचा शोध “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटातून उलगडणार आहे. हृदयस्पर्शी आणि मनोरंजक कथानक असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आवर्जून उपस्थित होते. येत्या ३१ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.